वाघ गरजणार!

    01-Dec-2019
Total Views | 1115




उद्धव ठाकरेंना मात्र विधानसभेला लढाईचे मैदान करायची व विरोधकांना शत्रू ठरवायची इच्छा दिसते. म्हणजे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊनही भाजपला मित्र, भाऊ वगैरे म्हणायचे, पण मनात मात्र सुडाग्नी पेटता ठेवायचा असला हा प्रकार! परंतु, त्यांची गाठ देवेंद्र फडणवीस या हुशार, अभ्यासू विरोधी पक्षनेत्याशी आहे आणि भाजपचा हा वाघ ठाकरे सरकार जिथे जिथे चुकेल तिथे डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही!



जनादेशाचा अवमान करून सत्तेवर आलेल्या तिघाडी सरकारने आपले कामकाजही संविधानिक नियम व कायद्यांना धाब्यावर बसवून चालू केल्याचे शनिवारी सर्वांनीच पाहिले
. सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुद्देसूद व राज्यघटनेचा आधार घेऊन केलेल्या भाषणात ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. फडणवीसांनी केलेल्या धुवाँधार फलंदाजीने विधानसभेत प्रथमच पाऊल ठेवलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांचेही चेहरे पाहण्यालायक झाले. अर्थातच नव्या सरकारचा हा पहिला दिवस होता, तरीही त्यातून सत्ताधारी पक्षाला पुढे कोणत्या आव्हानाचा सामना करायचा आहे, त्याची झलक मात्र फडणवीसांनी नेमकेपणाने दाखवून दिली.



संसदीय राजकारणातला कनिष्ठ पातळीपासून सुरू झालेला देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला व ते आता विरोधी पक्षनेतेही झाले
. आपल्याला काम करायला मिळालेल्या कालावधीत फडणवीसांनी राज्यघटना, नियम, कायदे व विधिमंडळ कामकाजासह देश-विदेशातील घटना-प्रसंगांचाही कसून अभ्यास केला. देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या भाषणात त्याचा प्रत्ययही आला. मात्र, समोर बसलेले सरकारी पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंचे काय? त्यांना कोणता अनुभव होता वा आहे? संसदीय राजकारणच नव्हे, तर कोणतेही जबाबदारीचे पद न घेता थेट मुख्यमंत्रिपद मिळवलेली व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे! म्हणूनच विधानसभेत पहिल्यांदा पाय ठेवल्यापासून, पत्रकार परिषद असो वा अन्यत्रही त्यांचे भांबावलेपण दिसून आले. आजपर्यंत ‘कोथळा’, ‘खंजीर’, ‘वाघनखे’ वगैरे शब्दांचा वापर करून कार्यकर्त्यांना आदेश देणारे उद्धव ठाकरे अजूनही मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनच वावरत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. पण अधिवेशन बोलावण्याची पद्धती, हंगामी अध्यक्षाला हटवण्याचा उद्योग, विश्वासदर्शक ठरावाची सूचना देण्याची पद्धती आदी विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी उठवलेले प्रश्नचिन्ह पाहता भाजपचा हा सच्चा वाघ सरकार टिकेल तोपर्यंत गरजतच राहील आणि ठाकरे सरकारला पुरून उरेल हेही स्पष्ट झाले.



दरम्यान
, विश्वासदर्शक ठराव मांडतेवेळी व त्याला अनुमोदन-पाठिंबा देताना शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या झालेल्या फटफजितीने ही मंडळी इथून पुढे कसे काम करतील, हाही प्रश्न निर्माण झाला. सर्वाधिक हास्यास्पद प्रकार घडला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘यदा यदा शी’फेम मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत. समर्थन देताना पंधरानंतर सोळा हा आकडा येतो, याचे भानही त्यांना राहिले नाही व अजित पवारांना त्यांची शाळा घ्यावी लागली. कदाचित देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या धडकीनेच आव्हाडांची स्मृती गायब झाली असावी व त्यातूनच त्यांना पुढचा अंक कोणता हेही आठवले नाही. इथेच जनतेला यापुढेही देवेंद्र फडणवीसांच्या चौकार-षटकारांच्या आतशबाजीने मुख्यमंत्र्यांसह इतरांचीही भंबेरी उडताना पाहायला मिळेल, असे वाटते.



