Adv. प्रदीप गावडे यांच्या कारवाईनंतर भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षांचा सरकारला इशारा
मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव Adv. प्रदीप गावडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यावर कारवाई करत मुंबई पोलीसांनी पुण्यातून अटक केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या राज्य सरकारविरोधात राज्यभर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिला आहे.
राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असताना, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना, चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जोडपलेले असताना, अशा महत्त्वाच्या विषयात काम करायचे सोडून केवळ वाईट राजकारणाच्या हेतूने एका युवा ला अटक करून त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुन्हा एकदा गळचेपी केली आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
"अनंत करमुसे यांना त्याने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले म्हणून मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून घरी बोलावून बेदम मारहाण करण्यात आली होती, समीत ठक्कर विषयात सुद्धा अशाच प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत अटक करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती राज्य सरकारने केली आहे.", असे पाटील म्हणाले,
राष्ट्रवादीच्या मेहबूब शेखला अटक का नाही ?
"राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरती युवतीवरच्या बलात्कार विषयाचा गंभीर गुन्हा दाखल असताना सुद्धा त्याला अटक न करता मोकाट सोडले आहे तो राजरोसपणे नेत्यांबरोबर कार्यक्रमांमध्ये सभांमध्ये प्रचारामध्ये दिसत आहे परंतु त्याला इतका गंभीर गुन्हा दाखल असून सुद्धा वरदहस्त दिला जातो, शर्जिल उस्मानीला अटक करण्यात राज्य सरकार उदासीन भूमिका घेते आणि प्रदीप गावडे सारख्या युवा ला बेकायदेशीर पद्धतीने अटक केली जाते, या गोष्टीचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र म्हणून आम्ही निषेध करतो.", असेही पाटील म्हणाले.
पोलीसांचा 'मुंबई-पुणे-मुंबई' प्रवास
'एफआयआर' दाखल झाल्याची कोणतीही माहिती न देता किंवा ४१ ची नोटीस न देता थेट अटक करण्यासाठी मुंबईवरून पोलीस पुण्याला पोहोचतात हे एक प्रकारच्या मोंगलाई चे लक्षण आहे. राज्य सरकारने पोलिसांना आपल्या हातातले बाहुले बनवले असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसत आहे. भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर निदर्शने करून या गोष्टीचा निषेध करत आहे आणि राज्य सरकारचा हा घाणेरड्या राजकारणाचा मुखवटा फाडल्या शिवाय आम्ही शांत राहणार नाही.