नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पूर्वनियोजित कृतीद्वारे समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून उत्तर प्रदेश सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी बजाविलेल्या समन्सला रद्द करण्यास विरोध केला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांवरून काँग्रेसचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लखनऊ येथील दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले होते. हे समन्स रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला उत्तर प्रदेश सरकारने विरोध केला आहे. गांधी यांनी पूर्वनियोजित कृतीतून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून राज्य सरकारने त्यांची याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे.
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, दंडाधिकाऱ्यांसमोर सादर झालेल्या पुराव्यांवर योग्य पद्धतीने विचार करून भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ (विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करणे) आणि ५०५ (सार्वजनिक अफवा आणि गैरसमज पसरवणे) अंतर्गत प्रथमिकदृष्ट्या गुन्हा बनतो असे ठरवले. त्यामुळे समन्स कायदेशीर पद्धतीने बजावण्यात आले असून ते रद्द करण्याचा कोणताही मुद्दा उरत नाही.
लखनऊ येथील दंडाधिकारी न्यायालयाने १२ डिसेंबर २०२४ रोजी हे समन्स बजावले होते. यावर एप्रिल २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने गांधी यांच्या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत यापुढे अशा प्रकारचे वक्तव्य झाल्यास न्यायालय स्वत:हून कारवाई करेल, असा इशारा दिला होता. खंडपीठाने म्हटले होते की, स्वातंत्र्यसैनिकांविषयी अशा प्रकारची विधाने अत्यंत बेजबाबदार असून याची पुनरावृत्ती खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी हेही सांगितले की, गांधी यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांचे पत्राद्वारे कौतुक केले होते.
या प्रकरणात राहुल गांधींविरोधात तक्रार करणारे अधिवक्ता नृपेन्द्र पांडे यांनी सांगितले की, १७ नोव्हेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी "ब्रिटिशांचे सहकारी होते" आणि "त्यांना ब्रिटिशांकडून पेन्शन मिळत होती" असे विधान केले होते. हे विधान समाजात द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आले होते, असे पांडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीत हेही नमूद आहे की, महात्मा गांधींनी देखील सावरकर यांना देशभक्त मानले होते.