आधी या पराभूतांना आवरा!

    28-Feb-2019
Total Views | 104

 

 
 
 
चर्चा कोणाशी करायची? पाकिस्तानचा खरा नेता कोण? ज्याच्याशी बोलणी केल्यानंतर त्यानुसार पाकिस्तान वागेल याची खात्री देता येईल? काहीतरी आकडेवारी टाकल्याने प्रश्न सुटत नाही, उलट या पराभूत मानसिकतेमध्ये जगणाऱ्यांचेच पितळ उघडे पडते.
 

कुणा एका हिंदी कवीची फार सुंदर कविता आहे. एक राजा दुसऱ्या राजाच्या विरोधातले युद्ध जिंकतो. ती चिवट लढाई जिंकल्यानंतर युद्धबंदी झालेल्या सैनिकांना शिक्षा देण्याची वेळ येते, तेव्हा तो राजा आपल्या सेनापतीला म्हणतो की, “यांना शिक्षा देण्यापूर्वी रणांगणावर रणभेऱ्या आणि वाद्ये वाजविणाऱ्या त्या वाजंत्र्यांना शिक्षा द्या. त्यांच्यामुळेच यांना स्फुरण चढत होते आणि हे चेवाने लढत होते.” युद्धात लढणाऱ्यांचे, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांचे महत्त्व नक्कीच आहे, ते कुणीही नाकारू शकत नाही. मात्र, त्यांना स्फुरण चढावे असे काही करण्यापेक्षा सध्या आपल्याकडे जे काही सुरू आहे ते क्लेशकारक आहे. आपल्याकडे सैन्य सरशीच्या काठावर असताना त्यांच्यासाठी रणभेऱ्या वाजविण्यापेक्षा शांतीपाठाचे अध्याय सुरू झाले आहेत. ‘अमन की आशा’च्या नावाखाली फुकटात पाकिस्तान वाऱ्या करून संध्याकाळनंतरच्या मैत्रीच्या चषकांसाठी सवकलेल्या काही तथाकथित विचारवंतांनी त्यांचे जुनेच तुणतुणे वाजवायला सुरुवात केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जे काही झाले आणि भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानची जी काही भंबेरी उडाली आहे, ती पाहाता मोठे युद्ध होणार नाही, दबावांची अशीच लढाई सुरू राहील, हे स्पष्ट आहे. ज्याची गचांडी पकडावी, असे सतत वाटत असते असा शत्रू सध्या चुका करून कचाट्यात अडकलाय, त्यामुळे भारतीय लष्कर आणि जनता यांच्यामध्ये लढण्याचा उत्साह आहे. कधी नव्हे ते सारे जग यावेळी भारताच्या बाजूने आहे. मसूद अझहरचा मणका ढिला झाला असून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जगभरातून पाकिस्तानवर दबाव आहे. अशा स्थितीत रणभेऱ्या वाजविण्याचे काम ज्यांच्याकडे आहे, अशी माध्यमे आणि त्यांचे संपादक मात्र आपल्या पढीक षंढत्वाच्या अभिनिवेशातून पंतप्रधान आणि लष्कराला न मागितलेले सल्ले देण्यात रमले आहेत.

 
काहींनी तर भारताचे अर्थकारण, पाकिस्तानचे अर्थकारण असा विचित्र सूर लावला आहे. मूळ मुद्दा यांना कळत नाही की वळत नाही, हेच समजायला मार्ग नाही. हा मुद्दा अर्थकारणाचा नसून दहशतवादाचा आहे. पाकिस्तानची अधिकृत अर्थव्यवस्था किती कोटींची आहे, यापेक्षा या देशात जगाच्या नकाशावर जिहादी दहशतवादी पाठविण्यासाठी जो काही पैसा येतो त्याचा आहे. अशा देशाशी युद्ध झाले तर ते किती काळ चालणार? कोण जिंकणार? कोणाचे किती नुकसान होणार? कोणाचे आर्थिक आकडे यामुळे वजाबाकीकडे जाणार? यांसारख्या फालतू प्रश्नांचे भुंगे सध्या या मंडळींच्या डोक्याभोवती भुणभुणत आहेत आणि त्याचेच परिणाम या मंडळींच्या अग्रलेखांमधून, लेखांमधून आणि रिकामटेकड्या वाहिन्यावरील चर्चांमधून दिसायला लागले आहेत. एकदा जिंकायचे ठरविले की, अशा गोष्टींना काहीच अर्थ नसतो. पाकिस्तान यावेळी कचाट्यात अडकला आहे तो मुळातच नरेंद्र मोदींना गृहीत धरून. नरेंद्र मोदी नावाचा पंतप्रधान सध्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान आहे आणि त्याच्या खोड्या काढणे किती भयावह असू शकते, याचा पुरेपूर अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे. आर्थिक निर्बंध लादण्यापासून ते पाणी वळविण्यापर्यंत आपण काय काय करू शकतो, याची जंत्रीच सध्या केंद्र सरकारने लावली आहे. तिथे पाकिस्तानी पंतप्रधान रोज पत्रकार परिषदा घेऊन गयावया करीत असताना मोदींनी एकही अशा प्रकारचे विधान केलेले नाही. ज्यातून ते एखादे तरी पाऊल मागे हटतील, असे वाटू शकेल. उलट ज्या दिवशी आपले वायुदल पराक्रम गाजवून परतले, त्या दिवशी मोदी आपले दैनंदिन कार्यक्रम अगदी सहजपणे पार पाडत होते.
 
 
अक्षरधाम मंदिरातल्या भगवद्गीता प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तर मोदी मेट्रोने गेले. देशाचा पंतप्रधान इतका ठाम असताना आणि सैन्य दलातले आजी-माजी मोठे अधिकारी अशी संधी मिळाली तर किती तासांत पाकिस्तानचा खेळ आटपू, हे सांगत असताना आपल्याकडल्या विचारवंतांची रडारड सुरूच आहे. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ ही यांची लाडकी घोषणा. आता युद्ध कोणाला हवे आहे? असे विचारले तर जगातला कोणताही देश हात वर करणार नाही, हे या पढतमूर्खांना कळत नसावे. पण, ज्यांनी बामियानमधल्या विशाल बुद्धमूर्ती स्फोट करून उडविल्या, त्यांच्याशी या गृहीतकाच्या आधारावर आपण चर्चा करू शकतो का? आपल्याकडच्या विचारवंतांची एक पिढीच्या पिढी या पराभूत मानसिकतेची बळी ठरली आहे. सडेतोड उत्तरे देण्यापेक्षा युद्धाच्या परिणामांचीच चिंता या मंडळींना सतावायला लागते. सर्वांच्या कल्याणाची जागतिक मूल्यांची पोपटपंची तेव्हाच खरी ठरू शकते, जेव्हा समोरचादेखील तितक्याच समान बौद्धिक पातळीवर असतो. पाकिस्तानचे जे काही चालू असते, त्याचा नेमका मालक कोण, या प्रश्नांची उत्तरे खुद्द पाकिस्तानचा पंतप्रधानही देऊ शकत नाही. इमरान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर त्याच्या एका माजी पत्नीने हा लष्कराचे कळसूत्री बाहुला असल्याचे म्हटले होते. आता अशा माणसाशी चर्चा करून तुम्ही काय साधणार? त्या चर्चेतून जे काही ठरेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न यांना पडत नाहीत. साध्या सैनिकाला जे कळते, तेवढाही शहाणपणा या मंडळींकडे नाही. अशा पराभूत मानसिकतेचे विचारवंत, हीच आपली शोकांतिका आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121