मुंबई : 'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय' म्हणत सबंध महाराष्ट्राला खळखळून हसवणारा चित्रपट 'दे धक्का'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव यांची धम्माल कॉमेडी पुन्हा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग तुफान गाजल्यानंतर याचा दुसरा देखील भाग यावा अशी अनेक प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केली होती. ५ ऑगस्ट २०२२ ला आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होत आहे.
दे धक्का २ यावा अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केल्या नंतर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी सिनेमा लवकरच येईल असे सांगितले होते. खरेतर हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रदर्शित होणार होता परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. परन्तु आता 'दे धक्का २' प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. कोल्हापूर ते मुंबई हा सिनेमाचा दौरा न राहता आता तो थेट जाणार आहे कोल्हापूरवरून लंडनला; हे कलाकार आता लंडनला जाऊन काय धम्माल करणार आहेत, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन तर स्कायलाईन एंटरटेमेंट आणि अमेय खोपकर यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, गौरी इंगवळे, सक्षम कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव असे तोडीसतोड कलाकार पुन्हा एकदा त्यांच्या धमाकेदार अभिनयाने सर्वांना हसवणार आहेत.
२००८ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा 'लिटिल मिस सनशाइन' या हॉलिवूड सिनेमाचा हा मराठी रिमेक होता. त्यानंतर 'क्रेझी फॅमिली' नावानं कन्नडमध्ये देखील हा सिनेमा तयार करण्यात आला. आता येणाऱ्या 'दे धक्का २ ' मध्ये कथा लंडन मध्ये घडणार आहे; एवढेच नाही तर या सिनेमाचं संपूर्ण शुटींगही लंडनमध्येच करण्यात आले आहे.