असामान्य नेतृत्व: छत्रपती शिवाजी महाराज हे एक असामान्य नेतृत्वाचे धनी होते. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासूनच त्यांनी आपल्या मित्रांमध्ये पेटवलेली स्वराज्याची मशाल असो, किंवा पहिल्यांदा जिंकलेल्या तोरणा गडाची लढाई असो, लहानपणापासूनच त्यांच्या नेतृत्व क्षमतेची प्रचीती आपल्या सर्वांना येते. चहुबाजूंनी मोगलाई, आदिलशाही, निजामशाही,कुतुबशाही असून देखील त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. अत्यंत प्रतिकुलतेच्या काळात स्वत:चे राज्य बनवण्यासाठी अत्यंत असामान्य नेतृत्व हवे असते. ते शिवाजी महाराजांच्या अंगी स्थायी होते, अगदी लहानपणापासूनच.
स्वभाषेची जोपासना: अनेक वर्षांपासून परकियांच्या शासनाखाली असल्यामुळे संपूर्ण भारत भरात अरबी, फारसी आणि तुर्की भाषेचा वापर शासकीय कामांसाठी होऊ लागला होता. अश्यावेळी होत असलेला स्वभाषेचा ऱ्हास शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दूर केला. त्यासाठी त्यांनी 'राज्य व्यवहार कोष' नामक ग्रंथ तयार करून राज्य व्यवहारासाठी मराठी तसेच संस्कृत शब्दांचा उपयोग राज्यकारभारात अंमलात आणला.
धर्माधारित राजकारण: येथे धर्माचा अर्थ राजधर्मासोबत आहे. छत्रपतींनी मुघलकाळात लुप्त झालेल्या हिंदुत्व आधारित राजधर्माच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवला. एका आदर्श राजा प्रमाणे त्यांनी राज्यकारभार करत रयतेवर पित्या प्रमाणे माया केली, प्रजेचे वेळोवेळी रक्षण केले, लोककल्याणकारी योजना राबवल्या, स्वराज्यात कोणावर अन्याय होऊ नये याची दक्षता घेतली, शेतकरी, कामगार यांच्यासाठी कामे केली. एका उपभोग शून्य राजकारणाचा आदर्श त्यांनी घालून दिला.
विकासात सर्वांचा सहभाग: शिवाजी महाराजांनी आपल्या समोर विकासाचे अनोखे मॉडेल उभे केले आहे. स्वराज्यच्या विकासात केवळ उच्चभ्रूंचा सहभाग न ठेवता, शेतकरी,कष्टकरी, दलित, शोषित वर्गाने देखील पुढे यावे अश्याच योजना राबवल्या होत्या. प्रताप गडावरील भवानी मातेची मूर्ती स्थापनेच्या वेळी महाराजांनी सर्व भेदाभेद झुगारून दलित वर्गाला पालखीचा मान दिला होता, आणि मूर्ती त्यांच्याच हस्ते बनवून रोजगाराची सुविधा उपलब्ध करून दिली होती. राष्ट्रीय संपत्तीचे समान वितरण, दुर्बलांचे सबलीकरण यांची जणू ब्लू प्रिंटच महाराजांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे.
भ्रष्टाचारावर आघात: महाराजांचे सावत्र मामा सुप्याचे संभाजी मोहिते पाटील यांनी रयतेचे काम करून देण्यासाठी लाच घेतल्याचे माहिती पडताच, स्वत: महाराजांनी जातीने जाऊन त्यांना अटक केली होती. केवळ आपला नातेवाईक आहे म्हणून हयगय न करता, जनतेच्या हिताविरोधात गेला म्हणून त्यास शिक्षा व्हावीच. आणि स्वराज्य नेहमी भ्रष्टाचारमुक्त राहील याची काळजी घेतली. त्यावेळी आपली सावत्र आई तुकाबाई यांना काय वाटेल? असा विचार त्यांनी केला नाही.
अर्थनीती: शिवाजी महाराजांनी त्याकाळी अवलंबलेली अर्थनीती अनेक अंगाने जनतेच्या हिताची होती. आदिलशाहीच्या शोषित कारभाराने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा शेतसारा हा त्यांच्या धान्य उत्पादनाच्या टक्केवारीवर घेण्याची पद्धती शिवाजी महाराजांनी सुरु केली. त्यामुळे शेतकऱ्यावरचा भार हलका झाला होता. त्याच बरोबर जहागीरदारी पद्धती नष्ट करून पगारी कर्मचारी निवडण्याची त्याकाळातील नवीन पद्धत महाराजांनी सुरु केली होती. तसेच राजकोषातून कामगारांना मदत दिली जात असत ती, पैश्याच्या स्वरुपात नसून, अवजारे, बैल जोडी, इत्यादी अश्या आवश्यक वस्तूंच्या स्वरूपात होती.
सैन्यबळ: महाराजांचे सैन्यबळ अत्यंत खमके होते, त्यांच्या सैन्यात तानाजी,सूर्याजी, नेताजी पालकर, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे धुरंधर सेनानी होते. अत्यंत कमी सैन्यानिशी मोठ्यात मोठ्या शत्रूचा पराभव करणारी युद्धनीती सैन्याजवळ असल्यामुळेच स्वराज्य विस्तार झाला. तसेच नौदल आरमार उभारणारे ते भारतातले त्याकाळचे एकमेव हिंदू राजे होते. पायदळ, घोडदळ आणि नौदल या व्यवस्थेने सुसज्ज सैन्य उभारण्यात महाराज यशस्वी ठरले होते.
न्यायव्यवस्था: न्यायव्यवस्थेत देखील शिवाजी महाराजांचा आदर्श आजही घेतला जातो. रांझे गावच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेचे उदाहरण आपल्याला माहितच आहे. बलात्काऱ्याला अत्यंत कठोर कायदा, तसेच देश द्रोही खंडोजी खोपाड्याला सुनावलेली सजा, हि सर्व उदाहरणे आपल्याला माहितच आहेत, तसेच दरोडेखोर, डाकू यांना देखील स्वराज्याच्या कायद्यात कठोर तरतुदी होत्या.
अष्टप्रधान मंडळ: राज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धत स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धत अस्तित्वात आणली होती. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान (पेशवा), पंत अमात्य (मजुमदार), पंत सचिव (सुरनिस), मंत्री (वाकनीस), सेनापती (सरनौबत), पंत सुमंत (डबीर), न्यायाधीश (काझी-उल-ऊझत), पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव), असे विविध मंत्रीपदे कार्यरत होती.
दूरदृष्टी: शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने केलेला राज्यकारभाराचा उपयोग महाराष्ट्राला तेव्हा झाला, जेव्हा हिंदवी स्वराज्याला कोणतेही नेतृत्व उरले नव्हते. सामान्य जनता आपल्या ताकतीवर मुघलसैन्याशी लढत होती, राजधानी नसताना, नेतृत्व नसताना देखील मुघलांना स्वराज्य काबीज करता आले नव्हते. कारण स्वराज्याची नाळ महाराजांनी सामान्य जनतेशी जोडली होती, आणि त्याला अनुसरूनच राज्यकारभारावर भर दिला होती. ही छत्रपतींची दूरदृष्टीच त्यावेळी स्वराज्यासाठी संजीवनी ठरली होती.