नवी दिल्ली : यूकेमधल्या ब्रिस्टल येथे राहणारा ल्यूक ग्रेनफेल शॉ हा तरूण सोमवारी सायकलवरून थेट काशीत येऊन पोहोचला. २४ वर्षाच्या या तरूणाने त्यास चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचे कळल्यावर आपल्या आयुष्याचे ध्येय बदलून टाकण्याचे ठरवले होते. जगाचा निरोप घेण्यापूर्वी हजारो कॅन्सरग्रस्त मुलांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यासाठी तो सध्या प्रयत्नशील आहे. यासाठी त्याने ब्रिस्टल ते बीजिंग असा सायकल प्रवास करायचे ठरवले होते.
ल्यूक ग्रेनफेल शॉ कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी निधी गोळा व्हावा म्हणून जगभर फिरत होता. ब्रिस्टल ते बीजिंग अशा साधारण तेरा हजार किमी सायकलच्या प्रवासात त्याने तीन कोटी रुपये निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विशेष म्हणजे या कार्यात त्यांच्या आईचाही त्यास पाठिंबा आहे.
'काशी ही मोक्षनगरी असली तरी आम्ही जगण्याच्या आणि जीवन देण्याच्या आशेने इथे आलो. मी वाराणसीच्या आध्यात्मिक शक्तीबद्दल खूप ऐकले आहे. म्हणूनच या उदात्त कार्यासाठी मी काशी विश्वनाथ आणि पवित्र गंगेचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो. ही नगरी केवळ मोक्षच नाही तर जीवनदायीही आहे.', असे ल्यूकने काशीबद्दलची आशा व्यक्त केली. भारतातील लोकांनी त्यांना खूप प्रेम दिल्याचेही त्याने सांगितले.