नवी दिल्ली : “आपला देश, इतिहास आणि परंपरा यांना विकृत करण्याचे प्रयत्न दीर्घकाळपासून होत आहेत. मात्र, आज अशा प्रयत्नांना उधळून लावून हिंदवी स्वराज्याच्या तत्त्वांवर चालणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) दत्तात्रेय होसबळे यांनी बुधवार, १७ जानेवारी रोजी केले.
राजधानी दिल्ली येथे हिंदवी स्वराज्य स्थापना महोत्सव आयोजन समितीतर्फे विशेष कार्यक्रमात रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्ताजी होसबळे यांनी संबोधित केले. ते म्हणाले, “’मराठा साम्राज्य’ असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही केला नव्हता. त्यांनी नेहमीच ’हिंदवी स्वराज्य’ असेच म्हटले होते. त्यामुळे ’मराठा साम्राज्य’, ’मराठा किंग’ असे संबोधन कुठून आले, याचा विचार व्हावा. अशाप्रकारे विकृत इतिहासामुळे भारतीय वारसा, परंपरा यास दोष देण्याचे काम दीर्घकाळ झाले. मात्र, आज या नरेटिव्हला बदलण्याची गरज आहे. त्यासाठी बाहेरचे लोक नव्हे, तर राष्ट्रनिर्माणात योगदान देऊ इच्छिणार्या लोकांनी सक्रिय होण्याची गरज आहे,” असे होसबळे म्हणाले.
शिवरायांना आदर्श मानणारे लोक सत्तेत असल्यानेच आज सुशासन देण्यास ते सक्षम आहेत, असे दत्तात्रेय होसबळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “धर्म व राष्ट्र यासाठी देदीप्यमान कार्य करणार्या महापुरुषांना मर्यादित करण्याची सवय लागली आहे. इतिहासकारांनी जाणीवपूर्वक आपला ’नरेटिव्ह’ चालवण्यासाठी असे केले असेल, मात्र त्यामुळे महापुरुष आणि राष्ट्रनायक यांना चौकटीत बांधण्याचे प्रकार घडतात. असे प्रकार टाळण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प बालपणीच घेतला होता. त्यांनी अतिशय भक्कम रणनीती आखून आपले ध्येय साकार केले. शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण आजही अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या सहकार्यांच्या मनात जिद्द जागृत केली आणि उदात्त ध्येयाचे बीज रोवले. परिणामी, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न हे समाजाचे झाले. शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्व देणारे राजर्षी होते. औरंगजेबाच्या कैदेतून सुटणे हा प्रसंग आपण वाचतो. मात्र, हताश न होता कैदेतून शिवाजी महाराजांनी जी रणनीती आखली असेल त्याची कल्पनाही आज करवत नाही. अफजलखानाचा वधदेखील त्यांनी आपल्या रणनीतीद्वारेच केला. परिस्थितीचे आकलन करून कधी काय करायचे आणि गुण ओळखून व्यक्तींना कशी जबाबदारी द्यायची याची शिकवण शिवचरित्रातून मिळते,” असेही होसबळे यांनी यावेळी नमूद केले आहे.
अधिवक्ता आणि लेखक जे. साई दीपक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र यामध्ये इतिहास घडविला. विजयनगर साम्राज्य आणि मराठा साम्राज्य हे भारताच्या इतिहासात महत्त्वाचे आहे. मराठा साम्राज्य शिवरायांच्या राज्याभिषेकापासून 1674 ते 1818 पर्यंत तळपत होते. मात्र, तथाकथित भारतीय इतिहासकार शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य यांचे महत्त्व नाकारतात. ब्रिटिशांनी भारत हा मुघल नव्हे,तर मराठ्यांकडून घेतला, हा इतिहास शाळेत शिकवला जात नाही. त्या काळात जवळपास संपूर्ण भारत हा भगवा होता,” असे जे. साई दीपक यांनी म्हटले.
इतिहासातून धडे घेणे अतिशय गरजेचे आहे असे जे. साई दीपक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “भारताच्या गौरवशाली इतिहासाचा विचार करताना काही बाबी लक्षात घेणे आवश्यक. आपले ’आयडॉल’ हे प्रांतीय अस्मितेत आणि डाव्यांच्या जातीय काव्यातून बाहेर काढणे अतिशय गरजेचे आहे. छत्रपतींचा राज्याभिषेक म्हणजे हिंदुराष्ट्राचा उद्गम होता, हे कधीही विसरता कामा नये,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संयोजन वैभव डांगे म्हणाले की, “शिवराज्याभिषेकाचे यंदाचे 350 वे वर्ष आहे. शिवराज्याभिषेक ही एक ऐतिहासिक घटना होती, त्यामुळे पारतंत्र्यात असलेल्या समाजाला नवी ऊर्जा मिळाली होती. आजही शिवरायांचे जीवन आणि त्यांची शिकवण मार्गदर्शक आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे करणे हे ’आत्मनिर्भर भारता’चे लक्ष्य साध्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करणारे ठरणार आहे.”