दो रंग रंग दुनिया के

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018   
Total Views |




जीवनातील वास्तवावर काही चित्रपट गीते अगदी नेमकेपणाने भाष्य करतात. ‘दो रास्ते’ या चित्रपटामधील ’दो रंग दुनिया के और दो रास्ते’ हे गीत अशाच गीतांपैकी एक. या गीतात म्हटल्याप्रमाणे कुठे कमालीची आत्मकेंद्री वृत्ती पहायला मिळते तर कुठे पराकोटीचा त्यागही अनुभवास येतो. कोण कुठल्या मार्गाने जाईल हे ज्याच्या त्याच्या संस्कारांवर अवलंबुन असते. अर्थात काळ कितीही जाहिरातबाजीचा, दिखाऊपणाचा असला तरी ही भपकेबाजी तात्पुरतीच असते. दीर्घकाळ प्रेरणा मिळते ती त्यागमय जीवनांतूनच. काहीही असले तरी हे दोन रंग मात्र कायम समांतर मार्गक्रमण करीत असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये या दोन्ही प्रकारची उदाहरणे आपल्या सर्वांच्याच नित्य अनुभवास येत असतात. जनकल्याण रक्तपेढीत काम करत असताना अनुभवलेल्या दोन घटना अशाच कायम स्मरणात राहिलेल्या आहेत. जीवनाचे दोन रंग स्पष्टपणे दर्शविणाऱ्या या घटना आहेत.


घटना पहिली

संध्याकाळची वेळ होती. एका तत्कालीन नगरसेवकाचे चार - पाच कार्यकर्ते रक्तपेढीत प्रवेश करते झाले. या नगरसेवकाच्या मातोश्रींना एका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना रक्तघटकांची आवश्यकता असल्याने त्याचसाठी ही मंडळी आली होती. ’आपण रक्तासाठी पैसे देण्याचे कारणच नाही’ हाच ठाम विचार करुन ही कार्यकर्ता मंडळी रक्तपेढीत आलेली. परंतु ’अमुक एखादा व्यक्ती नगरसेवक आहे अथवा कुठल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे किंवा कुठल्यातरी मोठ्या संघटनेचा कार्यकर्ता आहे’ हे जनकल्याण रक्तपेढीचे सवलत देण्याचे निकष नाहीत, तर रुग्णाची आर्थिक परिस्थिती किंवा सतत लागणारी रक्तसंक्रमणे याच दोन निकषांवर प्रामुख्याने सवलती दिल्या जातात. हे निकष व्यवस्थित माहिती असल्याने स्वागतकाने या कार्यकर्त्यांस तसे सांगुन ’आपणास कोणत्या निकषाखाली सवलत द्यावी ?’ अशी नम्र विचारणा केली. याला उत्तर म्हणून थेट या नगरसेवक महोदयांना फोन लावला गेला आणि तो स्वागतकाला जोडुन देण्यात आला. यावरही या स्वागतकाने ’आपण एकदा रक्तपेढी संचालकांशी बोलुन घ्यावे, म्हणजे मग मला त्याप्रमाणे आपणास सवलत देता येईल’ असे या ’माननीयांस’ सांगितले. यानंतर मा. नगरसेवकांचा फोन रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांना गेला. डॉ. कुलकर्णी यांनी सवलतींबाबतचे नियम अधिक विस्ताराने आणि सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगितले. मात्र यावरही ’सवलत मिळाली पाहिजे’ या मुद्द्यावर हे ’माननीय’ ठाम राहिले. शेवटी सवलतीबाबतचा त्यांचा आत्यंतिक आग्रह लक्षात घेत डॉ. कुलकर्णी यांनी त्यांना एका विशिष्ट नमुन्यात असलेला सवलतीचा अर्ज भरुन त्यावर सही देण्यास सांगितले. तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांकडून या अर्जावरील मजकूर नगरसेवक महोदयांनी समजून घेतला. ’…… या रक्तघटकांसाठी येणारा खर्च करण्यास मी पूर्णत: असमर्थ आहे, तरी मला सवलत दिली जावी’ हा या अर्जावरील मजकूर बहुधा या महोदयांना अडचणीचा वाटला असावा. कारण अशा मजकुराखाली सही देण्याचे अखेरीस त्यांनी नाकारले. अर्थात त्यांना योग्य ते रक्तघटक वेळेत देण्याचे काम मात्र कुठेही थांबले नाही.


