स्वप्नपूर्तीचा क्षण...

    21-Jan-2024
Total Views | 147
Devendra Fadnavis
 
मला आजही त्या तिन्ही कारसेवा अगदी स्पष्टपणे आठवतात. (‘कारसेवा’ हाच शब्द प्रचलित झाल्याने तोच वापरतोय. प्रत्यक्षात ती होती ‘करसेवा.’ पवित्र कार्याला आपले हात लागणे, हा त्याचा अर्थ). पहिली कारसेवा दि. 30 ऑक्टोबर, 1990ची, दुसरी दि. 6 डिसेंबर, 1992ची आणि तिसरी 2002ची. मी खरं तर स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो की, या तिन्ही कारसेवांमध्ये मला प्रत्यक्ष योगदान देता आले. आजही या कारसेवेदरम्यानच्या प्रत्येक आठवणी डोळ्यासमोर सहज तरळून जातात आणि सर्वांगावर रोमांच उभे राहतात. मी वयाच्या 18व्या वर्षापासूनच रामशिलापूजनाच्या निमित्ताने या चळवळीशी कायमचा जोडला गेलो. त्यावेळी खंड, उपखंड आणि प्रखंड अशी रचना विश्व हिंदू परिषदेच्यावतीने केली गेली. त्यात एका खंडाच्या प्रमुखपदाची जबाबदारीदेखील माझ्याकडे होती.
 
 
पहिली कारसेवा
दि. 30 ऑक्टोबर 1990 रोजी पहिली कारसेवा झाली. त्यावेळी माझे वयवर्षे होते 20. तेव्हा मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करायचो. अयोध्येला जाण्याचा मार्ग म्हणजे व्हाया अलाहाबाद अर्थात आजचे प्रयागराज. आम्ही रेल्वेने अलाहाबादला पोहोचलो. तेथे देवराह बाबा आश्रमात गेलो. तेथे आमचे काही अधिकारी उपस्थित होते. तिथून पुढे जाण्याची व्यवस्था नसल्याने सत्याग्रह करून अटक करवून घ्यायची, असे त्यांनी सांगितले.
 
पण, काहीही झाले तरी पुढे जायचेच, असा दृढ निश्चय आम्ही केला होता. मग त्रिवेणी संगमानजीकच्या सीताराम मंदिरात मुक्कामाची आम्ही जागा शोधली. पाच ते सहा दिवस तेथेच तळ ठोकला. यादरम्यान दररोज साधूसंतांचे आशीर्वचन आणि मार्गदर्शन आम्हाला लाभले. मंदिरातील पुजार्‍यांनी बनवलेली दालखिचडी हेच आमचे नियमित भोजन. याच मंदिराच्या गच्चीवर आम्ही झोपायचो. पण, ते दिवस अगदी कडाक्याच्या थंडीचे असल्याने शरीर पूर्णपणे आखडून जायचे. शेवटी पुजार्‍यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी आत मंदिरात आम्हाला थोडी जागा दिली. सकाळी त्रिवेणी संगमावर स्नान आणि नंतर दिवसभर जनजागरण असा आमचा दिनक्रम असे.
 
‘अयोध्या में परिंदा भी पर नही मार सकता’ अशी दर्पोक्ती उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी केली होती. सगळीकडे अगदी कडेकोट बंदोबस्त तैनात होता. पण, अलाहाबादमधील वास्तव्यानंतर अखेरीस तो मुहूर्त ठरला. शंकराचार्यांच्या नेतृत्त्वात अयोध्येकडे कूच करायचे, असे ठरले. सुमारे 30 किमी अंतर पायी चालल्यानंतर, एका मोठ्या पुलावर आम्हाला अडविण्यात आले. पुलाच्या प्रारंभी आणि शेवटी पोलिसांचा फौजफोटा आणि पुलाच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी. काहींनी तर चक्क पुलावरुन पाण्यात उड्या घेतल्या आणि पोहून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात काही कारसेवकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले.
 
पोलिसांकडून केवळ लाठीमारच नव्हे, तर गोळीबारही करण्यात आला. आयुष्यात हे सारेकाही मी प्रथमत:च अनुभवत होतो. निधड्या छातीने कारसेवक बंदुकीच्या गोळ्या चुकवत रस्त्यावरच ठाण मांडून बसले होते. बराच काळ संघर्ष झाल्यानंतर, अखेर पोलिसांनी वाहने आणली आणि अटकसत्र आरंभले. आम्हालाही यावेळी पोलिसांकडून अटक करण्यात आली. येथून 500 किमी अंतरावर असलेल्या बदायू येथील कारागृहात आम्हाला डांबले गेले.
 
माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार हेही त्यावेळी आमच्यासोबत कारागृहात होते. थोडाथोडका नव्हे, तर 14-15 दिवस आम्हाला या कारागृहात तुरुंगवास झाला. मला आजही आठवतं की, उत्तर प्रदेशातील एक आछूबाबू आमच्यासोबत कारागृहात होते. ते अतिशय प्रभावी भाषणं करायचे. त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा दुपारच्या सत्रात प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन भाषणं करून राम मंदिराविषयी जनजागृती करायचो. यानिमित्ताने प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन संवाद साधता यायचा. गुजरातचेही काही लोक त्यावेळी आमच्यासोबत होते. मला अजूनही त्यांच्या घोषणा आठवतात. ते म्हणायचे...
 
हिंदू रक्त ना टिपे टिपे, मंदिर बने ईटे ईटे...
स्वावलंबनासोबत जगण्याचा आनंदच काही निराळा असतो, तो त्यावेळी प्रकर्षाने आम्ही अनुभवला. सकाळी शाखा लावायची आणि त्यानंतर मग हनुमान चालीसाचे पठण. स्वत:चे कपडे स्वत: धुवायचे, स्वत:चे अन्न स्वत:च शिजवायचे आणि नंतर संघटनेच्या कामासाठी वेळ द्यायचा, असा एकूणच दिनक्रम. मला अजूनही आठवते की, आमच्या एका सहकार्याने स्वत:चे कपडे स्वत: धुण्याची वेळ येऊ नये, म्हणून एका कैद्याला पाच रुपये देऊन कपडे धुण्यासाठी आणले. तेव्हा मी त्याला दहा रुपये दिले आणि परत पाठविले. आमच्या सुदैवाने कारागृह अधीक्षकाची दोन्ही मुलं कारसेवक होती. त्यामुळे जेलरकडून आम्हाला फार काही त्रास झाला नाही. बाहेर संचारबंदी असली की वातावरणही तंग असायचे. पण, एकदा का संचारबंदी उठली की चांगले जेवण मिळायचे.
 
कारागृहातील ते 14-15 दिवस अजूनही स्मरणात आहेत. आजही त्यावेळेचा प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग डोळ्यापुढे स्पष्टपणे तरळतो. याच कारागृहातून मी आईला माझ्या खुशालीचे एक पत्रदेखील पाठविले होते. कारण, त्याकाळी दुसरी कोणती संवादयंत्रणा अस्तित्त्वात नव्हती. अर्थात, ते पत्र मी नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर दुसर्‍या दिवशी पोहोचले. पण, मला सार्थ अभिमान आहे की, आईने मला कायमच प्रेरणा दिली. ‘तुम्ही देशासाठी काहीतरी करता आहात ना, तर खुशाल करा,’ असेच ती सदैव सांगायची आणि आजही सांगते. याच बदायूच्या कारागृहातून मग आम्हाला लखनौला नेण्यात आले आणि तेथून रेल्वेने मग नागपूरचा परतीचा प्रवास. चळवळीच्या उपयोगी तर मी आलोच, पण, अयोध्येच्या भूमीवर पाय ठेवू शकलो नाही, याची खंत आणि रूखरूख मनाला लागून होती.
 
दुसरी कारसेवा
पण, ही खंत फार काळ बाळगावी लागली नाही. कारण, दोनच वर्षांनी दुसर्‍या कारसेवेची घोषणा झाली. दि. 6 डिसेंबर, 1992चा दिवस ठरला. दि. 30 नोव्हेंबरला आम्ही 250 कारसेवकांचा जत्था घेऊन अयोध्येकडे रवाना झालो. 1 डिसेंबरला अलाहाबादला पोहोचलो. विलास फडणवीस, रवीजी जोशी हे त्यावेळी अलाहाबादेत महाराष्ट्रातून येणार्‍यांच्या व्यवस्थेत होते. तिथे आम्ही एक दिवस मुक्कामही केला. त्रिवेणी संगमावर स्नान केले आणि आता मंदिरासाठी बलिदान द्यावे लागले तरी द्यायचे, असा संकल्प आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सोडला. दुसर्‍या दिवशी सकाळीच अयोध्येकडे कूच केली आणि अयोध्येत दाखल झालोसुद्धा.
 
आमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे कुणी नातलग पुजारी असल्याने तेथील काळाराम मंदिरात आमचा मुक्काम होता. दि. 2 ते 6 डिसेंबर असा पूर्ण मुक्कामाचा कालावधी. त्याकाळी अयोध्येत सहाआसनी ऑटो असायचे. त्या ऑटोंमधून फिरायचे आणि संपूर्ण अयोध्येची परिक्रमा करीत ‘मंदिर वही बनाऐंगे’चे नारे देत जनजागृती करायची, हा दिवसभराचा क्रम. त्या काळात नवनवीन नारे तयार करणे आणि ते लोकांमध्ये जाऊन लोकप्रिय करणे, हाही क्रम राहत असे. ‘जागो जागो तो हिंदू जागो तो...’ हे सांघिक गीत आम्ही गायचो आणि ते तेव्हा फार लोकप्रियही झाले होते. त्या संपूर्ण कालावधीत सुमारे 50 हजारांच्या आसपास कारसेवक या काळात अयोध्येत असतील. पाहता पाहता ही कारसेवकांची संख्या लाखांवर गेली.
 
आमचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीजी, उमा भारतीजी, आचार्य धर्मेंद्रजी, महंत नृत्यगोपाल दास, साध्वी शिवा सरस्वती, साध्वी ऋतंभरादेवी अशा सर्व नेत्यांचीही उपस्थिती होती. वेळोवेळी आम्हाला त्या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. एकूणच हा संपूर्ण काळ एक अनोख्या ऊर्जेने भारलेला होता आणि आज राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने त्या कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न साकार होते आहे.
 
5 डिसेंबरला रात्री एक बैठक झाली आणि त्यात दुसर्‍या दिवशी सर्वांनी एकत्र येण्याचे ठरले. तणाव प्रचंड आणि पराकोटीचा होता. 6 तारखेला सकाळी सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत विविध नेत्यांची भाषणं सुरू असतानाच अचानक एक जत्था एका घुमटावर चढला आणि पाहता-पाहता पहिला, दुसरा घुमट ध्वस्त झाला. तिसरा घुमट काही केल्या पडेना. अखेर सायंकाळच्या सुमारास तोही ध्वस्त झाला आणि लगेच मंदिरनिर्माणाच्या कार्याने गती घेतली. लाखो लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. लोक थकले होते, पण, रात्रभर श्रम करीत तात्पुरत्या मंदिराची निर्मिती साकारली होती.
 
रामाचे केवळ नामस्मरण नवऊर्जा प्रदान करीत होती. मनात कोणतेही भय नव्हते. कारसेवकांनी दिलेली सेवा, बलिदान अतुलनीय होते. पोलीस जरी खाकी गणवेशात असले तरी त्यांचीही भक्कम साथ होती. पोेलीस दिसले की आम्ही नारे द्यायचो, ‘कौन करे मंदिर निर्माण-पोलीस, पीएसी और जवान’. मग तेही आनंदी होत. अशाप्रकारे हिंदू संस्कृतीवरील गुलामीचे एक प्रतीक कायमचे संपले होते. तेथूनच मग आम्ही नागपूरला परतलो. मार्गात रेल्वेवर हल्ले, दगडफेकीचेही प्रसंग उद्भवले. त्यामुळे अडीच दिवसांनी नागपुरात पोहोचलो. 15व्या शतकापासूनचा लढा अंतिम टप्प्यात आला होता. आता प्रतीक्षा होती, ती केवळ भव्य राममंदिराची...
 
वयाच्या 20व्या वर्षी पहिली आणि 22व्या वर्षी दुसरी कारसेवा ते आज वयाच्या 53व्या वर्षी भव्य राम मंदिराचे स्वप्न साकार होताना पाहणे, हे एक अनोखे समाधान आहे. अयोध्येचे आंदोलन हे केवळ हिंदू संघटनशक्तीसाठी नाही, केवळ ईश्वरभक्तीसाठी नाही, तर राष्ट्रीय अस्मितेसाठी होते. ज्या देशाच्या आदर्शाचे त्यांच्याच जन्मस्थानी मंदिर उभे राहू शकत नाही, ते आपले दौर्बल्य दाखविणारेच होते. म्हणूनच हा केवळ भारतीय जनता पार्टीचा राजकीय अजेंडा आपण तेव्हाही मानत नव्हतो आणि आज तर नाहीच नाही. हा संत आणि समाजाचा लढा होता. या लढ्याला साथ देण्यासाठी इतरही पक्षांना पुढाकार घेता आला असता. पण, भारतीय जनता पार्टीने नुसता सर्वांनाच पाठिंबा दिला नाही, तर स्वत:ला या लढ्यात पूर्णत: झोकून दिले.
 
राष्ट्रीय अस्मितेसाठी झालेल्या या आंदोलनाची म्हणूनच इतिहास कायम नोंद घेईल आणि हा अध्याय सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. आज या आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अधिष्ठान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाचा हा कळसाध्याय म्हणावा लागेल. सोमवार, दि. 22 जानेवारी रोजी भव्य राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा होऊन हे मंदिर रामभक्तांसाठी खुले होणार आहे. यानिमित्ताने ‘रामलला हम आये हैं, मंदिर भव्य बनाएंगे...’ हेच नारे या पावन क्षणी आज पुन्हा मुखावर रुंजी घालत आहेत.
 ॥ जय श्रीराम ॥
 
 
देवेंद्र फडणवीस
एक कारसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121