मुंबई :
पाण्यासाठी आपल्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे असे स्वतः आ.नाथाभाऊ खडसे यांनीच म्हटल्याने विधानसभेला धक्का बसला. दुष्काळावर मंगळवारी विधानसभेत चर्चा झाली, त्यावेळी आ.खडसे बोलत होते.
दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज नाही, कर्मचारीवर्ग कमी आहे असे सांगत नाथाभाऊंनी सरकारी कारभारावर पुन्हा तोफ डागली. आज आपल्या मतदारसंघात पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे असे सांगत ते म्हणाले की, माझ्यासारख्या व्यक्तीला पाण्यासाठी तीन तीन महिने पत्रव्यवहार करूनही शासन यंत्रणेकडून दाद मिळत नसेल तर इतरांचे काय होत असेल? तुमच्याकडे कर्मचारीवर्गच नाही तर काय दुष्काळावर मात करणार? दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला. आता पायर्यांवर बसण्याची परवानगी द्यावी म्हणून अध्यक्षांना पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांना देखील याबाबत माहिती दिली, मात्र न्याय मिळाला नाही असे सांगत, आपण आता जायचे कुठे असा प्रश्नही आ. खडसे यांनी केला.