
गेल्या पंधरा वर्षांपासून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्व सरकारी कर्मचारी वंदे मातरम्चे सामूहिक गान करीत असतात. मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांना, त्यात त्यांच्या हायकमांडचा अपमान दिसला की काय कुणास ठाऊक, त्यांनी वंदे मातरम् म्हणण्यावर बंदीच घातली. आता ती बंदी त्यांना उठवावी लागली आहे आणि शिरस्त्याप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी वंदे मातरम् होईल, असे कमलनाथ यांनी जाहीर केले आहे. आपलेच आदेश काही दिवसातच गिळण्याचा जो प्रसंग कमलनाथ यांच्यावर आला, त्याला कारणीभूत ठरले आहेत माजी मुख्यमंत्री शिवराजिंसह चौहान! त्यांनी असा काही दणका दिला की, कमलनाथ धाडकन जमिनीवरच आदळले. वंदे मातरम्वर बंदी घातलेली समजताच, शिवराजिंसह यांनी घोषणा केली की, भाजपाचे सर्व 109 आमदार सचिवालयासमोर जाऊन वंदे मातरम् गान करतील. शिवराजिंसहांच्या या आवाहनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघून कमलनाथ यांना घाम फुटला असावा आणि त्यांनी लगेच आपला आदेश मागे घेतला. कमलनाथ यांना तसाही रोज घाम फुटत आहे, म्हणतात. ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते; परंतु राहुलबाबाला प्रतिस्पर्धी नको म्हणून ही माळ कमलनाथ यांच्या गळ्यात पडली, असे बोलले जात आहे. शिंदेंचा गट संधीची वाटच पाहात आहे. तसेही कॉंग्रेसला बहुमत मिळालेले नाही आणि विरोधी पक्ष भाजपा त्यांच्यापेक्षा फक्त पाच आमदारांनी मागे आहे, हे लक्षात घेतले, तर कमलनाथ यांना कडाक्याच्या थंडीतही कसा घाम फुटत असेल, ते लक्षात यावे.
कॉंग्रेसच्या लोकांना वंदे मातरम्वर एवढा राग का, हेच कळत नाही. जणूकाही हे गीत भाजपाने तयार केले आहे की काय असे वाटते. मुसलमानांनी कॉंग्रेसला यावेळी मतदान केले म्हणून, वंदे मातरम्वर बंदी आणली असेल तर ते अधिकच चिंताजनक आहे. कॉंग्रेसला हिंदूंनी एकही मत दिले नाही की काय, असे वाटते. मुसलमानांना गुप्त बैठकीत जी काही वचने दिलीत, त्यात हेही वचन होते का, याचा खुलासा कमलनाथ यांनी केला पाहिजे. ही वचने जाहीर झाली, तर मग हिंदू मतदारांनाही आपल्या चुका दुरुस्त करण्याची सद्बुद्धी येऊ शकते.
सोनिया मॅडम यांना खुश करण्याच्या नादात कमलनाथ एकापेक्षा एक राजकीयदृष्ट्या ज्यांना बावळट म्हणता येईल, असे निर्णय घेत सुटले आहेत. त्याला त्यांनी आवर घातला पाहिजे. इंदिरा गांधींनी या देशावर लादलेल्या आणिबाणीच्या विरोधात ज्यांनी संघर्ष केला, त्यापैकी मिसाबंदी असलेल्यांना मध्यप्रदेशात दरमहा मानधन दिले जाते. ते मानधन बंद करण्याचाही आदेश कमलनाथ यांनी काढला आहे. यात वैयक्तिक कमलनाथ म्हणून काही चुकले असे नाही. कारण आणिबाणीत जे अत्याचार झालेत त्याने कमलनाथ यांचे हात चांगलेच रंगले आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर आपण अत्याचार केलेत, त्यांनाच मानधन कसे द्यायचे, असा प्रश्न शीख नरसंहारात आरोपी असलेल्या कमलनाथांच्या मनात येणे शक्य आहे. म्हणूनच त्यांनी ताबडतोब हे मानधन बंद करण्याचा निर्णय घेतला असावा. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध आणि या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी संघाने जे प्रयत्न केलेत, ते भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहेत. बाकी विरोधी पक्ष सोबत होते, परंतु नावापुरतेच. सर्वात प्रखर विरोध संघाने केला, सर्वात जास्त अत्याचार संघ कार्यकर्त्यांवरच झालेत. असे असताना, खरेतर संघाकडे लोकशाहीचे रक्षणकर्ते म्हणून बघायला हवे होते. परंतु, तसे कुणी करताना दिसत नाही. तशी दानतही हवी म्हणा! परंतु, मागील सरकारने सुरू केलेली मानधनाची योजनाच बंद करणे म्हणजे सूडाच्या राजकारणाचा कडेलोट झाला, असेच म्हणावे लागेल.
