मुंबई : मुंबई पोलीस 'मुंबई क्रिकेट असोसिएशन’ला (एमसीए) क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी ‘एमसीए’ला ३५ स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती ‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.
अनिल गलगली यांनी ‘एमसीए’ला विविध क्रिकेट सामन्यांसाठी दिलेली सुरक्षा आणि त्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा शुल्काची विषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांनी अनिल गलगली यांना गेल्या आठ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल नुकतीच माहिती अधिकार अंतर्गत माहिती दिली. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ‘एमसीए’च्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर ९.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे.
दि. १ एप्रिल, २०१९ ते दि. ३१ मार्च, २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही. कारण, किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पत्र लिहून ‘एमसीए’ने थकबाकी न भरल्याबद्दल ‘एफआयआर’ नोंदवावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे वसुलीसाठी कार्यवाही करत असोसिएशनची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी केली आहे.