प्लास्टिक बंदीसाठी प्रबोधनाचीच गरज, अनेक बाबींकडे लक्ष देणे आवश्यक

    27-Jun-2018
Total Views | 564

कायद्याच्या सक्तीऐवजी लोकसहभाग महत्त्वाचा
लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे जागृती

प्लास्टिकला हवा योग्य पर्याय
जळगाव, २६ जून :
गेल्या आठवडयात राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. या प्लास्टिक बंदीचा धसका सर्वांनीच घेतला. पण शासनाने प्लास्टिक वापरासंदर्भात काही उत्पादनात सुट दिली आहे. तरीही संपूर्ण प्लास्टिकबंदी साध्य होण्यासाठी प्रबोधनाचीच गरज असल्याचे दिसून येत आहे. यादृष्टिने प्लास्टिकविषयक पुढील बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 
 
प्लास्टिक बंदी का करावी लागली याचा अभ्यास केला तर प्लास्टिकशी संबधीत अनेक बाबी स्पष्ट होतील.धातुची भांडी तसेच वस्तूंना पर्याय म्हणून प्लास्टिकचा उगम झाला. प्लास्टिकच्या शोधाने क्रांती झाली. आज प्लास्टिक मनुष्य जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. असे असतांना प्लास्टिक बंदी का करावी लागली याचा विचार होणे आवश्यक आहे. प्लास्टिक जसे उपयोगी आहे तसेच त्रासदायकसुध्दा आहे. प्लास्टिकचा कचरा हा विकसित देशातील मोठी समस्या आहे. प्लास्टिकचे फायदे पाहून भारतीयांनी प्लास्टिकच्या पातळ पिशवीपासून निर्मितीची सुरुवात केली. प्लास्टिकच्या कचर्‍यामुळे सर्वच प्रकारचे प्रदूषण होत आहे. मुंबई तुंबल्यामुळे राज्यात प्लास्टिकचे तोटे समजायला लागले. प्लास्टिक हे जलचर व भूचर प्राण्यांसाठी घातकच ठरले आहे.
 
 
रुग्णालयातील शल्यचिकित्सेपासून स्मशानभूमी पर्यंत प्लास्टिकचा वापर होत आहे. केवळ नियम बनवून व त्यांची कठोर अंमलबजावणी करुन ही समस्या सुटणार नाही. यासाठी लोकांमध्येच जागृती होणे आवश्यक आहे. कायद्याची सक्ती करण्यापेक्षा लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही प्रदूषणामुळे पर्यावरणाच्या होणार्‍या नुकसानापेक्षा प्लास्टिकमुळे होणारे नुकसान सर्वाधिक आहे.
 
 
प्लास्टिक बंदीबाबत समाजातुन बर्‍या-वाईट प्रतिक्रिया येत आहे. अनेक उद्योग प्लास्टिकवर आधारीत आहेत. जर हे उद्योग बंद केले गेले तर मोठया प्रमाणात रोजगाराची समस्या उत्पन्न होईल. प्लास्टिकची सवय लागलेल्या नागरिकांना त्याच्या वापरापासून थेट प्रवृत्त करणे गरजेचे आहे. त्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध असणे तेवढेच महत्वाचे आहे.
 
 
प्लास्टिकच्या कोणत्याही निर्मितीपेक्षा प्लास्टिकच्या पिशवी, ग्लास, कप, चमचे आणि थाळी, थर्माकोलचे प्रॉडक्ट हेच प्रदूषणास सर्वाधिक कारणीभूत आहे. प्लास्टिक बॅग्जला कापडी पिशवी, कागदी पिशवी हे चांगले पर्याय आहेत. नियमांची अंमलबजावणी ही स्थानिक प्रशासनाकडून जर योग्य पध्दतीने अंमलबजावणी झाली असती तर कदाचित शासनाला कठोर उपाययोजनांची गरज भासली नसती. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी नागरिकांच्या सहभागानेच यशस्वी होवू शकते. त्यासाठी त्यांचे प्रबोधन व जनजागरण होणे आवश्यक आहे.
 
 
या उत्पादनांना आहे बंदी
प्लास्टिक पिशवी, चमचे, कप, ग्लास, स्ट्रॉ, प्लास्टिकची आवरणे, अन्न पदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोलच्या सजावटीच्या वस्तु यावर बंदी आहे.
 
 
या उत्पादनांना आहे सूट
अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या, औषधांचे वेष्टन, कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लॅस्टिक, नर्सरीमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक, अन्नधान्यांसाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या, ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या, रेनकोट, कच्चा माल साठविण्यासाठी असलेले प्लास्टिक, टिफीन, डिस्पोजल बॅग, टी.व्ही, फ्रिजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल, बिस्कीट व व्हेफर यंाच्या पुडयांचे वेष्टन यांना या प्लॅस्टिक बंदीच्या नियमातून सूट देण्यात आली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121