
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना आप आमदाराने मारहाण केली आहे. त्यापार्श्वभूमीवर केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यकाळात मुख्य सचिव देखील सुरक्षित नाहीत, मुख्य सचिवाला मारहाण करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे, असा टोला भाजपने लगावला असून, त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. आम आदमी पक्ष सध्या अशाच घटनांसाठी प्रकाश झोतात येत आहे. आपचे यापूर्वी २० आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले, तसेच १२ आमदारांवर हिंसाचाराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती, संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यापद्धतीने मुख्य सचिवांना मारहाण केली त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो, असे पात्रा यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर केजरीवाल यांनी घडलेल्या प्रकाराबाबत दिल्लीच्या जनतेची माफी मागावी असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.