मुंबई: “मी रामभक्त हनुमान आहे. मी हनुमान चालीसा वाचणे थांबवणार नाही. ठाकरेंची लंका मी जाळणारच! माफिया सेनेचा अंत करणारी ‘पोलखोल’ ही मी करणारच. ही ‘पोलखोल’ सभा फक्त अभियानाचा प्रारंभ आहे. गेल्या २५ वर्षांतील माफिया सेनेचा अंत आणूनच हे ‘पोलखोल अभियान’ संपणार आहे,” असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितले.
भाजपकडून शिवसेनेच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराचे ‘पोलखोल अभियान’ गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ठिकठिकाणी सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते या ‘पोलखोल’ला संबोधित करत असून, स्थानिक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते या सभेला आवर्जून उपस्थित राहतात. नुकतेच धारावी 90 फूट भागातील ‘पोलखोल’ भाजपचे आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, आचार्य पवन त्रिपाठी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी हजर होते. कॅप्टन सेल्वन यांनीही शिवसेनेच्या नाकर्तेपणाच्या कारभारावर तोंडसुख घेतले. मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीत भाजपला भरघोस मते देण्याचे आवाहन कॅ. सेल्वन यांनी यावेळी उपस्थितांना केले.
काळ्याचे सफेद करणार्या व अनेक कंपन्यांद्वारे ‘मनी लॉण्ड्रिंग’ करणार्या नंदकिशोर चतुर्वेदीने कोट्यवधी रुपये केले. काळ्याचे सफेद तुम्ही केले आहेत ना, असा प्रश्न सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. “पर्यावरणमंत्रीआदित्य ठाकरेंनी चतुर्वेदीद्वारा ‘कोमोस्टॉक’ कंपनीत सात कोटी रुपयांचे ‘मनी लॉण्ड्रिंग’ केले. मी दिल्लीत असताना ‘ईडी’, आयकर आणि कंपनी मंत्रालयात गेलो होतो. आदित्य ठाकरेच्या कंपनीत सात कोटी रुपये ‘व्हाईट’ होऊन आले आहेत. त्याची मालमत्ता केव्हा जप्त होणार. आता नंबर कोणाचा,” असा सवाल त्यांनी ‘पोलखोल’मध्ये विचारला.
‘दादरच्या कॅटरिंग कॉलेजसमोर श्री जी होम बिल्डींग बांंधून तयार आहे. ती मोठी इमारत आहे. कित्येक काळापासून तयार, रिकामी आहे. त्याचा मालक श्रीधर पाटणकर व त्यांच्या दोन कंपन्या आहेत. दुसर्या कंपनीच्या मालकीण रश्मी उद्धव ठाकरे आणि तिसर्या कंपनीचे मालक उद्धव ठाकरे आहेत. त्यातून २९कोटी, ८६ लाख, २२ रुपयांचे ‘मनी लॉण्ड्रिंग’ झाले. सर्व कागदपत्रे मोदी सरकारच्या हातात दिले आहेत. त्याचा हिशोब द्यावाच लागणार, असे सोमय्यांनी ‘पोलखोल’मध्ये ठणकावले.
‘विक्रांत’चा हिशोब मागता मात्र, २२ दिवस होऊनही ५७ पैशांचा हिशोब शिवसेना नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनाही देता आलेला नाही, असे सांगून ठाकरेंच्या ‘अलिबाबा आणि ४० चोर’ यांचा हिशोब जनतेसमोर ठेवण्यासाठी हे ‘पोलखोल’ अभियान सुरू आहे,” असे सांगून त्यांनी “स्थायी समितीच्या यशवंत जाधवांच्या हृदयाचा ठोका नाही चुकला, तर ‘मातोश्री’मध्ये राहणार्यांचा चुकला होता. माझे नाव घेणार नाही ना, माझ नाव नाही ना छापणार, अशी त्यांची अवस्था झाली होती,” असे सोमय्या म्हणाले. “मला किती हैराण करता,” असे जाधव म्हणाले. माझ्याकडे दहा टक्केच यायचे, उर्वरित ९० टक्के वांद्रेला जात होते, अशी माहिती जाधव यांनी दिली होती,” असे ही सोमय्यांनी सांगितले.
“नवाब मलिक महिनोन्महिने बाहेर येणार नाहीत, अनिल देशमुख यांचाही हिशोब होणार आहे. या ‘पोलखोल’मध्ये अशा घटना सांगितल्या, तर मुंबईकरांना लाज वाटेल. कोरोना काळात १०० टक्के ‘लॉकडाऊन’ असताना राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब दापोलीच्या किनार्यावर २५ कोटींचा ‘फाईव्ह स्टार रिसॉर्ट’ बांधत होते. संजय राऊतांचा पार्टनर सुजित पाटकर यांच्या अस्तित्वात नसलेल्या ‘हेल्थ केअर’ कंपनीला महालक्ष्मी, वरळी, बीकेसी आदी पाच कंपन्यांचे १०० कोटी रुपयांचे कोरोना केंद्रांची व अन्य ‘कोविड सेंटर्स’चीही कंत्राटं मिळाली, अशी माहिती सोमय्यांनी ‘पोलखोल’ सभेत दिली.