जळगाव डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्धाटनअमळनेर, चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार-खा. ए. टी. नाना पाटील

    23-May-2018
Total Views | 43
 
जळगाव डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्धाटन
अमळनेर, चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार-खा. ए. टी. नाना पाटील
जळगाव, २३ मे
केंद्र शासनाच्यावतीने गेल्या चार वर्षापासून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून नागरीकांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी लवकरच पोस्ट विभागामार्फत देशात पोस्टल बँक सुरु करण्यात येणार असून जळगाव लोकसभा मतदार संघात अमळनेर व चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार असल्याची माहिती खासदार ए. टी. नाना पाटील यांनी दिली. भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या पोस्ट खात्याच्या क्वार्टर मध्ये डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार ए. टी. (नाना) पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फित कापून करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.उज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, भारतीय विदेश सेवेच्या मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी, औरंगाबाद डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार, अतिरिक्त क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलशीदास शर्मा, डाक अधीक्षक बी. व्ही चव्हाण, शिवाजी पाटील आदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी विदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यक भासत असत. त्यावेळी त्यांना मुंबई, औरंगाबाद, नाशिक येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. आता जळगाव शहरात डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाल्याने या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. केंद्र शासन नागरीकांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देत असते. या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन आता केंद्र शासनाने अशा लाभार्थ्यांसाठी इंडियन पोस्टल बँक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकेच्या माध्यमातून देशातील सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते या बँकेत उघडण्यात येणार असून त्यांना मिळणारे अनुदान व इतर लाभ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येणारा कर्जपुरवठाही या बँकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या बँकेच्या शाखा पहिल्या टप्प्यात अमळनेर व चाळीसगाव येथे सुरु होणार असल्याचेही खासदार पाटील यांनी सांगितले .जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळावी. यासाठी जिल्ह्यात भुदल व नौदलाची विशेष भरती मोहिम राबविण्यात आली. चाळीसगाव येथे सैन्य भरती केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही खासदार पाटील ते म्हणाले
शहराच्या नवीन भागात पोस्ट कार्यालय सरु करावे-आमदार भोळे
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नवीन भागात पोस्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली.
भारतीय विदेश सेवेच्या मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी म्हणाल्या की, आजपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व केळी पिकविण्यात देशात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होत असल्याचा आनंद वेगळा आहे. पूर्वी देशभरात फक्त् ३६ पासपोर्ट कार्यालये होती. आता ९२ कार्यालये सुरु झाली असून जळगावचे डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र हे देशातील २१० वे सेवा केंद्र असून अजिंठा लेणी जवळ असल्याने तसेच जळगावात एज्युकेशन हब, औद्योगिक हब व मेडिकल हब होत असल्याने या पासपोर्ट सेवा केंद्रास महत्व असल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
जळगाव डाक कार्यालयामार्फत लवकरच नोडल पार्सल सेंटर सुरु करण्यात येणार असून या सेंटरच्या माध्यमातून नागरीकांना घरपोच पार्सल सेवा देण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद डाक क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल प्रणव कुमार यांनी दिली.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121