सावरकरांच्या कादंबर्या, लेख, भाषणे ऐकून फक्त त्यांनी केलेला त्याग आणि त्याचा त्यांना मिळालेला मोबदला यांच्यासाठी फक्त दुःख होणार असेल तर उपयोग नाही. अर्थात, आपण संवेदनशील माणसे आहोत. त्यामुळे दुःख नक्कीच होईल. पण, त्यामुळे प्रेरणा मिळाली तर ते त्यांचं खरे यश असेल.
स्वातंत्र्यवीर’ असूनही ते कोणत्याही शालेय अभ्यासक्रमात शिकवले जात नाहीत. त्यांच्याबद्दल पुरेशी माहितीही दिली जात नाही. सुजाण पालक असतील, तर किमान त्यांच्याबद्दल काही गोष्टी कानावर पडलेल्या असतात ; अन्यथा तरुणाई पूर्णपणे त्यांच्याबद्दल अनभिज्ञ असते. होय.... मी सावरकरांबद्दलच बोलतेय!
त्यांच्यावर जर कधी काही विक्षिप्त आरोप झाले नसते, तर कदाचित त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं नसतं आणि माझ्यासारख्या अनेकांनी त्यांना जाणून घेण्याचे कष्टही घेतले नसते. पण, आज जेव्हा त्यांचे साहित्य वाचायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्येक संदर्भ वाचताना अंगावर शहारे येतात. भारावून जायला होतं. श्रीकृष्णाप्रमाणेच सावरकर समजण्यासाठीसुद्धा एक जन्म नक्कीच पुरेसा नाही! त्यांचं साहित्य वाचताना बराच वेळ लागतो. भाषा समजून घेण्यासाठी नाही, प्रत्येक दोन ओळींच्या मधला आशय समजून घेण्यासाठी! सावरकर ही एक जीवनपद्धती आहे. ती एक विचारसरणी आहे.
सावरकरांचे विचार आणि कार्य तीन भागांत विभागलेले आहे. अंदमानात येण्यापूर्वीचा काळ, एकूणच जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाचा काळ आणि जन्मठेपेची शिक्षा संपल्यानंतरचा काळ. प्रत्येक ठिकाणी त्यांचे विचार पाहून आपण फक्त थक्कच होतो. बालपणापासून त्यांच्यात असणारी काव्यप्रतिभा किती प्रगल्भ होती! त्यात मांडलेले विचार आणि शब्दरचना अनन्यसाधारण आहे. लोकमान्य टिळकांच्या देशभक्तीने प्रेरित झालेले, चापेकर बंधूंच्या फाशीने अस्वस्थ झालेले आणि त्यानंतर देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी शपथ घेणारे, लंडनमध्ये ‘बॅरिस्टर’च्या शिक्षणासाठी जात असतानाही ’जय स्वातंत्र्यलक्ष्मी’ म्हणतच बोटीत चढणारे, लंडनमध्ये राहणार्या आणि भारतीयांच्या मनात लोप पावत चाललेली राष्ट्रभक्ती उजागर करणारे, ‘१८५७चे भारतीय स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिणारे, सशस्त्र क्रांतीचा उठाव करणारे आणि त्यासाठी पूरक असे शिक्षण घेऊन बंदुका आणि बॉम्ब बनवून ते ‘बुक बायडिंग’मध्ये लपवून मायदेशी पाठवणारे, शत्रूच्या देशात जाऊन भारतीय उत्सव घडवून आणणारे, ब्रिटिश सत्तेविरुद्ध हालचाली केल्यामुळे ‘बॅरिस्टर’ ही सनद नाकारली गेलेले सावरकर. किती कमी कालावधीत किती ते कार्य! या सर्व कार्याचा कालावधी फक्त २६ वर्षे!
हे सर्व कार्य फक्त एका मिनिटात वाचून संपविण्याचे नक्कीच नाही. त्या प्रत्येक गोष्टीमागे असणारा दृष्टिकोन म्हणजे सावरकरी विचारसरणी. ब्रिटिश किती क्रूर आणि वाईट आहेत, हे ज्यांना माहिती होतं त्यांनाच ते किती हुशार आहेत, हेही माहिती होतंच. त्यांच्या देशात राहून त्यांच्याविरुद्ध कार्य करताना आपली सनद नाकारली जाऊ शकते, हे त्यांना खरंच कळलं नसेल? आणि असेल तर घरात कोणतीही श्रीमंती ओसंडून वाहत नसताना, मागे वाट पाहत असणार्या जबाबदार्या स्पष्टपणे दिसत असतानासुद्धा त्यांनी लंडनमध्ये राहून त्या सगळ्या हालचाली का केल्या असतील? उत्तर एकंच - भारताचे स्वातंत्र्य. हा विचार करतानाच अंगावर शहारे येतात आणि त्या स्वातंत्र्यवीरावर, त्यांच्या देशभक्तीवर संशय घ्यायचा?
अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगायला आलेला कोणताही कैदी पुन्हा जीवंत मायदेशी जाईल, ही शाश्वती कोणालाही नसे. परंतु, अशा नरकात येऊन ते काय करत होते? तर साक्षरतेचे वर्ग घेत होते. वेगवेगळ्या चळवळी करत होते. कशासाठी? तर कैद्यांच्या मूलभूत गरजांसाठी, प्रत्येकाला त्याच्या हक्काचे अन्न मिळावे म्हणून, अंघोळीसाठी पुरेसे आणि स्वच्छ पाणी, साबण मिळावे म्हणून, शौचास जेव्हा गरज असेल तेव्हा जाता यावे म्हणून. आपण या गोष्टी भोगण्याची कल्पना तरी करू शकतो? देशासाठी सोडा कुटुंबासाठी तरी? कैद्यांवर होणार्या अमानुष अत्याचाराविरुद्ध कायमच त्यांनी आवाज उठवला. पण, स्वतः मात्र सहा महिने कठोर एकांतवास, सात वेळा ‘खडी दंडाबेडी’, दहा दिवस ‘खोडाबेडी’, २० ते २२ वेळा आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, हातकड्या, कोठडीबंद्या, अन्नत्याग या सर्व शिक्षा भोगल्या. याव्यतिरिक्त सर्व प्रकारची सवलत किंवा शिथिलता जी इतर सामान्य आणि राजकीय कैद्यांना मिळत असे, ती त्यांना मात्र नाकारली गेली. आजारपणातसुद्धा कच्च्या पोळ्या आणि पाणी व भात असे अन्न मिळत असे. या सगळ्यांवरून त्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली होती, या विचारसरणीची कीव करावीशी वाटते.
अंदमानातील भिंतीवर लेख कोरून शिक्षण देता येऊ शकते, हा विचारच मुळात क्रांतिकारी आहे. त्यातून लेखही कोणते? समाजकारण, राजकारण, अर्थकारण! आपण जीवंत राहणार आहोत की नाही, या संभ्रमावस्थेत एखाद्या माणसाला हे सुचूच कसे शकते? आणि ते ही कशासाठी? तर आपल्याकडे असणारे ज्ञान आपल्यापर्यंतच मर्यादित राहू नये, त्याचा प्रसार व्हावा आणि इतरांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून! जिथे शिक्षण, वाचन अशा गोष्टी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मानल्या जात होत्या, तिथे वाचनालय सुरू करणे, हा विचार ते वाचनालय सुरू करेपर्यंत कोणीतरी केला असेल का? आता कदाचित आपण लवकरच मरणाला कवटाळून घेऊ, अशी शक्यता स्वतःलाही वाटत असताना त्या अवस्थेत एखाद्या व्यक्तीला मैना आणि बुलबुलांची भाषा शिकता येऊ शकते? या सगळ्यावरून ते सामान्य होते, यावर कसा काय विश्वास ठेवता येईल?
तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा मधल्या कालखंडाचा अभ्यास करून एकापेक्षा एक श्रेष्ठ विचार त्यांनी मांडले. देशाची फाळणी होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, काही शक्तींविरुद्ध त्यांना हार मानावी लागली. गांधीहत्येत त्यांचा कोणताही सहभाग सिद्ध होऊ शकला नसला, तरीही त्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले आणि मनःस्तापही झाला. त्यांनी त्यांच्या सर्व अनुयायांना, नोकरांना आणि सुरक्षारक्षकांना त्या माणसांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःपासून दूर केले. जेव्हा त्यांना वाटले की, आता आपल्या देहाचा देशासाठी काहीही उपयोग होऊ शकत नाही, त्यावेळी त्यांनी ठरवून उपोषण केले आणि देहत्याग केला. तिथपर्यंत खरेच मृत्यूचीही त्यांच्या जवळ जाण्याची हिंमत झाली नाही.
सावरकरांनी मांडलेली परिस्थिती आणि एकूणच समीकरणं कधीच बदलेली नाहीत. गोष्टींचं बाह्यस्वरूप बदललं आणि तीव्रता कमी-अधिक होत आहे. पण, मूळ मुद्दे आजही तेच आहेत. त्यांनी मांडलेल्या आणि नाकारल्या गेलेल्या गोष्टींचे त्यांनीच सांगितलेले परिणाम आज स्पष्टपणे दिसत आहेत.’देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो.’ किती हा महान विचार! त्या देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी काय नाही केलं? देशावर एवढं प्रेम असावं की, 11 वर्षे नरकयातना भोगल्यानंतर आणि पुढेही मिळालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द होण्याची कोणतीही शक्यता नसताना मायभूमीचा किनारा दिसल्यावर डोळ्यांत आनंदाश्रू येऊन माणूस आनंदाने नतमस्तक होतो. आज आपण जो मोकळा श्वास घेत आहोत, त्यासाठी त्यांनी खूप मोठी किंमत मोजली आहे. त्यांनी दिलेला किमान एक विचार या देशासाठी निर्भीडपणे अंमलात आणता आला, तर ती त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
‘मृत्यूही ज्यास भीत असे’ अशा स्वातंत्र्यवीराबद्दल अधिक काय लिहिणार? भारतभूमीसाठी पूर्ण आयुष्य व्यतीत करणार्या तिच्या लाडक्या पुत्राला शतशः नमन!
- स्नेहा शुक्ल