हिंदुत्वाच्या भाष्यकाराचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2020
Total Views |


p parmeshvaram _1 &n



परमेश्वरनजींच्या निधनाने एक सात्त्विक
, प्रगल्भ आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व हिंदुत्व विचारधारेने गमावले आहे. त्यांच्या निधनाने झालेली विशुद्ध भारतीय विचारधारेची क्षती भरून काढणे अवघड आहे


विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष
, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार, स्वामी विवेकानंद व योगी अरविंद यांच्या तत्त्वज्ञानाचे समर्थ विवेचक, केरळमधील साहित्यिक-वैचारिक-बौद्धिक चळवळीचे मार्गदर्शक, मार्क्सवादी विचारधनाचे परखड तरीही मार्मिक चिकित्सक, ‘पद्मश्री’ व ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरवान्वित पी. परमेश्वरन, वय ९४ वर्षे यांच्या शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा झालेल्या निधनाने विवेकानंद केंद्राची, तर अपरिमित हानी झालीच आहे. परंतु, देश एका अभ्यासू मार्गदर्शकाला, हिंदुत्वविषयक चिंतकाला मुकला आहे अशीच भावना भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय अधिकारी बैठकीत रविवार सकाळपासून व्यक्त होत राहिली.


विवेकानंद केंद्राची अखिल भारतीय अधिकारी बैठक ही परमेश्वरनजींच्याच संकल्पनेतून सुरू झालेली बैठक
. पूर्वी केंद्राच्या कामाचा वार्षिक आढावा घेण्यासाठी हितचिंतकांची बैठक होत असे. परंतु, असा कार्याचा आढावा घेत घेत पुढील वर्षाच्या कामाचे नियोजन करण्याची संकल्पना परमेश्वरनजींनीच मांडली. प्रकृती ठीक राहत नसल्याने प्रवास अशक्य झाला होता. त्यामुळे ते २०२० च्या भुवनेश्वर बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु, एका कौटुंबिक सोहळ्यात सहभागी झाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. बैठकीला उपस्थित राहता आले नसले तरी त्यांनी संकल्पिलेली बैठक सुरू असताना त्यांना मृत्यू यावा हा एक विलक्षण योग मानावा लागेल.


१९२७ साली अलप्पुझा जिल्ह्यात मुहम्मा येथे जन्मलेले परमेश्वरनजी १९७२ ते १९७१ या काळात भारतीय जनसंघाचे महासचिव
, १९७१ ते १९७७ या कालावधीत राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. पं. दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर पक्षाचे काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९७७ ते १९८२ ते दीनदयाळ शोध संस्थानचे संचालक म्हणून काम पाहत होते. काल एका लग्नानिमित्ताने ते ओट्टापलम येथे गेले होते. दिवसभरात एका विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवादही साधला होता. संध्याकाळनंतर त्यांची तब्येत बिघडली. रात्री १२ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. दोनच वर्षांपूर्वी २०१८ साली नवी दिल्लीत, राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी विवेकानंद केंद्राला घोषित झालेल्या एक कोटी रुपयांच्या ‘गांधी शांतता पुरस्कारा’चा स्वीकार केला होता.



या समारंभात झालेल्या सन्मानाला उत्तर देण्यासाठी बोलण्याइतकी त्यांची प्रकृती ठीक नव्हती
. परंतु, त्यांच्यावतीने केंद्राच्या ज्येष्ठ जीवनव्रती अपर्णा पालकर यांनी भावना व्यक्त केल्या होत्या आणि केंद्र सरकारने देऊ केलेला एक कोटी रुपयांचा निधी दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा होणार्या सैनिकांच्या कुटुंबीयांना देऊ केला होता, तेव्हा उपस्थितांचे डोळे ओलावल्याचे दूरचित्रवाणीवरून तो समारंभ पाहत असलेल्यांनाही जाणवत राहिले होते. शाळकरी वयात असतानाच परमेश्वरनजींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि शिक्षण पूर्ण होताच १९५४ साली ते संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. परंतु, भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यानंतर केरळमधील जनसंघाच्या कामाची धुरा परमेश्वरनजींकडे सोपवण्यात आली. मला राजकीय क्षेत्रात काम करण्यात अजिबात रूची नाही, असे सांगितल्यानेच की काय कुणास ठाऊक परंतु, जनसंघाच्या कामाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. केरळमध्ये भारतीय विचारधारा रूजली, वाढली इतकेच नव्हे, तर कम्युनिस्ट विचारधारेला टक्कर देऊन उभी राहिली. भारतीय विचार केंद्राने उत्पन्न केलेल्या वाढत्या वैचारिक शक्तीचे भय संघविरोधी ताकदींना वाटू लागले, ते परमेश्वरनजींच्या व्यक्तिमत्त्वाला साहित्यिक-सांस्कृतिक-वैचारिक वर्तुळात जे आदराचे स्थान प्राप्त झाले त्यामुळे.



भारतीय विचार केंद्रया प्रकाशन संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि वैचारिक विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ‘दीनदयाळ शोध संस्थान’ची स्थापना झाल्यानंतर त्या संस्थानच्या मुखपत्राची, ‘मंथन’ची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. १९८४ मध्ये ते विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनले. तब्बल ११ वर्षे या पदाची धुरा सांभाळल्यानंतर १९९५ मध्ये ते केंद्राचे अध्यक्ष बनले. २००३ मध्ये अखिल भारतीय अधिकारी बैठकीचे नवे पर्व केंद्रात सुरू झाले आणि यंदा १८ व्या वर्षाची बैठक सुरू असतानाच त्यांचे देहावसान झाले. परमेश्वरनजींचे सारे आयुष्य समाजाला, देशाला समर्पित केलेले होते. त्यांनी स्वत:चा संसार असा केलाच नाही. ते जगले व्रतस्थासारखे, समाजाप्रति संपूर्ण समर्पित होऊन. त्यामुळेच त्यांचे वर्णन करताना शब्दप्रयोग वापरला तो शुभ्र वेषधारी संन्यासी असा. परमेश्वरनजींच्या निधनाने एक सात्त्विक, प्रगल्भ आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व हिंदुत्व विचारधारेने गमावले आहे. त्यांच्या निधनाने झालेली विशुद्ध भारतीय विचारधारेची क्षती भरून काढणे अवघड आहे हेच खरे...



- सुधीर जोगळेकर 
@@AUTHORINFO_V1@@