बोलावलेच नाही तर प्रचाराला येऊ कसा?

    25-Jul-2018
Total Views | 24

ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांची खंत

 
जळगाव :
पक्षाला माझी गरज राहिलेली नाही आणि वाटतही नसावी, त्यामुळे मला जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रचारासाठी कुणी बोलावलेे नाही. यामुळे सध्या तरी जळगावला प्रचाराचे नियोजन केलेले नाही, अशी खंत भाजपचे जेष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीनिमित्त ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला होते, मंगळवारी सकाळी ते घरी परतले.
 
 
जळगावच्या बहुसंख्य प्रभागातील मतदार बंधू-भगिनी, विशेषत: युवक, नवमतदार त्यांच्या अभ्यासू, धारदार, घणाघाती भाषणाची वाट पाहत आहेत. पावसामुळे आणि शहरात बहुसंख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे झाल्याने प्रचार थंडावला आहे, शिवाय उमेदवारांचे त्यांच्या खर्चावर कडक लक्ष असल्याने अनेकांनी हातपाय गाळले आहेत. परिणामी निवडणूक आहे की नाही?... असा प्रश्‍न वारंवार पडत आहे, या पार्श्‍वभूमीवर आ.खडसे यांच्याशी सुसंवाद साधला असता त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
 
 
तुम्ही कधी, केव्हा आणि किती सभा घेणार, प्रभागश: बैठकी, भेटीगाठीचे काही नियोजन आहे का?... याबाबत त्यांना विचारले असता ते बोलत होते. आ.सुरेश भोळे यांचा फोन आला. ते सारखे विचारणा करीतही होते. पण अन्य पदाधिकार्‍यांना मला बोलवायचे नसावे, असे वाटत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
रात्री उशिरा आ. सुरेश भोळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी जळगावात येत आहेत. दुपारी १ वा. मॉडर्न हायस्कूलच्या आवारातील भव्य डोममध्ये पक्ष उमेदवार व कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. त्याच दिवशी सायंकाळी ६ वा. महाबळ परिसरात, ७ वा. गणेश कॉलनी आणि रात्री ८ वा. पिंप्राळा येथे जाहीर सभा होणार आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित राहतील. या सभांना आणि नंतरही आ. एकनाथराव खडसे प्रचारात सहभागी होतील, अशी माहितीही आ.भोळे यांनी दिली.
 
आता पुढे काय?...:
आ.खडसे यांची नाराजी लक्षात घेता आणि त्यांचा प्रभाव व शक्ती लक्षात घेता पक्षाची प्रचार आघाडी वा वरिष्ठ पदाधिकारी काय निर्णय घेतात, काय मार्ग काढतात, याकडे सर्वच पक्षीय उमेदवार, विशेषत: भाजप उमेदवारांचे लक्ष लागले आहे. याबाबत भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची भूमिका कळू शकली नाही.
 
 
येऊन काय बोलू?
प्रचारफेर्‍या, सभा घेतल्याच तर काय बोलावे, हा प्रश्‍न पडतो. कालपर्यंत ज्यांच्यावर धारदार शब्दात टीकाप्रहार केले, त्यांच्याविरूद्ध बोललो, विरोधात भूमिका मांडली, त्यांच्याबाबत काय बोलणार?... त्यांना पवित्र मतदान करा, असे आवाहन कसे करु ?..., अशी विचारणावजा व्यथाही त्यांनी व्यक्त केली. काही लोक पक्षात आले अन् पवित्रही झाले, असे उद्गारही त्यांनी काढले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121