नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारादरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून आरोपी सलमान याच्या अटकेनंतर त्याची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात सलमानने धक्कादायक खुलासा केला आहे. शुक्रवारी दुपारी सलमानला करकरडूमा कोर्टात हजर केले जाईल.
चौकशीदरम्यान सलमानने सांगितले की, सहा जणांनी मिळून आयबी अधिकारी अंकित शर्मा यांना आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या घरात खेचून आणले होते. यानंतर धर्माची ओळख पटवण्यासाठी त्यांना विवस्त्र केले व त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. चौकशीदरम्यान सलमानने सांगितले की, तो आपल्या साथीदारांसह २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी ताहिर हुसैनच्या घरी पोहोचला होता. त्या दिवशी त्या भागात दगडफेक करण्यात आली होती आणि गोंधळ निर्माण केला गेला होता. सलमानच्या म्हणण्यानुसार दंगलखोरांनी अंकित शर्मा यांचा धर्म जाणून घेण्यासाठी त्यांना विवस्त्र केले. सलमानने सांगितले की त्याने स्वत: अंकितवर चाकूने १४ वार केले. विशेष म्हणजे, त्याच दिवशी ताहिर हुसेनच्या घरात उपस्थित दंगलखोरांनी अंकितसह इतर दोन हिंदू तरुणांनाही आत खेचले होते. परंतु या दोघांनीही त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका पळ काढण्यात त्यांना यश आले. पण त्यावेळी अंकित शर्मा त्यांच्या तावडीत सापडले.
तारिक हुसैन यांच्या घरावरुन दगडफेक व पेट्रोल बॉम्ब टाकल्याचे कबुल
अंकित शर्मा हे बेपत्ता झाल्याच्या एक दिवसांनंतर २७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृतदेह उत्तर-पूर्व दिल्लीतील चांदबांग येथील त्याच्याच घराजवळील एका नाल्यात सापडला. यापूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात आम आदमी पार्टीचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन यांना अटक केली आहे. सलमानने पूर्ण घटनेची माहिती आपला भाऊ व वहिनीला दिली होती. याशिवाय सलमान या हिंसाचारात सहभागी असल्याचे त्याच्या दूरध्वनीच्या डिटेल्सवरुन पोलिसांना कळाले होते.
अंकित शर्मांचा पोस्टमाॅर्टम रिपोर्ट काय सांगतो ?
अंकित शर्माच्या पोस्टमाॅर्टम रिपोर्टनुसार, अंकित शर्माच्या शरीरावर असा कोणताही एक भाग नव्हता जिथे चाकूच्या खोल जखमा नाहीत. या अहवालात डॉक्टरांनी लिहिले की अंकितला चाकूने ४००पेक्षा जास्त वेळा मारण्यात आले. या हत्येत किमान ६ लोकांचा सहभाग असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. म्हटले आहे की अंकित शर्माला सतत २ ते ४ तास चाकूने ४०० वार करण्यात आले. तसेच, त्याचे आतडे शरीरातून काढून टाकले गेले. फॉरेन्सिक डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी आपल्या आयुष्यात यापूर्वी कधीही इतके अत्याचार केलेले शरीर पाहिले नव्हते.