नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्काराच्या यादीत गुजरातच्या एका शेतकऱ्याचे नाव देखील सामील झाले आहे. गेनाभाई पटेल हे नाव आपल्या सर्वांना कदाचित परिचित नसेल, परंतु उत्तर गुजरात येथे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ही व्यक्ती आपण सर्वांनी देखील जाणून घेतलीच पाहिजे. इच्छा तेथे मार्ग हे वाक्य अक्षरश: खरे ठरवणारी व्यक्ती आहेत गेनाभाई.
५२ वर्ष वय असलेले गेनाभाई पटेल दिव्यांग आहेत. गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत. वडिलोपार्जित मिळालेल्या १० एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत असताना बनासकांठा जिल्ह्यात २००४ साली झालेल्या कृषी मेळाव्यातून प्रेरित होऊन गेनाभाई यांनी आधुनिक पद्धतीने शेती करायला प्रारंभ केला.
२००४ साली डाळिंबाची लागवड केली. दिव्यांग असल्यामुळे प्रत्येक रोपावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी शेतात CCTV कॅमेऱ्याचा वापर सुरु केला. डाळिंबाची लागवड अश्या पद्धतीने केली की ते त्यांच्या तीनचाकी सायकलीने प्रत्येक रोपापर्यंत पोहोचू शकतील. आणि प्रत्येक पिकाला ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाणी पुरवठा होऊ लागला. या आधुनिक शेतीमुळे गेनाभाईंना पहिल्या वर्षी ४ लाख रुपयांचा नफा मिळाला. बनासकांठा जिल्ह्यात जेथे डाळिंब उत्पादनावर ६० हजारापेक्षा अधिक नफा मिळत नव्हता तेथे गेनाभाईंनी ४ लाख नफा मिळवून दाखवला. दुसऱ्या वर्षी १५ एकर शेतीत हाच प्रयोग करून ८ ते १० लाखाच्या घरात नफा मिळवणारे गेनाभाई उत्तर गुजरात मधील स्थानिक शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान झाले आहेत. त्यामुळे आजमितीस तेथील शेती करण्याची पद्धत बदलून गेली आहे.
जेव्हा त्यांनी या सर्व प्रयोगाची सुरुवात केली तेव्हा अत्यंत नाजूक परिस्थितीतून ते जात असल्यामुळे सायकल घ्यायला देखील पैसे नसलेले गेनाभाई आज उत्तम कारमध्ये वावर करतात. त्यांनी केलेल्या या शेतीच्या प्रयोगावर ४ हजार शेतकरी आज उत्तमरीतीने शेती करून, भरघोस उत्पन्न मिळवीत आहेत. गेनाभाई सध्या डाळिंब उत्पादनावर २५ लाख रुपये वर्षा अखेर कमावतात.
आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
गेनाभाईंना आपल्या या कार्याबद्दल गुजरात तसेच देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून १७ पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात ४ राष्ट्रीय पुरस्कार आहेत, त्याचबरोबर डाळिंब उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १ लाखाचा पारितोषिक देखील दिला होता. आणि गेल्या आठवड्यातच गेनाभाईंना राष्ट्रीय मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्रासारख्या राज्यात जेथे शेतकरी कर्जापोटी आत्महत्येस प्रवृत्त होतात अश्या ठिकाणी या दिव्यांग शेतकऱ्याची गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी आहे. एक दिव्यांग माणूस आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर, स्वत:सहित इतरांचे आयुष्य बदलू शकतो तर शरीराने धष्ट-पुष्ट शेतकरी देखील नक्कीच महाराष्ट्रासह संपूर्ण जगासाठी आदर्श बनू शकतात असे मला वाटते. या सर्वावर बहिणाबाई चौधरी म्हणतात की....
'खोपा विणला विणला, जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारीगिरी, जरा देख रे माणसा
तिची इलुशीच चोचं, तेच दातं तेच ओठं
तुला दिले रे देवाने दोन हात दहा बोटं'
- हर्षल कंसारा