फिल्म इंडस्ट्री आणि सबव्हर्जन

    12-Oct-2016
Total Views |

राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट या भारतीयांच्या तीन आवडत्या गोष्टी आहेत. त्यात चित्रपट थोडे अधिकच. समाजात जे काही घडत आहे त्याचं प्रतिबिंब चित्रपटातून दिसतं असा एक समज काही वर्षांपासून मान्य केला गेलाय. अर्थातच तो पसरवण्यात चित्रपट सृष्टीतल्या लोकांचाच महत्वाचा वाटा आहे. आम्ही जे दाखवतो, तेच आजूबाजूला घडत आहे असा त्यांचा दावा असतो. आपली चित्रपटप्रेमी जनता देखील हा दावा मान्य करून टाकते. पण बऱ्याचदा परिस्थिती उलट असते. जे चित्रपट निर्मात्यांना किंवा त्यांच्या मागे षड्यंत्र करणार्यांना हवं असतं, तेच दाखवलं जातं.

चित्रत्रपटांचा  लोकांवरचा प्रभाव लक्षात घेतला तर सबव्हर्जन ह्या ब्रेन वॉशिंगच्या प्रकारात त्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो ह्याचा शोध सबव्हर्जनची टेक्निक विकसित करणाऱ्यांच्या लक्षात नक्की आला आहे. म्हणूनच चित्रपटांचा वापर आपल्याला हवं ते मत जनतेवर लादण्यासाठी फार सोप्या पद्धतीने केला जातो. डावी विचारसरणी लोकांच्या मनावर आणि बुद्धीवर बिंबवायचा शक्य तितका प्रयत्न चित्रपटातून होत असतो.

एखादा नायक, त्यावर एखाद्या कारखानदाराकडून झालेला अत्याचार, लुळीपांगळी श्रीमंती, धडधाकट गरिबी,  कामगारांवर होणार अन्याय, एकंदरीतच प्रगती आणि डेव्हलपमेंट ह्याविरुद्ध लढा, कॅपिटलिझमला विरोध हि कॉमन थीम अनेक चित्रपटांमध्ये आढळते. अगदी 'नया दौर' पासून ते 'दिवार' 'कुली', 'मर्द' पर्यंत.  नया दौर हा अगदी जुना जमाना. तिथपासून तर अगदी ८०च्या दशकापर्यंत कथानकात बदल करून हीच थीम कॉमन ठेवली गेली. इंटेरेस्टिंगली ह्याच काळात कम्युनिस्टांच्या रशियाचा प्रभाव भारतीय राजकारणावर होता आणि थोडा विचार केला तर ही लिंक लगेच लावता येईल.

ट्रेड युनियन्स हा सबव्हर्जनमधला दुसरा महत्वाचा दुवा. आणि ट्रेड युनियन्स हे कम्युनिस्टांचे मोठे हत्यार. समाजात सतत अस्थिरता राहील ह्यासाठी युनियन लिडर्सना हाताशी धरून ट्रेड युनियन्स ह्या कल्चरला मोठं केलं गेलं. अनेक चित्रपटांनी ट्रेड युनियन्सना प्रोत्साहन दिलं. युनियन लिडर्स हे अल्टीमेट हिरो झाले आणि अशांतता माजवणे हे हिरोईझम केलं गेलं. वास्तविक भारतातल्या सर्व मोठ्या कारखान्यांमध्ये अगदीच तशीच परिस्थिती नव्हती. टाटांच्या जमशेदपुरच्या कारखान्यातला जॉर्ज फर्नांडीसांचा संप अयशस्वी झाला होता. टाटांच्या चांगल्या कार्यसंस्कृतीचा हा विजय होता, मात्र चित्रपटांनी ते दाखवलं नाही. त्यांनी कायम संघर्षच दाखवला.

१९९० नंतर मुक्त अर्थव्यवस्था आल्यावर हि थीम फारशी प्रभावी राहिली नाही. पण विषय बदलले. ऑफबीट ह्या नावाखाली ज्या गोष्टी भारतात फारश्या अस्तित्वात नाहीत त्या दाखवल्या गेल्या आणि तथाकथित बुद्धिवाद्यानी त्या डोक्यावर घेतल्या. समलिंगी संबंधावरचे फायर, १९४७ सारख्या चित्रपटांची क्रिटीक्सनी वाहवा केली. पिके सारखा चित्रपट अगदी ठरवून एकांगी टीका करण्यासाठी बनवला गेला. सर्वसामान्य प्रेक्षक त्याच्याही मांडणीने फसला गेला. सध्याच्या काळातले मराठी चित्रपट त्याच वळणावरचे निघाले. फँड्री, टाईमपास, सैराट ह्या चित्रपटाच्या रिलीजच्या आधी आणि नंतर ज्या जातीयवादी चर्चा झाल्या त्यांनी चित्रपटांचा हेतू साध्य केला.

समाजात अस्थैर्य पैदा करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं काम फिल्म इंडस्ट्री फार उत्साहाने करत असते. काळा पैसा, अंडरवर्ल्डशी संबंध, बॉम्बस्फोटात होणाऱ्या शिक्षा, अभिनेत्यांवर सिद्ध न झालेल्या सदोष मनुष्य वधाच्या केसेस, अवैध बांधकामं, नशेखोरी, ड्रग्सच्या रॅकेटमध्ये अडकलेली नावं, राजकीय आयुष्यात भ्रष्टाचारात गोवलं गेलेलं नाव इत्यादी इत्यादी अनेक काळी कृत्य असून देखील चित्रपट सृष्टी आणि अभिनेते व अभिनेत्या लोकांच्या गळ्यातले ताईत आहेत यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

केंद्रात सरकार बदल झाल्यावर कम्युनिस्टांच्या जे एन यू मध्ये पोटशूळ उठला. त्या पोटदुखीची रड FTII च्या विद्यार्थ्यांनीसुद्धा गायली. विद्यार्थी चळवळ ह्या नावाखाली त्यांनी संस्थेच्या सरकार निर्वाचित अध्यक्षाला विरोध केला. ज्या संस्थेची मूळं कम्युनिस्ट आहेत त्यांच्या कलाकृती कोणत्या वळणाने जाणार आहेत हे सांगायला कोणत्याही एक्सपर्टची गरज नाही. मागच्या वर्षी निवडणुकांच्या मौसमाच्या आधी अमीर खान पासून सर्वांनी गळे काढले होते, आताही पाकिस्तानी कलाकारांच्या प्रेमात कढ आणून ह्यावेळीही बॉलिवूडने आपली नियत दाखवली आहे. सुदैवाने त्यांना ह्यावेळी लोकांनी पाठिंबा दिला नाहीये.

एकंदरीतच चित्रपटाचं स्थान हे पानातल्या लोणाच्याइतकंच असायला हवं. चवीपुरतंच ठीक, अति झालं तर अल्सर व्हायचा!!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121