निमखेडीजवळ बंधारा बांधल्यास ‘तापमान वाढ’ नियंत्रित होऊ शकते
पाण्याचा अतिरिक्त साठा उपलब्ध होईल, हरितपट्टे तयार होणे आवश्यक; अभियंता प्रकाश पाटील यांचे मत
जळगाव, २१ ऑक्टोबर
गिरणा नदीवर निमखेडीजवळ बंधारा बांधल्यास त्यात जमा होणार्या पाण्यामुळे तापमान वाढ नियंत्रणात येईल तसेच पाण्याचा अतिरिक्त साठाही उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती अभियंता प्रकाश पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
जगात सध्या सर्वत्र तापमान वाढीची चर्चा होत आहे. जळगाव शहरात कमाल तापमान ४८ च्याही पलीकडे जाते. शहराच्या पश्चिमेला गिरणा नदी आहे. पूर्वी नदीचे पाणी शहरात पुरविले जाई, पण आता तेथे पाणीच दिसत नाही. नाशिक व पुणे शहरातून नदी वाहते. त्यामुळे नदीलगतच्या भागात दुपारी ४ वाजेनंतर तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. रात्री आल्हाददायक वाटते.
तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांनी जिल्ह्यासाठी नदीजोड प्रकल्प तयार केला होता. पण त्याचे पुढे काय झाले? हे आज ज्ञात नाही.
हरितपट्ट्यांमुळेही तापमान नियंत्रणात राहते, त्यासाठी ठोस काम झाले पाहिजे. शिरपूर शहरात खुल्या जागांमध्ये कडूनिंबाची झाडे लावून ती जगविण्यात आली आहेत. त्याचे सुपरिणाम या शहरात गेल्यावर आपल्याला जाणवतात.
निमखेडीजवळ लवकरात लवकर बंधारा तयार झाल्यास पावसाळ्यात जे पाणी वाहून येते ते यात साठविता येईल, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन अभियंता प्रकाश पाटील यांनी केले आहे. अशाच प्रकारचे छोटे-छोटे बंधारे बांधून त्यात पाणी साठवून ठेवल्यास देश नक्कीच समृध्द होईल. पण त्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जुन्या पुलाचा होईल उपयोग
जळगाव शहराला पूर्वीपासून मेहरूण तलाव व गिरणी नदी हे पाण्याचे दोन स्त्रोत आहेत. गिरणा नदीत आता पाणी नसते तर मेहरूण तलाव पूर्ण क्षमतेने भरत नाही. नदीवरील लमांजन बंधार्यात काही प्रमाणात पाणी असते. जळगाव शहराचा विचार केल्यास चार ते साडेचार कि.मी. अंतरावरील निमखेडीजवळ जुन्या राष्ट्रीय महामार्गाचा जीर्ण पूल आहे. त्यावरील वाहतूक बंद असून, पुलाचा बराचसा भाग नदीपात्रात पडला आहे. त्याचा वापर करून कमी खर्चात बंधारा बांधता येणे शक्य आहे. याबाबत पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.
बंधारा बांधल्यास अनेक फायदे होतील
गिरणा नदी शहराच्या पश्चिम दिशेला आहे. संध्याकाळी वारे पश्चिमेकडून वाहतात. ते नदीपात्रातील पाण्यावरून वाहत येतील, त्यामुळे शहराचे तापमान नियंत्रणात राहील.
गिरणा नदीचे पात्र सँडी सॉईल अर्थात वाळूचे असल्याने या ठिकाणी साठविलेले पाणी झिरपून आजूबाजूच्या जमिनीचे हरितक्षेत्र वाढण्यास मदत होईल.
राष्ट्रीय महामार्गाजवळ सध्याच्या गिरणा नदीच्या पुलाचे फाउंडेशन वाळू उपशामुळे ३ मीटरने उघडे पडले आहे. या ठिकाणी पाणी साठवून ठेवल्यास वाळू उपसा बंद होईल, तसेच पुलास निर्माण झालेला धोकाही टळेल.
जळगाव शहरातून जाणारे नाल्यांचे पाणी गिरणा नदीलाच मिळते. या ठिकाणी जलप्रक्रिया प्रकल्प बनवून पुनर्वापरास योग्य केलेले पाणी बंधार्यात त्याचा उपयोग शहरातील बांधकामे, उद्याने यांच्यासाठी करता येईल.