"काम झालेले नसतानाही पुणे मेट्रोचे उद्घाटन होत आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नुकतीच टीका केली. त्यानंतर नरेंद्र मोदींनी रविवारी पुणे मेट्रोच्या उद्घाटनासह अन्य विकासकामांचे लोकार्पण केले. मात्र, मोदींच्या मेट्रो उद्घाटनाची घटना शरद पवारांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसते. कारण, शरद पवार गेल्या जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहेत. त्यांचे समर्थक त्यांना ‘देशाचे नेते’ म्हणत असतात, पणस्वतःचे कर्तृत्व महाराष्ट्रातील ‘साडेतीन जिल्ह्यांपुरते’ मर्यादित असूनही शरद पवारांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. शरद पवारांना पूर्णत्वानंतरच कोणत्याही प्रकल्पाचे उद्घाटन व्हावे, असे वाटत असेल तर त्यांनी, ‘मी अजून देशाचाच काय महाराष्ट्राचाही पूर्णपणे नेता होऊ शकलेलो नाही. त्यामुळे उगाचच मला मोठेपणा देऊ नका,’ असे कधीही म्हटलेले नाही. म्हणजेच,स्वतःचे अर्धवट नेतृत्वही राष्ट्रीय नेतृत्व म्हणून मिरवायचे, पण मोदींनी मात्र प्रकल्पाचे उद्घाटन करायचे नाही, असा दुटप्पीपणा शरद पवार करत असल्याचे दिसते. तेही बरोबरच म्हणा, कारण, शरद पवारांनी आपल्या अर्धशतकी राजकीय कारकीर्दीत बारामतीच्या निवडक विकासाव्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी भरीव कार्य केल्याचे उदाहरण अपवादात्मकच. विशेष म्हणजे, शरद पवार तीनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १५ वर्षे त्यांनी सोनियाचरणी घातलेल्या लोटांगणामुळे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. दहा वर्षे ते स्वतः केंद्रात मंत्री होते, पण त्यांनी राज्यासाठी कोणते विकासप्रकल्प राबवले? नियतीने त्यांना प्रत्येकवेळी संधी दिली, पण त्याची माती करण्यातच शरद पवार मश्गुल राहिले. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन केले आणि आज त्याचे उद्घाटनही केले. आपण जे करू शकलो नाही, ते नरेंद्र मोदी करत आहेत, हे पाहून शरद पवारांना पोटदुखी होणे साहजिकच.
दरम्यान, मेट्रो प्रकल्प पूर्ण झालेला नाही म्हणून त्याचे उद्घाटन नको, असा आक्षेप घेणारे शरद पवार यंदाच्या जानेवारी महिन्यात काय करत होते? तर हवेतून चालणार्या पुणे मेट्रोतून प्रवास करत होते. कारण, मोदी अपूर्ण मेट्रोचे उद्घाटन करत असतील, तर शरद पवार त्यावेळी नक्कीच रुळावर चालणार्या मेट्रोत उभे राहिले नसतील! म्हणजेच, आपण काय बोलतो आणि काय करतो, याचेही भान शरद पवारांना राहिले नसल्याचे यावरुन म्हणावे लागेल. मेट्रो प्रकल्पाशी कसलाही संबंध नसणारे खुद्द शरद पवारच जानेवारी महिन्यात मेट्रोच्या डब्यातून फिरुन आले होते. पण, ते त्यांना आता आठवत नसावे. त्यामागे दोन-तीन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे, मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाचे श्रेय शरद पवारांना घ्यायचे असेल, पण मोदींनी उद्घाटन केल्याने ते शक्य होणार नाही, हे पाहूनच त्यांनी त्यावर टीका केली. दुसरे म्हणजे, पूर्ण-अपुर्ण काम. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विक्रमी वेळात, अतिशय जलदपणे काम करत पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले. पण, कोणतेही काम करताना भ्रष्टाचार, हेराफेरी करुन पैसे खाणे म्हणजे काम पूर्ण होणे, अशी व्याख्या शरद पवार वा राष्ट्रवादी काँग्रेसने करुन ठेवली असावी. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार होते तेव्हा आणि आताही शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर याच व्याख्येने सरकारी कामे रखडतात, अडकतात वा अपूर्ण राहतात. राज्यातील जलसिंचन, सहकारी साखर कारखाने, शेतकरी कर्जमाफी, उद्योगउभारणी, कोरोना केंद्रांची दैन्यावस्था त्याचीच उदाहरणे. अर्थातच, मेट्रो प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने शरद पवार वा राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या व्याख्येप्रमाणे काम पूर्ण करता करता कसलाही घोटाळा करण्याची संधी लाभली नाही. म्हणूनच ते उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने-अर्धवट राहिल्याने शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
दरम्यान, शरद पवारांचा इतिहासच अर्धवटपणाचा आहे. म्हणजे, ते तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण त्यांना कधीही पाच वर्षे पूर्ण करता आली नाहीत वा करू शकले नाहीत. प्रत्येकवेळी त्यांचे मुख्यमंत्रिपद अर्धवटच राहिले. पुढे सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा पुढे करुन ते काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाने नवी चूल मांडली. पण सोनिया गांधींच्या विरोधाचा मुद्दाही शरद पवारांनी अर्धवटच सोडला आणि पुन्हा त्यांच्याचबरोर सरकार स्थापन केले. आताचे तिघाडी सरकार सत्तेवर आल्यापासूनही कोणताही प्रश्न धसास लावल्याची कामगिरी त्यांनी करुन दाखवलेली नाही. शरद पवार मार्गदर्शक असलेल्या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न अर्धवट ठेवला सोडवला नाही. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अर्धवट ठेवला, सोडवला नाही. एसटी कर्मचारी गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, पण त्यांचा प्रश्नही अर्धवट ठेवला, सोडवला नाही. शेतकरी घायकुतीला येऊन आत्महत्या करतोय, पण त्यांचा प्रश्नही अर्धवट ठेवला, सोडवला नाही. चक्रीवादळ, महापुरासारख्या आपत्तींनी सामान्य माणूस उद्ध्वस्त झाला, पण त्यांचा प्रश्नही अर्धवट ठेवला, सोडवला नाही आणि ही यादी अशीच पाच-पन्नास-शंभर-हजार प्रश्नांच्याही पुढे जाईल, पण ते प्रश्न महाभकासवाल्यांनी सोडवले नाहीच. म्हणजे, ज्यांचे सगळेच अर्धवट आहे, ज्यांचे आयुष्य अर्धवटपणा, अर्धवट कामे करण्यातच गेले, ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना शहाणपणा शिकवत आहेत, याहून हास्यास्पद काय असू शकेल?
दरम्यान, पुणे मेट्रोच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही शरद पवार म्हणाले. पण, युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून भारतीयांना परत आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार कंबर कसून कामाला लागले आहे. अन्य मोठमोठ्या राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना युक्रेनमध्ये वार्यावर सोडलेले असताना ‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून मात्र हजारो भारतीय स्वदेशात परतले आहेत. जोपर्यंत युक्रेनमधील एक ना एक भारतीय मायदेशी येत नाही तोपर्यंत ‘ऑपरेशन गंगा’ सुरू राहील. पण म्हणून पंतप्रधानांनी देशातील उर्वरित सगळी कामे सोडून फक्त त्याच एका कामाकडे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बघत राहावे, असे शरद पवारांना म्हणायचे आहे का? अशी भाषा गल्लीबोळातील विरोधकांकडून केली गेली तर ठीक, पण शरद पवारांनी इतके बाळबोध वक्तव्य करुन स्वतःलाही त्याच पातळीवर आणून ठेवल्याचे म्हणावे लागेल. अर्थात, सगळेच अर्धवट असलेल्यांकडून आणखी काय होणार, ते अर्धवटपणे टीका करत राहणार!