हिंदूंचा दुणावलेला आत्मविश्वास

    24-Sep-2021
Total Views | 146

hindu_1  H x W:


हिंदूंनी ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्याची मागणी केली आणि अमेरिकेतील फ्लोरिडासह अन्य राज्यांनीही हिंदू सण-उत्सवांचे कौतुक करण्याची तयारी केली. हिंदूंच्या इतरांशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेतून ‘हिंदू हेरिटेज मंथ’ आकाराला आलेला असून, त्याला भारताच्या जागतिक प्रतिमेचा, आश्वासकपणाचा आधार आहे, तसेच हिंदूंच्या दुणावलेल्या आत्मविश्वासाचे ते प्रतीक आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात संपूर्ण ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच राज्यपाल रॉन डेसंटिस यांनी केली. त्यानंतर ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्यासाठी फ्लोरिडात जय्यत तयारी सुरू झाली, त्याचवेळी अमेरिकेतील टेक्सास, न्यू जर्सी, ओहियो या राज्यांनीही त्याला पाठिंबा दिला. त्यांच्या राज्यपालांनी आपल्याही राज्यांत ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्याविषयी लेखी निवेदन दिले आणि अमेरिकेतील हिंदूधर्मीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सातासमुद्रापार अमेरिकेतील राज्यांना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? त्याचे उत्तर आजच्या भारताच्या स्थितीत, मानसिकतेत आहे.


आताचा भारत यशस्वीपणे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करणारा भारत आहे. विविध जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करून आजचा भारत आत्मविश्वासाने उभा आहे. आजचा भारत इतरांना आधार देणार्‍या स्वरूपात दिसतो, जगाला भारताविषयी विश्वास वाटतोे, कारण इथले बहुसंख्य नागरिक हिंदू आहेत. पण, हिंदू बहुसंख्य असल्याने काय झाले व त्याचा भारताच्या जागतिक प्रतिमानिर्मितीवर काय परिणाम झाला? तर लैंगिक समानता, परस्पर समन्वय, सर्व पंथांचा समादर, पर्यावरण संतुलन, शांती, अंत्योदयाच्या विविध संकल्पना यासारख्या जागतिक सहअस्तित्वाच्या विविध कल्पना आहेत. त्या सर्वच संकल्पना भारतात प्रकट रूपात दिसतात, त्याचे कारण इथे बहुसंख्येने असलेले हिंदूधर्मीय! १९४७ साली भारत ब्रिटिशांच्या अन्यायी जोखडातून मुक्त झाला आणि त्याने संविधानाचा स्वीकार केला. संविधानात वरील सर्वच संकल्पनांचा समावेश केलेला आहे. पण, संविधान लागू केले म्हणजे काम झाले असे होत नाही, तर त्याचे पालन करणारी जनताही असावी लागते आणि भारतात बहुसंख्य हिंदूंच्या रूपात ती अस्तित्वात होती. हिंदूधर्मीयांत वरील संकल्पनांची व्यापकता कमी-अधिक प्रमाणात प्रथमपासूनच होती आणि म्हणूनच त्यांची अंमलबजावणी करताना इथल्या राज्यकर्त्यांसमोर अडचणी, समस्या निर्माण झाल्या नाहीत. परिणामी, जगाच्या पाठीवर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक भाषिक, धार्मिक, प्रादेशिक विविधता असूनही हिंदू बहुसंख्येच्या भारतात वरील सर्वच संकल्पना प्रत्यक्षात अवतरलेल्या दिसतात.


मात्र, इथला बहुसंख्य नागरिक हिंदू आहे, म्हणूनच इथे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्याच्याच दमनाचे प्रयोगही झाले. धर्मनिरपेक्षता म्हणजे, अल्पसंख्यकांचे आणि त्यातही मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचा उद्योग कित्येक दशके सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसी सरकारांनी केला. मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण करतानाच हिंदूंमधील कुप्रथांची जाहीर निंदा-नालस्ती करून जगासमोर हिंदूंविषयी तिरस्कार, घृणेला जन्म देण्याचे किंवा हिंदूच मानवतेसमोरील मुख्य धोका आहे, हे सांगण्याचे प्रकार अनेक वर्षे केले गेले. त्यातूनच अमेरिकेतील ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या आगावूपणाचा उदय झाला. अर्थात, त्यातही कोणी वास्तविक बुद्धिजीवी, विचारवंत नव्हे तर नक्षल समर्थक, अराजकाचे पुरस्कर्ते, हिंसाचाराची पाठराखण करणारे लोकच सामील झाले होते. पण, द्वेषाच्या पायावर आयोजित केलेली ती परिषदही अपयशी ठरली. त्या पार्श्वभूमीवर फ्लोरिडासह अन्य अमेरिकन राज्यांनी ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा व हिंदूविरोधकांना सणसणीत चपराक लगावणाराच.


