नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) नुकसान भरपाईपोटी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तब्बल ७५ हजार कोटी रुपयांची भरपाई दिल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाच्यावतीने गुरुवार, दि. १५ जुलै रोजी देण्यात आली.यामध्ये महाराष्ट्राला पाच वर्षांच्या कालावधीसाठी ५९३७.६८ कोटी रुपये, तर दोन वर्षांच्या कालावधीसाठी ५६३.४३ कोटी असा एकूण ६५०१.११ कोटी रुपये निधी या नुकसानभरपाईसाठी वितरित करण्यात आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या ‘जीएसटी’ परिषदेच्या ४३ व्या बैठकीत केंद्र सरकार १.५९ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेईल आणि ते राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देईल, असा निर्णय घेण्यात आला होता. यातून राज्यांना ‘जीएसटी’ नुकसानभरपाईसाठी मिळणार्या रकमेतली तूट भरून काढता येईल आणि एक आर्थिक स्रोत उपलब्ध होईल. याच व्यवस्थेअंतर्गत, राज्यांना १.१० लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले होते.