हिंदू समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र! - सरसंघचालक

    31-Jan-2019
Total Views | 137

 

 
 
 
 

धर्मसंसदेत सरसंघचालकांची कठोर टीका

 

प्रयागराज : आज हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून अनेक प्रकारचे वाद निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची कठोर टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केली. प्रयागराज येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित धर्मसंसदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. भागवत यांनी शबरीमला मंदिराच्या प्रश्नासह हिंदुत्वाशी निगडीत अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.

 

या धर्मसंसदेला जगतगुरू स्वामी वासुदेवानंद सरस्वती अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे, स्वामी रामदेव, गीता मनीषि स्वामी ज्ञानानंद, जगतगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, जगतगुरू रामानुजाचार्य हंसदेवाचार्य, निर्मल पीठाधीश्वर श्रीमहंत ज्ञानदेव, स्वामी जितेंद्रनाथ, सतपाल महाराज, स्वामी वियोगानंद, श्रीमहंत नृत्यगोपालदास, केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे वरिष्ठ सदस्य तसेच आचार्य सभेचे महामंत्री स्वामी परमात्मानंद यांच्यासह असंख्य संत व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी म्हणाले की, शबरीमलाचा संघर्ष हा समाजाचा संघर्ष आहे. कम्युनिस्ट सरकार न्यायव्यवस्थेच्या आदेशाच्याही पुढे जात आहे. सरकार बळाच्या आधारे गैरश्रद्धाळूंना मंदिरात नेत आहे आणि जे अयप्पा भक्त आहेत त्यांचे मात्र दमन होत आहे. यामुळे हिंदू समाज संतप्त झाला आहे. आम्ही समाजाच्या या आंदोलनाचे समर्थन करतो, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

 

सरसंघचालक पुढे म्हणाले की, न्यायालयात जाणारे याचिकाकर्ते हे काही भक्त नव्हते. आज हिंदू समाजात फूट पडावी यासाठी अनेक प्रकारचे भेद निर्माण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. जातीय भेद निर्माण करण्याचेही प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. हे संकट रोखण्यासाठी सामाजिक समरसता, सामाजिक सद्भावना आणि कुटुंब प्रबोधन आदी गोष्टी कराव्या लागतील, असेही त्यांनी सांगितले. धर्म जागरणाच्या माध्यमातून जे हिंदू बंधू आपल्यापासून वेगळे झाले आहेत, त्यांना परत आणणे आणि त्यांनी पुन्हा वेगळे होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही प्रतिपादन डॉ. भागवत यांनी यावेळी केले.

 

हिंदू समाज हा स्वयंजागरूक असून त्याने वेळोवेळी काळानुसार आपल्या दोषांचे निर्मुलन स्वतःहून केले आहे. मात्र, असे असतानाही समाजावर दोष थोपवण्याचे प्रयत्न होतात, असे मिलिंद परांडे यांनी सांगितले. केरळमध्ये साम्यवाद वाढवायचा असेल तर भगवान अयप्पांवर असलेली श्रद्धा संपवावी लागेल, असे कम्युनिस्ट नेते नंबुद्रीपाद यांनी लिहून ठेवले असल्याचीही आठवण त्यांनी करून दिली. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज शबरीमला प्रश्नी केरळमधील कम्युनिस्ट सरकार बळाचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी स्वामी रामदेव, स्वामी ज्ञानानंद, स्वामी परमात्मानंद, स्वामी गोविंददेव गिरी यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

 

शबरीमलाचा संघर्ष अयोध्येसारखा तीव्र !

 

यावेळी या धर्म संसदेत हिंदुत्वाशी निगडीत दोन महत्वपूर्ण प्रस्ताव पारित करण्यात आले. स्वामी परमात्मानंद यांनी शबरीमलाची परंपरा आणि आस्था यांच्या रक्षणाचा संघर्ष हा अयोध्येइतकाच तीव्रकरण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यास स्वामी अय्यप्पादास यांनी अनुमोदन दिले. तसेच, ‘हिंदू समाजाच्या विघटनाच्या षडयंत्राचा सामना करण्याचाप्रस्ताव स्वामी गोविंददेव गिरी यांनी मांडला आणि संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद यांनी त्याला अनुमोदन दिले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121