केरळातील निसर्गाचा प्रकोप थरकाप उडवणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपांग असलेल्या राष्ट्रीय सेवा भारतीचे कार्यकर्ते इथे सैन्याच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात लागलेले आहेत. ना. गिरिश महाजनही हातची संपूर्ण रसदीसह देवभूमीत दाखल झाले आहेत. होय देवभूमीच! केरळला आपल्या संस्कृतीत देवभूमीचे स्थान आणि मान आहे. दुसरीकडे, याच राज्यात वेगाने भारतीय संस्कृतीचे अवमूल्यन झालेलेही आपण पाहिले आहे.
गोवंशहत्याबंदीच्या कायद्याविरोधात कॉंग्रेसकडून भर रस्त्यावर गाय कापण्याचे आंदोलन करण्यापर्यंत केरळची विकृती गेली. इथे संघ स्वयंसेवकांच्या हत्या ही नित्याची बाब बनलेली आहे. सत्ताही सीपीआय-कॉंग्रेसचीच आहे. केरळात संघ स्वयंसेवकच नव्हे तर थोडेथोडके उरलेले हिंदू स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. असं सगळं, सगळं बाजूला ठेवून आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अवघा परिवार वसुधैव कुटुंबकम् (हे विश्वची माझे घर) हा मंत्र इथे जगत आहेत आणि जागवत आहेत. संघाचे ८५ हजार स्वयंसेवक ज्यात २० हजार भगिनींचा सहभाग आहे. अहोरात्र मदतकार्यात जुंपलेले आहेत. स्वयंसेवकांनी स्वत: ७० हजारांवर लोकांना वाचवले आहे. देशभरातून संघाकडून मदत रॅली काढल्या जात आहेत. जळगावातूनही संघाचे केरळसाठी निधी संकलन सुरू आहे.
दुसरीकडे, लंडनला इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या डायसवरून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे संघाची तुलना ‘मुस्लिम ब्रदरहुड’शी करून मोकळे झाले आहेत. ‘मुस्लिम ब्रदरहुड’ ही अरब जगतातील सुन्नी संकल्पना आहे. इजिप्तमध्ये तिचा पुनर्उदय झाला. हसन अल बन्ना याने १९२८ मध्ये या संघटनेची स्थापना केली. ‘इसिस’ची निर्मितीही पॅन इस्लामच्या याच संकल्पनेतून झालेली आहे. अबू बक्र अल बगदादी हे याच कल्पनेचे एक संकरित अपत्य.
इतर धर्मियांचा समूळ नाश हे ‘मुस्लिम ब्रदरहुड’चे तसेच ‘इसिस’चे ध्येय आहे. थोडक्यात काय तर, मुस्लिम ब्रदरहुड आणि आरएसएस सारखेच आहेत, अशी मुक्ताफळे राहुलबाबांनी उधळली आहेत, तीही दुसर्या देशात जाऊन. राहुलबाबांच्या भारतीयत्वावर शंका यावी, असेच त्यांचे हे कृत्य आहे. कारण त्यांनी जे केलंय, तसं आतापर्यंत फक्त पाकिस्तानचे राजकारणी आपापसात करीत आले आहेत. व्यासपीठ कुठलं आहे, याची तमा न बाळगता पाकिस्तानातले विरोधी पक्ष नेते सत्ताधारी पक्षावर वाट्टेल ती टीका करत आलेले आहेत आणि करत असतात.
श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी हे संघाच्या मुशीत तयार झालेले. विरोधी पक्षात असूनही युनोत भारत सरकारची बाजू मांडायला ते गेले होते. बांग्लादेश मुक्तीसंग्रामात इंदिरा गांधी आणि पर्यायाने कॉंग्रेसच्या बाजूने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उभे राहिले होते. जेथे देशाचा विषय येतो, तिथे पक्ष बाजूला ठेवायला हवा, हा संस्कार अटलजींच्या रुपात रुजला.