दरम्यान, ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेच्या आयोजनाआधी त्याला अमेरिकेतील हिंदूंनी व हिंदू संघटनांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. हिंदूंच्या विरोधामुळे त्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला नाही, त्याचवेळी अमेरिकेतील हिंदूंनी हिंदू धर्म व हिंदुत्वाविषयीच्या माहितीच्या प्रचार-प्रसारासाठी पुढाकार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांनी, संस्था, संघटनांनी विविध सरकारांकडे ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्याची मागणी केली. पण, एखाद्याने कोणाकडे एखादी मागणी केली आणि ती मान्य झाली असे होत नसते, तर त्याआधी संबंधितांची प्रवृत्तीही तपासली जाते. तसे आताही झाले व ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्याची मागणी मान्य केली गेली. कारण, हिंदूंचे फ्लोरिडा, टेक्सास, न्यू जर्सी, ओहियो व अमेरिकेच्याही विज्ञान, शिक्षण, कायदा, राजकारण, उद्योग-व्यवसाय, संस्कृती, संगीत, कला, क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. तसेच हिंदूंनी नेहमीच तिथल्या स्थानिक सरकारांशी आणि समाजाशी सौहार्दाने, समादर-समन्वयाच्या भावनेने राहण्याचे धोरण अवलंबले. हिंदूंच्या मायभूमीत म्हणजे भारतात जागतिक सहअस्तित्वाच्या संकल्पना प्रत्यक्षात आलेल्या असल्याने अमेरिकेतील हिंदू तिथेही त्यानुसारच जगत आले. त्यातूनच भारताची प्रतिमा व तिथून अमेरिकेत आलेल्या हिंदूंच्या जीवनपद्धतीविषयी स्थानिक जनतेत व लोकप्रतिनिधींतही विश्वासाचे वातावरण तयार झाले.


दुसर्‍या बाजूला अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांत मुस्लिमांकडे मात्र संशयाच्या नजरेनेच पाहिले जाते. म्हणजे, यादवी युद्धाने, अंतर्गत बंडाळीने त्रासलेल्या अनेक मुस्लीम देशांतून पलायन केलेल्या शरणार्थ्यांनी अन्य देशांत आश्रय घेतला. पण, काही काळाने ज्यांनी आसरा दिला, त्यांच्यावरच उलटण्याचे उद्योग या मुस्लीम शरणार्थ्यांनी-त्यांच्यातील धर्मांधांनी केले. तिथल्या सरकारांचा विरोध करतानाच ‘शरिया’ कायद्यानुसार अन्य धर्मीयांनी, मुली-महिलांनी वर्तन करावे, अशी दांडगाई त्यांनी केली. त्यांचे म्हणणे अमान्य करणार्‍यांवर हिंसक हल्लेही केले, अनेकांचा जीव घेतला. तसेच, आज जगातील सर्वच देशांना इस्लामी दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. पण, त्याविरोधात कोणीही मुस्लीम ठामपणे उभा ठाकताना दिसत नाही. त्यातूनच सर्वच मुस्लीमधर्मीय दहशतवादाचे समर्थक असल्याची धारणा तयार झालेली आहे. परिणामी, समोर एखादी मुस्लीम व्यक्ती आली की, अन्य समाजगटांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आणि तो समाजगट त्यांच्यापासून अंतर राखण्यास पसंती देतो. पण, हिंदूंबद्दल असे कधीही झालेले नाही. कारण, हिंदूंची जागतिक सहअस्तित्वाच्या संकल्पनानुरूप जगण्याची मानसिकता आणि भारताची जागतिक प्रतिमा. त्यातूनच ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या परिषदा कोलमडल्या, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, तर हिंदूंनी ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्याची मागणी केली आणि फ्लोरिडासह अन्य अमेरिकन राज्यांनीही हिंदू सण-उत्सवांचे कौतुक करण्याची, ते साजरे करण्याची तयारी केली. हिंदूंच्या इतरांशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेतून ‘हिंदू हेरिटेज मंथ’ आकाराला आलेला असून, त्याला भारताच्या आजच्या जागतिक प्रतिमेचा, आश्वासकपणाचा आधार आहे, तसेच हिंदूंच्या दुणावलेल्या आत्मविश्वासाचे ते प्रतीक आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121