नवी दिल्ली : भारतात लॉकडाऊन २.० सुरू झाला असून सर्वच जण खबरदारी म्हणून घरीच आहेत. मात्र, जागतिक पातळीवरही आता काही देश अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या तयारीत आहेत. या देशांमध्ये सार्वजनिक वाहने, सिनेमागृहे, सुपर मार्केट्स पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. चीन, ईराण, ऑस्ट्रीया, डेनमार्क, चेक रिपब्लिक, नार्वे आदी ठिकाणी लॉ़कडाऊनची नियमावली काहीशी शिथील केली जाकत आहे. मात्र, याचे जसे फायदेही आहेत, तसे तोटेही जाणवत आहेत.
चीनमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर आता सर्वसामान्य जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र, सोशल डिस्टंसिंग शब्दाला इथे महत्व देण्यात येत आहेत. हे नियमही इथे कडक करण्यात आले आहेत. अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर चीनमधील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. बीजिंगमध्ये लोकांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळूनच.
चीनमध्ये जिथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वात आधी झाला तिथेही आता लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. आता या भागात लोक पूर्वीप्रमाणे मुक्तसंचार करत आहेत. पार्कात खेळत आहेत. इथल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी मास्क लावून शाळेत जात आहेत. वर्गात जाण्यासाठी विशेष रस्ता बनवण्यात आला आहे. गॅलरीत मुलांची गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. एका वर्गात ३०हून जास्त विद्यार्थी बसवू दिले जात नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना मोफत मास्क वाटप केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शरीराचे दिवसातून तीनवेळा तापमान तपासले जात आहे. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला १०८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.