पहूर :
येथे आज आरोग्य विभागाने डेंग्यूग्रस्त भागात कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबवून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले.
पहूर-कसबे येथील महेंद्रनगर भागात दोन बालकांना डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने आज दखल घेऊन तातडीने कंटेनर सर्वेक्षण मोहीम सुरू केली. या मोहीम अंतर्गत घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्यांमध्ये (अॅबेटिंग) डास अंडी नाशक द्रव्य मिसळण्यात येत आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वानखेडे (एम. एस.), आरोग्य सेवक आर. बी. पाटील, पर्यवेक्षक एम. एस. सुरडकर तसेच गावातील आशासेविका या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
दरम्यान, डेंग्यूची लागण झालेल्या बालकांची प्रकृती सुधारत असल्याचे पालकांनी सांगितले. आरोग्य विभागाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तसेच ग्रामपंचायतीनेसुध्दा डासांपासून होणार्या रोगांवार उपाय म्हणून स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच गावात धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.प्रशासनाने पाणी साठवलेले साठे स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे.घरातील डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभागाने उपयायोजना केल्या आहेत.