मुंबई : गेल्या वर्षी ऐन गणेश चतुर्थीच्याच दिवशी राज्याला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहन चौहानला दिंडोशी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असा या प्रकरणाचा उल्लेख करून सरकारी पक्षाच्या मागणीनुसार मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अवघ्या १८ दिवसांत मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले होते.
गेल्या वर्षी १० सप्टेंबरच्या रात्री साकीनाका परिसरात एक ३२ वर्षीय महिला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आढळली होती. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे उघड झाले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्या तरुणीचा ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी १८ दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले होते. आरोपी पीडित महिलेला आधीपासून ओळखत होता. पीडिता त्याला बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करूनही भेटत नसल्याने, रागाच्या भरत त्याने ते कृत्य केले होते. अमानुष पद्धतीने लोखंडी सळीचाही वापर केला होता.
या प्रकरणात मुख्य आरोपी मोहन चौहानवर बलात्कारासह हत्या असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्व प्रकारे चौकशी करून पोलिसांनी मोहन चौहानविरोधात पुरावे सादर केले होते. न्यायालयानेही सर्व पुरावे लक्षात घेऊन त्याच आधारे मोहन चौहानला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.