‘स्टार्टअप’ संस्कृतीची एक काळी बाजूही आहे. यात पैसे लावणारे लोक इथल्या यशावर सट्टा लावत असतात. दुसर्या बाजूला ही उत्पादने चालतात किंवा चालत नाहीत. ट्विटरच्या आजच्या स्थितीला ट्विटर चालविणारी मंडळीही कारणीभूत आहेत.
एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यापासून या लढाईला वेगळाच रंग चढला आहे. कंपनी ताब्यात घेताच मस्क यांनी कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले. ज्या भारतीय प्रमुखाचा आपल्याकडल्या देशी अभिव्यक्तिवाल्यांना अभिमान होता, तो कर्मचारीही मस्क यांनी गुंडाळला. इतकेच नव्हे, तर ट्विटरवर नक्की तुम्हीच आहात ना याची खात्री करण्यासाठी सशुल्क प्रक्रियाही अवलंबिण्याचे सूतोवाच केले आहे. वर वर पाहाता ही लढाई कॉर्पोरेट भाषेत ज्याला ‘मर्जर आणि अक्विजिशन’ म्हणतात तशी वाटत असली तरी त्याला अनेक कंगोरे आहेत. यात दुटप्पी सिव्हील सोसायटी कार्यकर्ते आहेत. विद्यापीठात बसून अभिव्यक्तीचा गांजा पेटवून त्याच नशेत रमणारे आहेत. राष्ट्रवाद म्हणजे काय हे समजून न घेता राष्ट्रवादाच्या विरोधात पोपटपंची करणारे आहेत.
परवा कोण्या देशात ट्विटर विरोधात समलैंगिक मंडळींचा मोर्चाही आयोजित केला होता. ही लढाई नक्की कसली आहे, असा प्रश्न पडावा, असे घटनाक्रम सध्या सुरू आहेत. खरंतर आपल्या लैंगिकतेला सन्मान मिळावा, समानतेची वागणूक मिळावी यासाठी या संस्था अथवा व्यक्ती अशा चळवळी चालवितात. लोकशाहीप्रधान देशात यात वावगे काहीच नाही. मात्र, अशा मंडळींचा कसा वापर करून घेतला जातो, याचे हे जीवंत उदाहरण आहे. वस्तूत: ट्विटरचा दररोज तोटा साधारणत: 32 कोटींचा होता. उत्पादन म्हणून ट्विटर खरे तर काहीच नाही. वापरकर्त्यांच्या जनसंवादापेक्षा वेगळे असे काही उत्पादन म्हणून ट्विटरकडे काहीच नाही.
असे असले तरी जनमानसाच्या मनाचा आणि विचार प्रक्रियेचा ताबा घेणार्या समाजमाध्यामध्ये ट्विटरचा हिस्सा मोठा आहे.
सिव्हील सोसायटीमध्ये राजकारण जनमानस घडविण्याचे काम करते, तर माध्यमे मजकूराच्या आकारणीचे काम करतात. तथ्य, प्रचार, प्रसार, मिथ्या, विश्वास, मते या सगळ्यांचे कंगोरे हाताळण्याचे काम माध्यमे करीत असतात. ‘डिजिटल’ माध्यमे ही हाताळायला सोपी. रंग, चित्र, चलचित्र अशा माध्यमनिर्मितीतल्या महत्त्वाच्या घटकांवर तंत्रज्ञान आधारित माध्यमांनी आपली हुकूमत मिळविली. आशयनिर्मितीचे नवे व अपांरपरिक निर्मातेही यातून उदयाला आहे. एखाद्या 100 वर्षं जुन्या दैनिकाचा रोजचा खप जितका असेल, तितकेच ‘फॉलोअर्स’ सोशल मीडियाच्या एखाद्या ‘ब्लॉगर’चे किंवा ‘इन्फ्लुएन्सर’चे असू शकतात. ट्विटरमध्ये काम करणार्यांनी नेमके हेच हेरले. उच्च विद्याविभूषितांमध्ये एक मोठी जमात अशी आहे ज्यांना वाटते की ते जे काही सल्ले देतात ते लाखमोलाचे आहे. ते ज्याकाही सेवा देतात त्या अनमोल आहेत. समाजमाध्यमे व तंत्रज्ञानावर आधारित अभिव्यक्तीच्या क्षेत्रात तर अशांचा भरणा इतका मोठा आहे की, विचारायची सोय नाही. पर्यायाने यांच्या आर्थिक अपेक्षा भरमसाठ असतात.
