राहुल गांधींचा वर्ग कोणता?

    01-Mar-2022
Total Views | 122

Rahul Gandhi
 
 
 
नेत्यांची शाळा घेताना प्रत्यक्षात राहुल गांधी कोणत्या वर्गात येतात? २४ तास काम करणाऱ्या की, ‘एसी’मध्ये बसून भाषण ठोकणाऱ्या? की ट्विटरवर टिवटिवाट करणाऱ्या?
 
 
"एकीकडे काँग्रेसमध्ये २४ तास काम करणारे लोक आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये काही लोक फक्त ‘एसी’मध्ये बसून मोठमोठी भाषणे ठोकतात. काही लोक, तर फक्त कामात खोडा घालतात, असे लोक भाजपमध्ये जाऊ शकतात,” अशा शब्दांत वायनाडचे काँग्रेसी खासदार आणि पक्षाचे अघोषित अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेत्यांची शाळा घेतल्याचे वृत्त नुकतेच माध्यमांतून समोर आले. मात्र, नेत्यांची शाळा घेताना प्रत्यक्षात राहुल गांधी कोणत्या वर्गात येतात? २४ तास काम करणाऱ्या की, ‘एसी’मध्ये बसून भाषण ठोकणाऱ्या? की ट्विटरवर टिवटिवाट करणाऱ्या? राहुल गांधींनी सार्वजनिक राजकारणात पाऊल ठेवल्यापासून ते कधीही पक्षासाठी काम करताना दिसले नाहीत. उलट राहुल गांधींनी काम केले ते फक्त स्वत:साठी, कुटुंबासाठी त्यासाठी त्यांनी आपल्या अवतीभोवती स्तुतीपाठकांचा गोतावळा जमवला आणि पक्षहितासाठी मत मांडणाऱ्यांचे महत्त्व कमी केले. काँग्रेसमधील ‘जी-२३’ नावाने ओळखले जाणारे नेते कोण होते? त्यांनी गेल्या काही काळापासून गांधी कुटुंबापेक्षा वेगळी भूमिका घेतली, ती पक्षासाठीच ना? त्यांची अवस्था आज काय आहे? काँग्रेसमधले कोणते निर्णय त्यांच्याशी सल्लामसलत करुन घेतले जातात? बाकी नेते तर पहिल्यापासून गांधी कुटुंबाची हुजरेगिरीच करत आले. त्यांचे सोडा, पण जे पक्षाची ढासळती परिस्थिती पाहून पक्षाला उभारी देण्यासाठी काही करु इच्छित होते, त्यांनाच बाजूला लोटले गेले. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडूनच काम करणाऱ्यांना निर्णयप्रक्रियेत सामील करुन घेतले जात नसेल, तर काँग्रेसमध्ये ‘एसी’त बसून भाषणे ठोकणारेच शिल्लक उरतील. त्यांनाही ‘पक्ष सोडून जा’ असा सल्ला राहुल गांधींनी दिला, तर काँग्रेस पक्षच अस्तित्वात राहाणार नाही. कारण, सध्याच्या काँग्रेसमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक काम न करणारेच आहेत आणि त्यात राहुल गांधींचाही समावेश होतो.
 
 
माणूस राजकारणात उतरला की, तो २४ तास राजकारणीच असतो. पण, राहुल गांधींकडे पाहिले की, तसे अजिबात वाटत नाही. राहुल गांधी स्वत:च ‘पार्टटाईम’ राजकारणी असून, ‘फुलटाईम’ ट्विटरवीर अन् कॉमेडियन आहेत. राहुल गांधींचे राजकारण वा पक्षकार्य निवडणुका आल्या कीच सुरु होते, तोपर्यंत ते सुट्ट्या ‘एन्जॉय’ करत असतात. निवडणुकीतही प्रचार संपला की, राहुल गांधी श्रमपरिहारार्थ बँकॉक वा अन्य कुठल्या परदेशी शहरात पळतात वा मामाचे गाव गाठतात. महत्त्वाचे म्हणजे, विविध विषयांवर पक्षाची भूमिका नेमकी काय हे जनतेला सांगण्याची आवश्यकता असते, तेव्हा राहुल गांधी समोर येत नाहीत वा भाषणेही ठोकत नाहीत, तर ‘एसी’मध्ये बसून ट्विटरवर सक्रिय होतात, म्हणजे जो राजनेता स्वत:च पक्षासाठी २४ तास काम करत नाही, ज्याला राजकारण ‘पार्टटाईम’ काम वाटते, ज्याला ‘एसी’मध्ये बसून ट्विटरवर टिवटिवाट केला म्हणजे काम झाले असे वाटते, तो ‘फुलटाईम’ काम करण्याच्या शिकवणीसाठी नेत्यांची शाळा घेतो, हाच मोठा विनोद! म्हणूनच असा विनोद करणारे राहुल गांधी राजकारणी असू शकत नाहीत, ते कॉमेडियन मात्र नक्कीच शोभून दिसतील. तसेही त्यांना आलुपासून सोने तयार करण्याचा, साडेपीचत्तीस शब्दसंशोधनाचा वा संसदेत विदुषकी चाळे करण्याचा अनुभव आहेच, त्यामुळे पक्ष सोडा, असे जे राहुल गांधींनी म्हटले ते विधान त्यांचे स्वत:लाच लागू पडते. पण, अशा बिनकामाच्या माणसाला भाजप कशाला स्वीकारेल? एक मात्र होऊ शकते, राहुल गांधींनी राजकारण सोडल्यास काँग्रेसमध्ये थोडीफार चेतना येऊ शकते, २४ तास काम करु इच्छिणाऱ्यांना संधी मिळू शकते. पण ते होणार नाही, त्यामुळे काँग्रेस ‘एसी’मध्ये बसून कथितपणे राजकारण करणाऱ्यांचाच पक्ष राहील हे नक्की!
 
 
दरम्यान, राहुल गांधींनी २४ तास काम करणाऱ्यांचा अन् फक्त भाषण ठोकणाऱ्यांचा उल्लेख केला. पण, २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला अन् राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हापासून काँग्रेसला ‘फुलटाईम’ अध्यक्षसुद्धा नाही. राहुल गांधींमध्ये पराजय पचवून पुन्हा पक्षाला उभारी देण्याची धमक नसल्याने ते काँग्रेसचे अधिकृत अध्यक्ष होत नाहीत आणि अन्य कोणालाही होऊ देत नाहीत. गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी यावा, असे म्हणत राहुल गांधींनी राजीनामा दिला. पण, तसे काही झाले नाही. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधींचीच पुन्हा पुन्हा निवड करण्यात आली. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या २४ तास काम करु शकत नाहीत, त्यावरुन ‘जी-२३’ नामक नेत्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला गांधी कुटुंबाच्या पक्षीय मालकीविरोधातील मत ठरवत संबंधित नेत्यांनाच बेदखल केले गेले, त्यामुळे पक्षात राहिले फक्त हांजी हांजी करणारेच! ते गांधी कुटुंबाहाती एकाधिकार देऊन स्वत:चा स्वार्थ साधणारेच नेते होते व आहेत. त्यांना पक्षाशी काही घेणे देणे नाही. ‘गांधी कुटुंबाच्या नावाखाली पक्ष जीवंत राहू द्या, आम्ही आम्हाला हवे ते आमच्या आमच्या पातळीवर करत राहू,’ अशा मानसिकतेच्या नेत्यांचा यात समावेश होतो. ‘एसी’मध्ये बसून भाषण ठोकणारे यातच आले म्हणजेच, ज्या पक्षाला गेल्या तीन वर्षांपासून अध्यक्षही निवडता आलेला नाही, गांधी कुटुंबामुळेच काम करु इच्छिणारे पक्षापासून दुरावले अन् गांधी नावाचा फायदा घेणारेच शिल्लक राहिले, त्या पक्षात २४ तास काम करणारे येऊच शकत नाहीत वा टिकूच शकत नाहीत. राहुल गांधींच्याच विधानाप्रमाणे उरलेल्या काम न करणाऱ्या, कामात खोडा घालणाऱ्यांनीही पक्ष सोडला, तर काँग्रेसही देशव्यापी पक्ष म्हणून राहणार नाही. कदाचित राहुल गांधींनाही तसेच व्हावेसे वाटत असेल, जेणेकरुन पक्षात काम करणारे अन् भाषण ठोकणारे, असे कोणीच प्रभावी व्यक्ती राहणार नाहीत आणि उरल्यासुरल्या, तोळामासा झालेल्या पक्ष संघटनेवर गांधी कुटुंबाला अधिकार गाजवता येईल, काँग्रेस गांधी कुटुंबाची अधिकृत ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी होईल!
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121