शनिवारी फडणवीसांनी घेतलेले आक्षेप रास्तच होते
, पण ‘बळी तो कानपिळी’ या तत्त्वाने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी आपलेच म्हणणे खरे केले. शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बदलण्याचे कृत्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरच बोट ठेवले, जे योग्य असल्याचेच सध्यातरी दिसते. कारण, वळसे पाटलांच्या मते, शनिवारी बोलावलेले अधिवेशन जुनेच अधिवेशन होते. जर तसे असेल तर जुन्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्षपद कालिदास कोळंबकर यांच्याकडे होते आणि जोपर्यंत नवीन विधानसभा अध्यक्ष निवडला जात नाही, तोपर्यंत हंगामी अध्यक्षच आपल्या पदावर राहतात. मात्र, नवीन अध्यक्षांची निवड होण्याआधीच जुन्या हंगामी अध्यक्षाला हटवून नवीन हंगामी अध्यक्षाचीच नियुक्ती तिघाडी सरकारने केली. तसेच हंगामी अध्यक्षासमोरच विश्वासदर्शक ठराव मांडला, जे बरोबर नव्हते. म्हणूनच अशाप्रकारे नियमांची पायमल्ली करण्यामागे ठाकरे सरकारला नेमकी कसली भीती वाटत होती? स्वतःकडे १७० आमदारांचे पाठबळ होते तर मग हंगामी अध्यक्ष बदलण्याएवढे कोणते संकट त्यांच्यासमोर आले? की गुप्त पद्धतीने मतदान घेतले तर आमदारांचा पाठिंबा अदृश्य होऊन सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असे ठाकरे सरकारला वाटत होते?



देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् तसेच अधिवेशनासाठी राज्यपालांच्या समन्सचा आणि रात्री
-अपरात्री त्याची माहिती देण्याच्या कृत्यावरही सवाल केला. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी 8 वाज़ण्याच्या सुमारास मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यावरुन शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवालेही ‘रात्रीस खेळ चाले’च्या तालावर टीका करत होते. पण मग मध्यरात्री १ वाजता अधिवेशनाची माहिती देताना ठाकरे सरकार कुठला खेळ खेळत होते? यावरूनच स्वतः रात्रीच्या अंधारात केलेली कामे खपवायची आणि इतरांनी रामप्रहरी शपथ घेतली तरी लोकशाहीचा गळा घोटला म्हणत रडायचे धोरण ठाकरे सरकारने अंगीकारल्याचे स्पष्ट होते. आता तर हे असले धोरण राबवायला ठाकरेंबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवालेही आहेतच. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुढ्यात काय काय वाढून ठेवले असेल, त्याचीही कल्पना करता येते.



दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानसभेतील भाषणातून माध्यमांना चालवण्यासाठी पुरेल असे एक वाक्यही उच्चारले
. ‘मैदान सोडून पळणार नाही, तर शत्रूला अंगावर घेणार,’ असे ते म्हणाले. पण विधानसभा हे काही मुंबई, ठाणे वा नाशिक, पुण्यातले सभेचे मैदान नव्हे जिथे कार्यकर्त्यांच्या अंगात जोश भरण्यासाठी असल्या शब्दांचा वापर करायला हवा. सुमारे ६० वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेले, अनेक सन्माननीय सदस्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी गाजवलेले स्थळ म्हणजे विधानसभा सभागृह. तिथे समोर बसलेल्या विरोधी बाकावरच्या सदस्यांना शत्रू म्हणण्याची, शत्रू मानण्याची प्रथा-पद्धती नाही. उलट सर्वांनी मिळून-मिसळून राज्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याची ती जागा होय. उद्धव ठाकरेंना मात्र विधानसभेला लढाईचे मैदान करायची व विरोधकांना शत्रू ठरवायची इच्छा दिसते. म्हणजे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊनही भाजपला मित्र, भाऊ वगैरे म्हणायचे, पण मनात मात्र सुडाग्नी पेटता ठेवायचा असला हा प्रकार! परंतु, त्यांची गाठ देवेंद्र फडणवीस या हुशार, अभ्यासू विरोधी पक्षनेत्याशी आहे आणि भाजपचा हा वाघ ठाकरे सरकार जिथे जिथे चुकेल तिथे डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही!

अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121