‘वाचकहिताय’ : ग्रंथ तुमच्या दारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019   
Total Views |



ग्रंथ तुमच्या दारीही योजना नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत आहे. वाचकांना घरापर्यंत पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रतिष्ठानच्या या योजनेला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने प्रतिष्ठानचे विश्वस्त व या उपक्रमाचे जनक विनायक रानडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, “या कल्पनेची सुरुवात छोट्या छंदापासून झाली. वाढदिवसाला अनेक मित्रांना शुभेच्छा देऊन त्या दिवशी त्यांच्याकडून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचनालयासाठी किमान एक पुस्तक विकत घेता येईल, एवढी देणगी जमा करणे, हा उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येऊ लागला. २००७ मध्ये त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याने कुसुमाग्रज स्मारक येथील वाचनालयात अमेरिकेतील अनिल देशपांडे या मित्राने दिलेल्या १५ लाख रुपयांच्या पहिल्याच देणगीतून वाचनालयाची सुरुवात झाली. २००७ ते २००९ या दोन वर्षांत मित्रांच्या मदतीने ५ लाख रुपये देणगी स्वरूपात उभे करण्यात आले.

 

वाचनालयापासून १ किमी परिसरातही वाचक या पुस्तकांचा आस्वाद घेत होते. वाचकांचा परिघ वाढत होता. वाचकांची संख्याही लक्षणीय होती. वाचनालयासाठी मदत संपूर्ण भारतातून व भारताबाहेरून मिळत होती. त्या मदतीमुळे वाचनालय पुस्तकांनी खर्‍या अर्थाने समृद्ध झाले. एक वेळ अशी आली की रानडे यांना वाटले की, याचप्रकारे मदत येत गेल्यास कालांतराने वाचनालयाची उंची वाढेल मात्र, वाचनालयापासून लांब राहणार्‍या वाचकांना पुस्तके मिळणे शक्य होत नाही. वाचनालयापासून वाचक दुरावल्याची तीन प्रमुख कारणे रानडे यांच्या लक्षात आली. ती म्हणजे, ) वय २) वेळ आणि ३)अंतर. विस्तारणार्‍या नाशिकमध्ये मुख्य वाचनालयापासून दूरवर राहणार्‍या वाचकांना थोड्याफार प्रमाणात तरी पुस्तके उपलब्ध व्हावी यासाठी ग्रंथ तुमच्या दारीया वाचकप्रिय योजनेचा २००९ ला शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत वाचनालयापासून लांब राहणार्‍या ३५ वाचकांच्या गटाला १०० मराठी दर्जेदार पुस्तकांची ग्रंथपेटी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येते. शुभारंभाच्या ११ पेट्यांमध्ये सर्व पुस्तके ही वेगळी असल्याने दर चार महिन्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमार्फत एका गटाची पेटी दुसर्‍या गटाला असे बदलून देण्यात येत असते.

 

नाशिकमधील या उपक्रमाचे महत्त्व राज्याच्या प्रत्येक गावात लक्षात आल्याने ग्रंथपेट्यांचा विस्तार वाढत गेला. निवासी भागाबरोबरच छोट्या औद्योगिक कंपन्या, दवाखाने, पोलीस स्थानक, वनवासी पाडे, इतकेच काय कारागृहातसुद्धा ग्रंथपेट्या आजवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्याबाहेरील गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, सिल्व्हासा, कर्नाटक येथील मराठी वाचकांनादेखील या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सातासमुद्रापार या योजनेचा विस्तार होत असताना तेथील मराठी वाचकांसाठी सर्वप्रथम दुबई येथे पाच वर्षांपूर्वी योजना सुरू करण्यात आली. आजमितीस संपूर्ण यूएई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, कॅलिफोर्निया, ओमान, मॉरिशस, सिंगापूर येथील मराठी वाचकांसाठी दीड हजारहून जास्त ग्रंथपेट्यांद्वारे अंदाजे २ कोटीहून जास्त मूल्य असलेली १ लाखहून अधिक पुस्तके उपलब्ध होत आहेत. परदेशात २५ पुस्तकांच्या ग्रंथपेट्या उपलब्ध करून देण्यात येतात. या उपक्रमामागील उद्देश इतकाच आहे की, देशासह विदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी वाचकांपर्यंत मराठी ग्रंथसंपदा पोहोचविणे व त्यांचे मराठी वाङ्मयाशी नाते वृद्धिंगत करणे. मायबोलीतील वाचनामुळे मायबोलीत विचार व्यक्त करण्यास चालना मिळते. त्यामुळे मातृभाषेचे संवर्धनदेखील होते आणि समान मातृभाषेचा धागा गुंफत माणसे जोडण्याचे काम होत राहील, या कुसुमाग्रजांच्या प्रेरणेवर आधारित प्रतिष्ठानचे कार्य चालू आहे.

 

रानडे यांना सन २००४ मध्ये झालेल्या अपघातामुळे स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी पैशाने सगळे विकत घेता येत नाही, मीच कुटुंब चालवितो हे खोटे आहे, आपण उजव्या हाताने लिहावे व डाव्या हाताने द्यावे, या तीन गोष्टी जाणल्या. तसेच, सामाजिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाचन आवश्यक असल्याने त्यांनी हा उपक्रम सुरू केला. या पेटीत वाचकाला मराठी साहित्याचे सर्व प्रकार उपलब्ध होत असतात. गेल्या १० वर्षांत कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून एकही रुपया न घेता ४. लाख किमीचा प्रवास करून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे, हे विशेष. आगामी काळात सध्या मोडक सेंटर नॅब व प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला बोलके पुस्तकपेटीचा उपक्रम विस्तारण्याचा त्यांचा मानस आहे. आजमितीस दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या ६५ शाळांत १०० बोलक्या पुस्तकांची एक पेटी याप्रमाणे वितरण सुरू आहे. तसेच, बालकांसाठीचे ग्रंथालय, पुस्तक द्या, पुस्तक घ्या, नाशिकमधील २०० कुटुंबे लाभ घेत असलेले माझं ग्रंथालययांचा विस्तार रानडे आपल्या कार्यातून वाढविणार आहेत.

 

माणसाशी माणसाचा संवाद व्हावा व त्याचे माध्यम ज्ञानसंपदेने युक्त ग्रंथ असावेत, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात वाचकांचे अनोखे संमेलनदेखील गोदातिरी आयोजित करण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@