घटना दुसरी

मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक काही गंभीर आजारावरील उपचारांकरिता पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल झाले होते. जगन्मित्र असलेल्या या प्रचारकांचा कित्येक घरांमध्ये अगदी जिवंत संपर्क असल्याने त्यांना भेटण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर ये – जा चाललेली होती. संघस्वयंसेवक या नात्याने आम्हीही त्यांच्या संपर्कात होतोच. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रियाही केली गेली. या शस्त्रक्रियेच्या वेळी त्यांना काही रक्तघटकांची आवश्यकता निर्माण झाली. या वेळी त्यांच्यासोबत असलेले त्यांचे बंधू – जे अन्य एका शहरात स्थायिक आहेत – रक्तघटक घेण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीत आले. आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आणीबाणीच्या काळापासून म्हणजे पंच्याहत्तर सालापासून प्रचारक-जीवन जगणाऱ्या आणि अर्थातच वैयक्तिक संसारादी कुठल्याही पाशात न अडकता संन्यस्त वृत्तीने केवळ संघाचे काम करीत राहिलेल्या या प्रचारकांकडून रक्तघटकांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे सुमारे सहा हजार रुपयांचे हे रक्तघटक आम्ही पूर्ण सवलतीमध्ये या प्रचारकांसाठी यावेळी देऊ केले, जे खरे म्हणजे आमचे कर्तव्यच होते. हे रक्तघटक घेऊन जातानाही या प्रचारकांचे बंधू हे शुल्क देण्याचा खूपच आग्रह करत होते. पण या घराने राष्ट्रकार्यासाठी एक उच्चशिक्षित पूर्णवेळ कार्यकर्ता आयुष्यभरासाठी देऊ केला आहे, शिवाय या प्रचारकाने स्वत: चा असा प्रपंच मांडलेलाच नाही हा सर्व विचार करुन हे शुल्क घेणे आम्ही विनम्रपणे नाकरले. यथावकाश ही शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली. काही दिवस विश्रांती घेऊन हे ज्येष्ठ प्रचारक रुग्णालयातून बाहेरही आले, चालु – फिरु लागले.

यानंतर काही दिवसांनी रक्तपेढीत एक पत्र आले. हे पत्र याच प्रचारकांच्या बंधूंनी पाठवले होते. या पत्राव्दारे आपल्या बंधुच्या आजारपणात रक्तपेढीने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले होते. रक्तपेढीच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या होत्या. पत्राची शेवटची ओळ वाचून मात्र मी चमकलो. ’सोबत देणगीचा एक धनादेश पाठवतो आहे, त्याचा स्वीकार करावा’ अशी विनंती या ओळीत त्यांनी केली होती. मी तो धनादेश पाहिला. बरोबर, रुपये सहा हजार इतकी रक्कम त्या धनादेशावर नोंदलेली होती. मी क्षणभर शहारलो. कारण आपले आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणाऱ्या संघप्रचारकासाठी आपण काही ना काहीतरी करु शकलो आहोत, असे वाटण्याला थोडीदेखील जागा या घराने शिल्लक ठेवलेली नव्हती. किंबहुना इतके अमूल्य योगदान देऊनही हे कुटुंब अजूनही काही देऊ इच्छित होते आणि तेही कुठल्या गवगव्याची अपेक्षा न ठेवता. अगदी सहजपणे. ’समाजाकडून आम्हाला काहीसुद्धा नको, क्वचित काही मिळालेच तर तेही पुन्हा समाजासाठीच समर्पित झाले पाहिजे’ हा खूप मोठा संस्कार या घराने आपल्या छोट्याशा कृतीतून दाखवून दिला.

मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित

चाहता हूँ मातृ-भू तुझको अभी कुछ और भी दूँ


या आजवर माहिती असलेल्या थियरीचे एक प्रॅक्टीकल मी प्रत्यक्ष पहात होतो. या देणगीची काही विशिष्ट रक्कम असली तरी तिचे मोल मात्र या रकमेपेक्षा खूपच मोठे होते.

या दोन घटनांवर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही. ’दो रंग दुनिया के’ हेच खरं !

- महेंद्र वाघ
@@AUTHORINFO_V1@@