मुंबई : कोकणात होऊ घडलेल्या रत्नागिरीच्या बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. विद्यमान फडणवीस शिंदे सरकारच्या पाठपुरावा आणि पुढाकारामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाची भूमिका बजावत असलेल्या ठाकरे गटातील नेत्यांची परस्पर विरोधी भूमिका ठाकरे गटातील विसंवादाचा पुढील अंक सुरु झाल्याचे संकेत देत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत आणि सरकारमधील सर्वच घटक एकमताने या प्रकल्पाला पाठिंबा देत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे तर दुसरीकडे संख्याबळाच्या बाबतीत आधीच पिछाडीवर असलेल्या ठाकरे गटातील अंतर्गत वाद आणि सुंदोपसंदी पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
उद्योग मंत्र्यांच्या बैठकीला साळवींची उपस्थिती तर राऊतांची दांडी
बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरीच्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या एका संयुक्त बैठकीचे आयोजन उद्योग प्राप्त मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह राजापूर-लांजा-साखरपाचे स्थानिक आमदार आणि ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आणि इतर अधिकारी हे देखील उपस्थित होते. मात्र, रत्नागिरीचे स्थानिक खासदार असलेल्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी मात्र या बैठकीला दांडी मारली आहे.
इतकेच काय तर बैठकीला उपस्थित असलेल्या राजन साळवी यांनी रिफायनरी बाबत सकारात्मक भूमिका मांडली असून त्याचे आपण स्वागत करत आहोत, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी देखील ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे स्थानिक आमदार राजन साळवी बैठकीला उपस्थित राहून प्रकल्पाविषयी सकारात्मक पवित्रा घेतात तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत आपण प्रकल्पाचा विरोधात असल्याचे म्हणत आपल्याच सहकारी आमदाराच्या भूमिकेशी फारकत घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा ठाकरे गटातील दुही उफाळून आली आहे.
२ लाख कोटींचा प्रकल्प आणि लक्षावधी रोजगार
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'बारसू येथे होत असलेल्या रिफायनरीमुळे कोकणात पुन्हा एकदा विकासाचे पर्व सुरु होणार आहे. कोयना नदीचे पाणी या रिफायनरीला देण्याचा तत्वतः निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पाची किंमत तब्बल २ लाख कोटी असून त्यात प्रकल्पाच्या सुरुवातीला एक लाख रोजगार निश्चितपणे उपलब्ध होणार आहेत. नंतरच्या टप्प्यात प्रत्यक्षपणे ३ हजार तर अप्रत्यक्षपणे ७५ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. प्रकल्पासाठी एकूण ६ हजार २०० एकर जमिनीची गरज असून त्यापैकी २ हजार ९०० एकर जागेच्या संपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बरसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरीतून २ लाख कोटींची गुंतवणूक तर लक्षावधी हातांना रोजगार मिळणार आहे.
तर त्यांनाही गुवाहाटीला घेऊन जाईल
माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी सरकार पडणार असल्याच्या केलेल्या दाव्यावर बोलताना सामंत म्हणाले की, 'आपल्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी अशा प्रकारच्या घोषणा होत असतात. खैरे देखील संभाजीनगरमधील त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो. मुळात पाठिंबा असलेल्या आमदारांपेक्षाही दहा ते बारा आमदार सरकारला पाठिंबा देण्यासाठी आजही तयार असून ते आमच्या संपर्कात आहेत. खैरे धार्मिक आहेत त्यामुळे त्यांचा कदाचित अशाप्रकारच्या भविष्यवाणीवर विश्वास असावा पण जर त्यांना गुवाहाटीला यायचे असेल तर मी स्वतः त्यांना संभाजीनगरला जाऊन गुवाहाटीला घेऊन जाईल,' असे सामंतांनी म्हटले आहे.