मुंबई : गेल्या चार वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील सर्व २८८ तालुक्यांमधील तालुका क्रीडा संकुलांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये किमान पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तावडे म्हणाले, "या वर्षीचा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील २८८ तालुक्यांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान पाच हजार विद्यार्थी (शाळा, महाविद्यालये, एनएसएस, एनसीसी, स्काऊट गाईड), असे जवळपास १५ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
Maharashtra is geared up for the grand celebration of #InternationalDayOfYoga2019 on the 21st of June! Schools, colleges and educational institutions across all the 288 talukas of the state will participate in observance of this festival of health and well-being. pic.twitter.com/6mPuCoCAGG
— Vinod Tawde (@TawdeVinod) June 13, 2019
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत देण्यात आलेला योगाबाबतचा शिष्टाचार यावेळी विद्यार्थी करणार आहेत. राज्यातील योग शिकविणाऱ्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा होणार आहे. २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. याशिवाय २१ जून रोजी नांदेड येथे रामदेवबाबा यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दीड लाख नागरिक सहभागी होणार आहेत.
ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उदाहरणार्थ मुंबई, कोकण किंवा पुणे अशा ठिकाणी पाऊस पडल्यास विद्यार्थ्यांना योग कुठे करता येईल, याबाबतही तयारी करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयामार्फत योगासाठी सकाळी ७ ते ८ ही वेळ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता यालासुध्दा प्राधान्य देण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat