मुंबई : दिंडोशीमधील प्रभाग क्र.40 मध्ये मुंबई महापालिकेकडून स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. मात्र, पालिकेकडून त्याची स्वच्छता राखण्यात येत नसून, प्रचंड दुर्गंधीमुळे गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली. तसेच, लोकप्रतिनिधींकडूनही यासंबंधी कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
ही वस्ती फार जुनी असूनही पथदिव्यांची पुरेशी सुविधा नाही. मुलांना, महिलांना जाता-येता त्रास होतो. शौचालयांच्या अस्वच्छतेमुळे प्रत्येक घरात दररोज कोणीतरी आजारी पडते. पालिका आमच्या जीवाशी खेळत आहे. प्रशासनाला वारंवार सांगूनदेखील काहीच कारवाई केली जात नाही. फक्त मतदानावेळी आमच्या दारावर मत मागण्यासाठी येतात. पण, प्रत्यक्ष निवडून आल्यावर आम्हाला डावलले जाते. आमच्या लहान मुलांना याचा खूप त्रास होत आहे, अशी व्यथा येथील स्थानिकांनी मांडली आहे.
वस्तीमध्ये बाहेरचा व्यक्ती दोन मिनिटसुद्धा राहू शकत नाही, अशा परिस्थितीत आम्ही जगतो. पालिका, नगरसेवकांकडून औषध फवारणी, स्वच्छता, प्रकाशाची सोय उपलब्ध झाली पाहिजे. शौचालयाचे बांधकाम झाल्यापासून येथील सर्व घाण पाणी हे सतत आमच्या घरात येते. त्यामुळे किटकांचे प्रमाणही वाढत आहे. तरीही आमच्याकडे कोणी लक्ष देत नसल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली आहे.
लोकप्रतिनिधींचे पूर्णत: दुर्लक्ष!
पालिकेकडे मी स्वतः अनेकदा लेखी स्वरूपात पत्र दिले आहे. तक्रारीनंतर पालिका कर्मचारी तेवढ्यापुरते येऊन साफसफाई करतात. स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारचे लक्ष येथे देत नाहीत. अनेकदा तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी किंवा पालिका नागरिकांसाठी मूलभूत सोयीदेखील पुरवू शकत नाही. नुकतेच बांधकाम झालेल्या या शौचालयाची जर आताच गळती होणार असेल, तर नागरिकांनी कुठे जावे? लोकप्रतिनिधी लक्ष पुरवत नसल्यामुळे स्थानिकांच्या तक्रारी या माझ्यापर्यंत येतात. मी शक्य तेवढे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करते.
- कविता सालियार, प्रभाग अध्यक्ष भाजप, दिंडोशी