‘स्ट्रार्टअप’संस्कृतीत तयार झालेली ही भुते आहेत. ‘स्ट्रार्टअप’ हा एक प्रकारचा जुगार झाला आहे. यात पैसा लावणारे अशा दहा संकल्पनांवर पैसा लावत असतात, यातल्या दोन कंपन्या यशस्वी ठरतात, तर उरलेल्या आड गंडतात. मग त्या दोन कंपन्यांच्या नफ्यातून आजचा तोटा भरून काढला जातो. ही दुष्टचक्रे सुरूच राहातात. यात काम करणार्या नोकरदारांची मात्र चंगळ असते. कारण, एक फसला की ते दुसर्या वाटेला लागतात. या प्रक्रियांमुळे मनुष्यबळाचे मूल्य फसव्या पद्धतीने वाढत चालले आहे. एकदिवस हा फुगा फुटतो आणि ट्विटरसारख्या गोष्टी घडायला लागलात. फेसबुक किंवा इन्स्टासारखी हवेतील उत्पादने सगळ्यांना माहीत असतात. पण, त्यांच्याबरोबरच कल्पिली गेलेली अन्य उत्पादने फसलेली असतात, याची कुणालाच पर्वा नसते.
ही वाढ नसून सूज आहे आणि ती कधीतरी उतरतेच. मराठीत किंवा अन्य भाषांमध्ये अॅपच्या किंवा युट्यूब पेजच्या माध्यमातून सुरू झालेले माध्यम प्रयोग खूप चांगले चालतात. मात्र, ते दोन वर्षांपेक्षा जास्त टिकत नाही. ही दोन वर्षे व्यवसाय म्हणून त्यात कोणीतरी गुंतवणूकदार येईल आणि मदत करेल, अशी वाट पाहाण्यातली असतात. माध्यम चालविणारी व्यक्ती नंतरच्या काळात निराशेत जाते. त्याचे कर्मचारी आणि वाचक किंवा प्रेक्षक मात्र अन्य प्लॅटफॉर्मकडे निघून जातात. एलॉन मस्क आपल्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, इलेक्ट्रिक कारचे स्वप्न वास्तवात उतरवून दाखविण्याचे कर्तृत्व त्यांच्या नावावर जमा आहे.
अशी रोकडा उत्पादने निर्माण करणारी माणसे अशा हवेतल्या उत्पादनांकडे पाहू लागतात तेव्हा त्यांना त्यातल्या अनैसर्गिक वाढी आणि खर्चच दिसायला लागतात. त्यांना यातले स्थावर काहीच दिसत नाही. हजारो लोकांना व्यवसाय देणार्या संस्था किंवा उद्योग हे चिरस्थायी असावे लागतात. एखादा भक्कम ब्रॅण्ड उभा करण्यासाठी तो आधी वर्षानुवर्षे टिकावा लागतो. मस्क यांच्यासारखा माणूस अशी उत्पादने पाहात असताना पुढची किमान 25 वर्षे ही उत्पादने व्यवस्थित चालतील, याच्याकडे अशा महत्त्वाकांक्षी लोकांचे लक्ष असते. कारण, त्यांचे अस्तित्व, रुबाब आणि काही वेळा मुजोरीही अशा भक्कम उत्पादनांच्या अस्तित्वावर अवलंबून असते.
ट्विटरच्या कर्मचार्यांच्या उद्दामपणाच्या तर कथाच प्रसिद्ध आहेत. एकदा त्यांनी भारताच्या उपराष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलची ‘ब्लू टिक’ काढली होती. भारत सरकारने यावर संताप वक्त करताच ती पुन्हा बहाल केली. एखाद्या सार्वभौम देशाच्या प्रमुख पदाबाबत केलेला हा उच्छृंखलपणा निषेर्धाहच होता. मात्र, अभिव्यक्तीच्या जगातून याविरोधात एकही सूर उमटला नाही. कारण, अशा दुटप्पी अभिव्यक्तीवाल्यांचा ट्विटर हा अड्डा झाला होता. तुम्ही कोणीही असा, पण ज्या भूमीत तुम्हाला काम करायचे आहे, त्या भूमीचा कायदा तुम्हाला पाळवा लागतो, हा साधनसुचितेचा साधा नियमही ट्विटर पाळू शकले नाही.
या सगळ्याला डाव्या व सोरेसछाप विचारसरणीची वैचारिक किनार आहे. आपल्याकडे मार्क्सवादी विचाराचे ज्येष्ठ पत्रकार भांडवलशाहीच्या विरोधात बोलत राहातात. मात्र, नोकरी कुठल्या ना कुठल्या जैन किंवा दर्डांकडेच करीत असतात. हा ही प्रकार काहीचा तसाच आहे. मस्क यांनी या दुटप्पीपणाला पहिला दणका दिला आहे. कारण, अशा अहंकारातून यांनी कधीतरी त्यांच्या शेपटीवर पाय दिला होता, ज्याप्रकारे त्यांनी ट्विटर खरेदी केले, त्यावरून त्यांचा राग लक्षात यावा. आता ते हा प्लॅटफॉर्म ‘ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’ म्हणून वापरू शकतात. स्वत:चा हेतू बाळगून माध्यम चालविणार्यांच्या कचाट्यातून ट्विटर मुक्त झाले असले तरी त्याचे भविष्य येणारा काळच ठरवेल.