रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सवाची लगबग सध्या सुरू आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने आता पुन्हा दमदार बॅटींग सुरू केली आहे. गणपतीसाठी चाकरमानी मोठ्या उत्साहात आपल्या गावात दाखल झाले आहेत. मात्र, शनिवारपासून पावसाने जोर कायम ठेवला आहे. सोमवारी गणेश आगमना दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना वेळेत पोहोचणे कठीण झाले होते.
मुंबईतही येत्या काही तासांत जोरदार सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून गेल्या २१ तासांत १०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत मुंबई उपनगरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागांतही पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. दरम्यान, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बिड, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, वर्धा या भागांत जोरदार सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.