इसिसने इराकमधल्या यजिदी लोकांना रांगेने उभे करून गोळ्या घातल्या. अपहृत अन्य धर्मियांचे हातपाय बांधून चाकूने त्यांचे गळे कापले. ‘मुस्लिम ब्रदरहुड’ला तर खुद्द सऊदी अरब, बहारिन, इजिप्त, सिरिया, संयुक्त अरब अमिराती या मुस्लिम देशांनीच दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. अशा संघटनेशी आरएसएसची तुलना करताना राहुलबाबांना काहीही कसे वाटले नसेल? हा मला प्रश्न पडलेला आहे.
केरळात आली तशी नैसर्गिक आपत्ती याआधी काश्मिरात आली होती त्या काश्मिरात जिथे भारताचा तिरंगा जाळला जाणे सामान्य बाब आहे; त्या काश्मिरात जिथे भारतीय जवानांवर दगडफेक सामान्य बाब आहे; त्या काश्मिरात जिथे मुस्लिम ब्रदरहुड, इसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावले, मिरवले जाणे सामान्य बाब आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या काश्मिरात जिथे एकही काश्मिरी ब्राह्मण शिल्लक राहू दिला गेलेला नाही! अरे राहुलबाबा तिथे काश्मिरातही अतिवृष्टीच्या आपत्तीत हे सारं सारं बाजूला ठेवून केवळ मानवीय दृष्टिकोनातून, विश्वबंधुत्वाच्या आणि आपल्या दृष्टिकोनातील भारतीयत्वाच्या भावनेला साक्ष ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भव्य म्हणावे असे मदतकार्य केले. अशा आरएसएसची तुलना ‘मुस्लिम ब्रदरहुड’शी करता? राहुलबाबा, तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय?
पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा इंग्रज सरकारने केलेल्या जुलुमावर ‘तुमचे डोके ठिकाणावर आहे काय?’, असा सवाल लोकमान्यांनी केला होता... आणि त्याच इंग्रजांच्या देशात जाऊन तुम्ही भारत सरकारवर, सत्ताधारी पक्षावर आणि कुठलेही औचित्य नसताना, काहीही ताळमेळ नसताना उदात्त, उज्ज्वल आणि सोज्वळ अशा संघ परिवारावर असली हिन दर्जाची टीका करीत आहात अरे, याच ‘मुस्लिम ब्रदरहुड’सदृश कल्पनेची रुजवात तेव्हाही म्हणजे महात्मा गांधींच्या काळातही भारतात झालेली होती आणि तेव्हा सत्तेत असलेल्या याच इंग्रजांनी हा देश तोडावा म्हणून या कल्पनेला हवा दिलेली होती... आणि ती वास्तवातही आणली होती. याच कल्पनेने अखेर आपल्या अखंड देशाचे तीन तुकडे केले आहेत राहुलबाबा. त्याच इंग्रजांच्या देशात जाऊन तुम्ही पुन्हा भारत फोडायला निघाला आहात की काय? पण तसे आता घडणार नाही. कारण आता भारताचे अस्सल राष्ट्रीयत्व जागृत झालेले आहे.
तुम्ही गांधी असलात तरी भारत आता ‘अटल’ झालेला आहे
सार्वत्रिक निवडणुकांतून तुमचं पान हलत नाहीये म्हणून सुपारी घेतलीय की काय राहुलबाबा तुम्ही पाकिस्तानकडून? इथे केरळच्या रुपात देश संकटात असताना तुम्ही तिकडे भाषणे झोडत आहात. नाहीतर आमचे गिरिशभाऊ बघा, सर्वत्र विजयाची पताका फडकत असूनही केरळात धडकले आहेत. तिथं शेतातून, घरातून आणि डोळ्यातून साचलेल्या पाण्याची आळवणी करताहेत. अश्रू आवरत आहेत आणि विस्कटलेलं सावरत आहेत शिका थोडं!!!
- कैलास सोनवणे (माजी नगरसेवक) अध्यक्ष- श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, जळगाव, मो.७७५८८८०९८०