समाजसेवेचे व्रत जपणारी ‘एक दिलासा’ सामाजिक संस्था

    11-Feb-2020
Total Views | 82


dilasa _1  H x

 

टिटवाळा : निस्सीम आणि प्रामाणिकपणे कसलीही अपेक्षा न करता समाजसेवा करत राहणे, हे व्रत काहीजण कायम ठेवतात. टिटवाळ्यामधील समाजासाठी निःस्वार्थी वृत्तीने काम करणार्‍या दर्शना शेलार यांचे हे उदाहरण आहे. सामाजिक चळवळीत आपल्या परिसरातले आपले इतर समाजबांधव आणि भगिनी जोडल्या जाव्यात, या उद्देशाने २०१३ साली त्यांनी आपल्या पतीच्या सहकार्याने ‘एक दिलासा’ सामाजिक विकास संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात अनेक उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरुवात केली. गोवेली ठाकूरपाडा येथे गेली १२ वर्ष गोठ्यात भरणार्‍या शाळेचे विदारक सत्य या माध्यमातून त्यांच्यासमोर आले. एम.ए.बी.एड. शिक्षण झालेल्या दर्शना शेलार या शिक्षणाच्या बाबतीत तेवढ्याच आग्रही आहेत.



बांधकाम व्यावसायिकांकडे काम करणार्‍या लहान मुलांना अक्षरओळख व्हावी
, त्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी गेली तीन वर्ष त्यांनी या मुलांसाठी ‘अंकुर’ नावाने मोफत प्लेग्रुप नर्सरी स्कूल चालवली. मुरबाड तालुक्यातील चिखले या गावातील ठाकूरपाड्यातील ब्रिज हा आठ वर्षांपासून पडला होता. येथील लोकांच्या दळणवळणाचे असलेले एकमेव माध्यम बंद झाले होते. पावसाळ्यात येथील लोकांची अवस्था फार बिकट असायची. संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना ही गोष्ट त्यांना माहीत झाली. आपल्या इतर आयडे, सुमंगल या संस्थांना सोबत घेऊन त्यांनी पाड्याला भेट दिली आणि त्या लहानश्या पाड्यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवला. शासनाच्या घरेलू कामगार योजनेच्या माध्यमातून सुमारे १०० महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला.



दिवाळीच्या दिवसांत आदिवासी पाड्यांवर दरवर्षी
‘एक दिवाळी आड वाटेवरची’ या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येते. तेथील मुलांचे कलागुण वाढीस लागावेत, यासाठी किल्ले स्पर्धा भरवून त्यांना बक्षीस वाटप करण्यात येते. गेली ५ वर्ष हा उपक्रम सातत्याने चालू आहे. याची कुठेही स्वत:हून प्रसिद्धी नाही की गवगवा नाही. आपल्या स्वत:च्या उत्पन्नातील शक्य होईल तितकी एक ठराविक रक्कम बाजूला काढून अडचणीत असलेल्या गरजू रुग्णाला, त्यांच्या कुटुंबीयांना आपल्यापरीने मदत करण्याचा एक स्तुत्य असा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. अनेक उपक्रमांतून दर्शना शेलार या आपले सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१६ साली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दर्शना शेलार यांना ‘वैभवी आदर्श महिला पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याविषयी दर्शना म्हणाल्या की, “यात आपण काहीतरी वेगळे करतोय, असे मुळीच नाही. समाजासाठी काम करताना मला आत्मिक समाधान मिळते आणि समाजात राहत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी ही जपायलाच हवी. आपण समाजाचे निश्चितच देणे लागतो, याची जाणीव असायलाच हवी.” दर्शना शेलार यांच्या या समाजकार्याला दै. मुंबई तरूण भारतकडून पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!



- अजय शेलार 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121