मुंबई : 'दि ताश्कंद फाईल्स' हा चित्रपट चांगलाच गाजला. अनेक गोष्टींमुळे या चित्रपटाची चर्चा झाली. यानंतर आता या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणखी एक संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. १९९० मध्ये काश्मिरी पंडिताच्या विरोधात घडलेल्या सामूहिक छळावर आधारित 'दि काश्मीर फाईल्स' हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधीच या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट त्यावेळची राजकीय परिस्थिती प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
या चित्रपटाची कथा काश्मीरी पंडीतांच्या सामूहिक छळावर आधारीत आहे. या चित्रपटासाठी विवेक आणि त्यांच्या टीमने काश्मीरी पंडीतांविषयी सखोल अभ्यास केला आहे. ‘राईट टू जस्टिस’ ही चित्रपटाच्या टायटलसोबत देण्यात आलेली टॅगलाईन या चित्रपटात न्याय-हक्कासाठीचा लढा पहायला मिळणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. त्याचा यापूर्वीचा 'दि ताश्कंद फाईल्स' हा चित्रपट माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधानावरील वादावर आधारित होता. या चित्रपटला बॉक्स ऑफिसवर ठीकठाक प्रतिसाद मिळाला. मात्र, यातील विषय आणि अभिनेत्यांच्या दमदार अभिनयाने चांगलीच वाहवाही मिळवली होती.
चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी सोशल मीडियावर तीन पोस्टर प्रदर्शित करत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढवण्याचे काम केले आहे. यामध्ये अभिनेता अनुपम खैर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची प्रमुख भूमिका असणार आहे. याचसोबत दर्शन कुमार, अमान इक्बाल, पुनीत इस्सार, प्रकाश बेलवाडी असे उत्तम कलाकारही दिसणार आहेत. विवेक अग्निहोत्री याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून झी स्टुडियो, तेज नारायण आणि अभिषेक अग्रवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.