लोकांपर्यंत पोहोचल्याने विकासकामे शक्य : खा. रक्षा खडसे

    22-Oct-2018
Total Views | 64
 

 
 
 
 
लोकांपर्यंत पोहोचल्याने विकासकामे शक्य : खा. रक्षा खडसे
 
 
भुसावळ, २१ ऑक्टोबर
लोकांपर्यंत पोहोचल्यामुळेच मतदारसंघात विकासकामे करणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन खा. रक्षाताई खडसे यांनी दैनिक ‘तरुण भारत’च्या भुसावळ कार्यालयात आल्या असता मुलाखतीदरम्यान केले. खा. रक्षाताई खडसे यांनी नुकतीच भुसावळ विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट देऊन ‘तरुण भारत’च्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कार्यालयीन प्रतिनिधीस दिलेल्या मुलाखतीत जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यामुळे सामान्य माणसांच्या हिताची विकासकामे रावेर मतदारसंघात करता आली असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्‍नांची त्यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली.
 
 
प्रश्न : देशातील सर्वात मोेठ्या लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क ठेवणे अवघड वाटते का?
उत्तर : मतदारसंघ निश्चित मोठा आहे. नाथाभाऊंचे नाव आणि काम प्रत्येक गावागावात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक गावात जाऊन समस्या जाणून घेतल्या. सर्वच कामे खासदार निधीतून करू शकत नसल्याने गावातील समस्या कोणत्या योजनांच्या माध्यमातून सोडविल्या जाऊ शकतात, हे जाणून घेतले. अनेक ग्रा. पं. ना प्रस्ताव तयार करायला लावून जि.प.मधून कामे मंजूर केली. दलितवस्ती सुधार, अंगणवाडी आदी कामे पाठपुराव्यांसह जि.प.च्या माध्यमातून करून घेतली. जि.प.चा असलेला अनुभव यासाठी कामी आला. मतदारसंघातील १ हजार ४०० गावांपैकी सुमारे १ हजार २५० गावांमध्ये विकासकामे झालेली आहेत.
 
 
प्रश्न : मतदार संघातली कोणती कामे करण्यास प्राधान्य दिले ?
उत्तर : रावेर लोकसभा मतदारसंघात भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन आहे. या विभागात आरओबीची सावदा, निंभोरा आणि रावेर येथे मागणी सुमारे ४० वर्षांपासून होत होती. ती कामे मंजूर झाली असून १०० कोटींची टेंडर प्रोसेस सुरू आहे. भुसावळातील आराधना कॉलनी, दुसखेडा, फेकरी, झेडटीएस, मलकापूर, नांदूर येथील गेट किंवा वाहतुकीसाठी अंडर ब्रीजच्या मागणींचा यशस्वी पाठपुरावा केला. या महिन्याअखेर भुसावळ रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मतदारसंघातील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेसाठी तसेच रेल्वेस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकांवर बाकडे बसविण्यात आले. रेल्वे मार्गाचे विस्तारिकरण (चौथी लाईन ) झाल्यानंतर पुणे-भुसावळ व्हाया नंदुरबार गाडी सुरू करण्यासाठी प्रस्ताव असणार आहे. राजधानी एक्स्प्रेसचाही प्रस्ताव आहे.
 
 
प्रश्न : बेरोजगारीची समस्या वाढत आहे, ही समस्या निकाली काढण्यासाठी आपण कोणता पाठपुरावा केंद्र शासनाकडे केला आहे?
उत्तर : बेरोजगारी दूर करण्यासाठी रेल्वेचे डबे दुरुस्ती करण्याचा सुमारे ४०० कोटी रुपयांचा कारखाना भुसावळ येथे सुरू करण्याच्या दृष्टिने यशस्वी पाठपुरावा केला आहे. यातून स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे तसेच भुसावळ व वरणगाव येथील आयुध निर्माणी प्रकल्पांचे विस्तारिकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भुसावळ आयुध निर्माणीचे विस्तारिकरण झाले असून पिनाका पॉडचे काम सुरू आहे. आयुध निर्माणीच्या विस्तारिकरणाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
 
प्रश्न : रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट वर्‍हाड भागातील मलकापूर तालुक्यात कोणती विकासकामे करण्यात आली?
उत्तर : मलकापूर तालुक्यात डीपीडीसीच्या माध्यमातून निधी मंजूर केला आहे. तेथील आमदारांशी चर्चा करून विकासकामे करण्यात आली आहेत. तालुक्यातील गावांच्या अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, हायमास्ट आदी कामे केली. विकासकामे करताना अधिकाधिक जनहिताच्याच कामांना प्राधान्य आहे.
 
प्रश्न : लोकसभा अधिवेशनाच्या माध्यमातून कोणत्या समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला ?
उत्तर : खासदार हा देशाचा कारभार चालविण्यासाठी आपण निवडून दिलेला एक सेवक असतो. लोकसभेत स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रात प्रभावी ठरतील, अनेक राज्यांच्या हिताचे ठरतील, असेच प्रश्न मांडले जातात अन् पाठपुरावा केला जातो.
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न लोकसभेत मांडला. काही महिन्यांत मला पत्र आले आणि हा विषय कॅबिनेटच्या बैठकीत ठेवण्यात आला. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना स्मार्ट-फोन देण्याची व्यवस्था केंद्र सरकार करत असल्याचे सरकारने जाहीर केले. सप्टेंबर महिन्यात अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्याचे जाहीर केले. रेल्वेमध्ये ऍप्रेंडिस केलेल्या विद्यार्थ्यांची समस्या बिकट होती. याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला. रेल्वे भरतीमध्ये २० टक्के आरक्षण त्यांच्यासाठी देण्यात आले आहे. देशातील ४ लाख विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रलंबित होते. याकडे अधिवेशनात लक्ष वेधले आणि हा प्रश्न मार्गी लावण्यात आला.
 
