रत्नागिरी : कोकणातील जलक्रीडा आणि किल्ला प्रवासी होडी २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांमध्ये पर्यटक जल क्रीडांसाठी अधिक पसंती दर्शवतात, पण मेरीटाईम बोर्डाच्या ह्या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
बंद कालावधीत व्यावसायिकांनी जलक्रीडा आणि प्रवासी बोट सुरु ठेवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाने दिले आहेत. कोकणातील पाऊस आणि समुद्रात उसळणाऱ्या लाटा यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होणार आहे. ही नियमित प्रक्रिया असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.