नवी दिल्ली : जगात गाजलेल्या पनामा पेपर्स प्रकरणाचे काळे ढग हे बच्चन कुटुंबियांच्या भोवती फिरताना दिसत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन दिल्लीतील लोकनायक भवन येथे ईडीसमोर हजर होणार आहे. तर यानंतर अमिताभ बच्चन यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बच्चन कुटुंब अडचणीत येणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे ५०० बड्या व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये नेते, अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील मोठमोठी नावे आहेत. यांच्यावर कर चुकेवेगिरीचा आरोप असून कर अधिकारी यासंदर्भात तपास करत आहेत. गेले अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. महिन्याआधी अभिषेक बच्चननेदेखील ईडी कार्यालयात हजेरी दर्शवली होती. यावेळी त्याने ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे. २०१६मध्ये ब्रिटेनमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे ११.५ कोटी टॅक्स डॉक्युमेंट लीक झाले होते. जगभरातील अनेक मोठ्या नावांचा यामध्ये समावेश होता. तर, भारतातील ५०० बड्या नावांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती देण्यात आली होती. यात बच्चन कुटुंबाचेदेखील नाव आहे.