प्रश्न : सिंचनाची समस्या उग्र रूप घेत आहे. यावर आपण केंद्राकडे काही पाठपुरावा केला आहे का ?
उत्तर : खासगी ट्यूबवेलची संख्या प्रत्येक दिवशी वाढत आहे. सरकारकडे खासगी ट्यूबवेलचे रेकॉर्ड नाही. खासगी ट्यूबवेलचे रेकॉर्ड सरकारकडे असावे, असा प्रस्ताव मांडला आहे. सिंचनाच्या दृष्टिने हे महत्त्वाचे ठरू शकणार आहे, तसे आदेश शासन काढणार आहे. मेगा रिचार्ज प्रकल्प खान्देशसाठी वरदान ठरणार आहे. नाथाभाऊ, ना. गिरीश महाजन, आ. हरिभाऊ जावळे तसेच सर्वच लोकप्रतिनिधींचे यात योगदान आहे. उमा भारती या मंत्री असताना त्यांनी डीपीआरसाठी मंजुरी दिली. ना. नितीन गडकरी यांनीसुद्धा परवानगी दिली. देशातील सर्वात मोठा आणि पहिला हा प्रकल्प असेल. ५ लाख हेक्टर जमिनीस याचा लाभ होणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे मेगा रिचार्ज प्रकल्पास वेळ लागत आहे.
 
प्रश्न : महिला खासदार असल्याने महिलांच्या आपणाकडून अनेक अपेक्षा आहेत, त्यांची पूर्तता कशी कराल ?
उत्तर : रावेर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मला मिळाला. महिलांच्या समस्यांची मला जाण आहे. पोस्टामध्ये आरडी एजंट या बहुतांश महिलाच आहेत. सरकारने त्यांचे कमिशन बंद केले होते. याबाबत मी प्रश्न उपस्थित करून सोडविला. या महिलांचा संपर्क अनेक घरांशी असल्याने सरकारच्या योजना महिलांच्या माध्यमातून राबविल्यास त्या घरोघरी पोहोचतील, असा प्रस्ताव दिला आहे.
 
प्रश्न : लोकसभा आणि जनसंपर्क यासाठी वेळेचे नियोजन शक्य होते का?
उत्तर : लोकसभेत देशाचा कारभार चालविण्यासाठी आपण खासदार निवडून देतो. लोकसभेत कामांचा पाठपुरावा करताना जनसंपर्क ठेवायचा असतो. नाथाभाऊंनी अनेक विकासकामे केली आहेत. त्यांची नाळ लोकांशी जोडलेली आहे. जी अपेक्षा लोकांची नाथाभाऊंकडून आहे, तीच अपेक्षा माझ्याकडूनही आहे. माझ्या मागे खडसे नाव असल्याची जाणीव ठेवून पावले उचलावी लागतात. लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत काम करू शकत नाही. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सातत्याने कामे करीत असते. मतदारसंघातील प्रत्येक गावातील सरपंच माझ्याशी निगडित आहे. त्यंाच्या गावातील विकासकामांना प्राधान्य असते.
 
प्रश्न : जिल्ह्यातील कोणते प्रश्न प्रामुख्याने प्रलंिंबत आहेत ?
उत्तर : जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदारसंघात सरकारी कामगारांची संख्या अधिक आहे. पी.एफ.कार्यालय नाशिकला असल्याने सरकारी कर्मचार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पी.एफ.चे कार्यालय भुसावळ किंवा जळगावला सुरू करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा केला असून सहा महिन्यात हे कार्यालय येथे सुरू होणार आहे. जळगाव येथून विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘उडाण’ योजनेत रिटेंडर होत आहे. यात शासन अनुदान देणार आहे. जळगाव-पुणे विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न आहेत. मतदारसंघात महामार्गाची कामे जोरात सुरू आहेत. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाचा सर्व्हे अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरण आणि दुहेरीकरण केले जात आहे. जिल्ह्यात नवीन प्रकल्प आणि कंपन्या येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
प्रश्न : केळीला फळाचा दर्जा कधी मिळणार ?
उत्तर : केळी या पिकाची फळ म्हणूनच गणना होते. हवामान आधारित पीक विमा ४६ अंशला घेतला जात होता, तो आता ४२ अंशांवर घेतला जातो. शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर प्रतिवर्ष ६ हजार रुपये भरायचे असतात, उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार भरत असते. अन्य फळांची लागवड आणि केळीची लागवड यामध्ये फरक आहे. जिल्ह्याची ओळख केळी उत्पादक जिल्हा असल्याने रेल्वेस्थानकावर चांगल्या गुणवत्तेची केळी विकली जावी, तसेच केळी रेल्वे वॅगनद्वारे पाठविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा
केला.
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121