आंबा खाताय, सावधान

    28-Apr-2018
Total Views | 41
 
 
 
 
 
 
 
आंबा खाताय, सावधान!
जळगाव, २८ एप्रिल ः
आंबा हे सर्वांचेच आवडते फळ. त्यामुळे त्याची चव चाखली नाही, असा एकही जण सापडणार नाही. त्यामुळे उन्हाळा सुरु झाला की सर्वांना आंबा खाण्याचा मोह आवरता येत नाही. पण हा आंबा खाणे शरीरासाठी किती महाग पडू शकतो, त्याचा प्रत्यय आला तो शहरातील एका महिलेला. ते कसे यासंदर्भात ‘तरूण भारत’ने डॉक्टरांकडून जाणून घेतलेली ही माहिती...
बाजारात सध्या रसायनांनी कृत्रिमरित्या पिकविलेले आंबे मोठ्या प्रमाणावर आले आहेत. हे आंबे वरवर पाहता पिवळे धमक दिसत असले तरी आतून मात्र कच्चे आणि बेचव असल्याचे आढळते. प्रत्यक्षात आंब्याचे सेवन केल्यानंतर अनेकांना त्रास झाल्याचेही प्रकार घडले आहेत. परंतु त्याचे कारण मात्र इतर गोष्टींवर ढकलले जाते.
आंब्याच्या माध्यमातून शरीरात जाणार्‍या विषमय बाबींकडे मात्र फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. खरेतर याचाच विचार व्हायला हवा. अर्पिता पाटील (नाव बदललेले) या शहरातील रहिवासी आहेत. सध्या उन्हाळा सुरु असून या दिवसात आंब्यापासून बनविलेले पदार्थ आवर्जून खाल्ले जाते. अर्पिता यांनाही आंबा खाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे यातील विषमय घटकांमुळे त्यांच्या चेहर्‍यावर सुरूवातीला लहान पुरळ झाले. ते मोठे होवून त्याचे सेप्टीक स्वरुपात रुपांतर झाले. त्यामुळे त्यांचा जबडा आखडून त्याची हालचाल मंदावली. यामुळे पाणी पिणेही त्यांना अवघड झाले. या प्रकारामुळे अर्पिता गोंधळून गेल्या. त्या तातडीने डॉक्टरांकडे गेल्या. हा प्रकार बघून डॉक्टर अवाक् झाले. त्यांनी तातडीने उपचार सुरु केला आणि ही जखम भरून येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने सक्तीने आंबा खाणे टाळा, असा वैद्यकीय सल्लाही त्यांनी दिल्याची आपबिती अर्पिता यांनी कथन केली. तेव्हा आंबा खाणार्‍यांनो, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची की नाही, हे तुम्हीच ठरवा.
आंबे न खाण्याचा
डॉक्टरांनी दिला सल्ला
रसायनाने पिकविलेले आंबे शरीरासाठी घातक आहेत. त्याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे आंबेच नव्हे तर चमचमीत, तिखट, तळलेले पदार्थ खाणे प्रकर्षाने टाळा. तसेच औषधे नियमित घेवून काही दिवस सक्तीने विश्रांती घेण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121