आयुक्तांकडून रस्त्यावरील खड्डे कामाच्या पाहणी
मुंबई : मुंबईच्या रस्त्यावरील तातडीने खड्डे बुजवा असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. आज खड्डे भरण्याच्या कामांची पाहणी आयुक्तांनी केली. मुंबईतील रस्ते कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. याचे पडसाद पालिकेच्या सभागृहात उमटल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी ४८ तासांत खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले, मात्र आतापर्यंत खड्डे बुजलेले नाहीत. रस्त्याची कामे योग्य पध्दतीने न करणार्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
चुकीच्या पध्दतीने काम करणार्या अशा कंत्राटदारांकडून दररोज एक लाख रुपये दंडाची वसुलीही करण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाने घेतला आहे. रस्ते कामांसाठी १० कोटी व त्यावर पडलेले ख़ड्डे बुजवण्यासाठी तब्बल १२५ कोटी रुपये पाण्यात गेल्याने पालिकेवर टीका केली जाते आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना रस्त्यावरील पडलेले शेकडो ख़ड्डे कधी बुजणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातो आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, माटुंगा, दादर, मुंबई सेंट्रल, ताडदेव, चिंचपोकळी आदी ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी करून मुदतीत खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या आहेत.