मुंबई : विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ८ विद्यार्थी जखमी झाले असून ३ जणांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये ६ तरुण आणि २ तरुणींचा समावेश आहे. मिठीबाई कॉलेजच्या बीएमएस विभागाकडून 'कॉलेजिअम' या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई महाविद्यालयात गुरुवारी संध्याकाळी महाविद्यालयात वार्षिक कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी प्रवेशिका नसतानाही घुसखोरी केल्याने गर्दी वाढल्याचे कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कार्यक्रमाला सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याने गर्दी वाढली होती. गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीत होऊन विद्यार्थी जखमी झाले. सभागृहात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित असल्याने श्वास कोंडण्यास सुरुवात झाल्याने हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी घटनेच्या प्राथमिक चौकशीनंतर स्पष्ट केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/