खरेतर, या असल्या गोष्टींकडे परिपक्व राजकारण्याने लक्ष द्यायचे नसते. परंतु ती परिपक्वता, कुणाच्या तरी आशीर्वादाने शिखरावर बसविण्यात आलेल्या व्यक्तीत असेलच असे नाही. लोकही उगाचच कुणाहीकडून काहीही अपेक्षा ठेवू लागतात. परंतु, कमलनाथ यांची ही स्वामिनिष्ठा जनतेला पचनी पडेलच असे नाही. ही जनता एका क्षणात होत्याचे नव्हते करायला मागेपुढे पाहणार नाही.
तीच गोष्ट संघ शाखांवरील बंदीला लागू आहे. कमलनाथ यांनी उगाचच आगीशी खेळून आपले हात भाजून घेऊ नयेत. सोनिया मॅडमला व राहुलजींना खुश केले म्हणजे आपले आसन मजबूत राहील, अशा स्वप्नातही कमलनाथ यांनी राहू नये. इतके वर्षे तसेही कमलनाथ यांना कचर्यासारखे दूर सारले होतेच. आताही तसे करण्यास हायकमांडला काही वेळ लागणार नाही. मग कुठल्या तोंडाने कमलनाथ लोकांसमोर जाणार? कमलनाथ यांचे वय बरेच असले, तरी अजून त्यांची राजकीय कारकीर्द संपलेली नाही. ती कारकीर्द अपमानास्पद रीतीने व्यतीत करायची नसेल, तर कमलनाथ यांनी सांभाळूनच वागावे, असा आमचा सल्ला आहे.
आज शिवराजिंसह पराभूत झाल्यावरही गावोगावी जाऊन लोकांना धन्यवाद देत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद लक्षणीय आहे. या लोकांना ते ‘टायगर अभी जिंदा है’ असा आश्वासक धीर देत आहेत. शिवराजिंसहांना पराभूत करून आपण चूक केली, याचे भान हळूहळू लोकांना येत आहे. या चुकीची भरपाई कशी करायची, या विचारात मध्यप्रदेशातील जनता आहे. याची चुणूक वंदे मातरम्च्या निमित्ताने आली आहे. शिवराजिंसह लोकनेते आहेत. ते लोकांमध्ये मिसळत आहेत. कॉंग्रेसच्या सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकर्यांची कशी फसवणूक केली, ते लोकांना समजावून सांगत आहेत. खरेतर, मध्यप्रदेशात शिवराजिंसहांनी शेतकर्यांसाठी जे केले, ते प्रशंसनीयच होते. आजारी राज्याला, प्रगतीच्या मार्गावर नेले. राज्यातील कृषी उत्पन्न विक्रमी पातळीवर नेले. शेतकर्यांना विविध मार्गांनी मदत दिली.
शेतकर्यांना कर्जमाफी न देता, त्याला त्याच्या पायावर स्वाभिमानाने उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु, निवडणुकीचे निकाल विरुद्ध गेले. त्याने शिवराजिंसह खचले नाहीत. आतापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी ते सतत दौरे करत आहेत. हे लोकनेत्याचेच लक्षण आहे. पंधरा वर्षांच्या ‘प्रस्थापित विरोधी’ भावनेला धुळीत मिळवून शिवराजिंसहांनी 109 आमदार निवडून आणले आहेत. हे कर्तृत्व कमी नाही. 2003 मध्ये तर सत्तारूढ कॉंग्रेसचे 30ही आमदार निवडून आले नव्हते, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आमचे म्हणणे आहे की, कमलनाथ यांनी सांभाळून राहिले, बोलले आणि निर्णय घेतले पाहिजे. सत्ता तुमची आहे, त्याचा माजही तुमचाच असणार आणि वेळ आली तर मातीतही तुम्हालाच जावे लागणार. जनतेने तुम्हाला संधी दिली आहे, त्याचे सोने करता येत नसेल तर किमान मातीतरी करू नका, असे सांगणे आहे...