खा. रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे यांनी सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याचा आक्षेप
भुसावळ, 17 नोव्हेंबर
खा. रक्षाताई खडसे आणि आ. संजय सावकारे यांनी गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेकडे दुर्लक्ष केले. या भागातील विस्थापित झालेल्या नागरिकांचे होणारे हाल त्यांनी येऊन बघायला पाहिजे होते.
बरेच दिवसांपासून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपण त्यावर आजपर्यंत उपाययोजना का केली नाही, यासह अनेक प्रश्नांचा भडीमार रेल्वे अतिक्रमित भागातील नागरिक व भारिप पदाधिकार्यांनी खासदार आमदार व नगराध्यक्षांना विचारून त्यांना भंडावून सोडले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने लागलीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.
शहरातील यावल रोडवरील शासकीय विश्रामगृहात आज 17 रोजी बहिणाबाई महोत्सवाचे आयोजनाविषयी पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. बैठकीत खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असतानाच मध्येच रेल्वे प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या अतिक्रमित भागातील झोपडपट्टीधारकांनी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीत प्रवेश करीत खा. रक्षा खडसे व आ. सावकारे यांना पुनर्वसनाबाबत विचारणा केली.
प्रसंगी या भागातील महिला आक्रमक झालेल्या दिसून आल्या. आपली व्यथा मांडताना काहींच्या डोळ्यात अश्रू आले होते. आपली मुले गत दोन दिवसांपासून उघड्यावर आहेत. आपण काहीतरी करा, अशी आर्जवाची विनवणी करताना नागरिक दिसत होते.
लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण मोहिमेकडे पाठ फिरविली असा आरोप करीत आपण याकडे लक्ष द्यावयास पाहिजे होते. आमचा संसार उघड्यावर आला असून आपणास काही दया-माया आहे की नाही, असे खडे बोल त्यांना सुनावले. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते.
तत्काळ पोनि. बाबासाहेब ठोंबे, देवीदास पवार, रामकृष्ण कुंभार, सपोनी दीपक गंधाले यांच्यासह कर्मचारी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आणली.
जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा करणार : खा. रक्षाताई खडसे
अतिक्रमित भागातील नागरिकांविषयी आम्हास सहानुभूती असून हा रेल्वे अखत्यारीत प्रश्न असल्यामुळे त्याबाबत काही करु शकत नाही. मात्र, या भागातील खरोखर जे गरजू असतील त्यांचे पुनर्वसन व्हावे, अशी आमची भूमिका असून आजच याबाबत जिल्हाधिकार्यांकडील बैठकीत हा प्रश्न मांडणार असल्याचे खा. रक्षाताई खडसे, आ.सावकारे यांनी यावेळी सांगितले.
खरोखर जे गरजू असतील त्या लोकांची यादी तयार करावी : आ. संजय सावकारे
झोपडपट्टीधारकांच्या वतीने सहभाग घेतलेल्या भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा सोनवणे यांच्याशी चर्चा करताना आ. सावकारे यांनी सांगितले की, आपण कोणाचाही राजकीय हस्तक्षेप न घेता खरोखर जे गरजू असतील, त्यांची यादी बनवावी व यादी प्रशासनाला दिल्यास त्यांच्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करु. तसेच शहरातील व शहराबाहेर काही खुले भूखंड असतील तेथे आपण पुनर्वसनाबाबत चर्चा करुन हा प्रश्न सुटू शकतो. मात्र, यासाठी काही काळ वेळ द्यावा लागेल. असे आश्वासन आ.सावकारेंनी यावेळी दिले.