देशाच्या रक्षणासाठी लष्कर, वायुदल आणि नौदल समर्थ
नवी दिल्ली: “दीर्घकाळापासून अपेक्षित असलेल्या कृषीक्षेत्रातील सुधारणा नव्या कृषी कायद्यांमुळे प्रत्यक्षात आल्या आहेत. सुरुवातीला त्याविषयी शंका निर्माण होऊ शकते. मात्र, या सुधारणा शेतकरी हिताच्याच आहेत,” अशी ग्वाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस देशावासीयांना दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस देशवासीयांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी कृषी सुधारणा कायदे, गलवान खोर्यातील चीनची आगळीक, कोरोना संसर्ग आदी अनेक विषयांवर भाष्य केले.
“देश सध्या आर्थिक आघाडीवर वेगाने आगेकूच करीत आहे. आर्थिक सुधारणादेखील वेगाने होत आहेत. त्या सुधारणांना पूरक म्हणून कृषीक्षेत्रामध्ये कायद्यांद्वारे सुधारणा करण्यात आल्या आहेत. दीर्घकाळापासून अपेक्षित आणि प्रलंबित असलेल्या सुधारणा कृषी सुधारणा कायद्यांद्वारे अखेर पूर्णत्वास गेल्या आहेत. आरंभीच्या काळात या सुधारणांविषयी शंका उत्पन्न होऊ शकतात. मात्र, हे कायदे पूर्णपणे शेतकर्यांच्या हिताचेच असून त्यासाठी सरकारदेखील कटिबद्ध आहे,” असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
वर्ष २०२० हे आव्हानांचे वर्ष ठरल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “भारतीय सैन्य देशाचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असते. लडाख-सियाचीन-गलवान अशा उणे ५० अंश तापमानापासून ते जैसलमेरच्या रणातील ५० अंश तापमानामध्येही ते सदैव देशाचे रक्षण करण्यासाठी तैनात असतात. वर्ष २०२० मध्ये देशाच्या सार्वभौमत्वास आव्हान देणार्या काही घटना घडल्या, त्यात आपल्या २० जवानांना हौतात्म्यही आले. मात्र, प्रत्येक स्थितीमध्ये राष्ट्रहितांचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम असल्याचा संदेश देण्यात आला आहे. भारत नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे. तरीदेखील आमचे लष्कर, वायुदल आणि नौदल हे कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास समर्थ आहे,” असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
“संपूर्ण जगावर परिणाम करणार्या कोरोना संसर्गाचा फटका भारतालाही बसला. त्यात सुमारे दीड लाख नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले. मात्र, भारताने या संकटाचा समर्थपणे सामना केला. देशवासीयांची काळजी घेतानाच जगातील अनेक देशांना औषधांचाही पुरवठा केला. त्याचप्रमाणे ‘आत्मनिर्भर भारता’ने देशातच कोरोनावरील लस विकसित केली आणि आता जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीमही सुरू केली आहे. त्याचप्रमाणे जगातील अनेक देशांना आता लसींचाही पुरवठा करण्यास प्रारंभ केला आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरील प्रभावही आता ओसरत चालला आहे. त्यामुळे आता अर्थव्यवस्थादेखील नव्या वेगाने वाटचाल करीत आहे,” असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नमूद केले.