ठाणे : अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ठाण्यात २५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री करण्यात येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सामान्यांपर्यंत कांदा पोचविण्यासाठी पुढाकार घेतला असून, ठिकठिकाणी कांदा विक्री सुरू आहे. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राज्यातील कांदा उत्पादक क्षेत्रात अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याचे भाव किरकोळ बाजारात ८० रुपयांपर्यंत पोचले होते. त्यामुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले. या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या एनसीसीएफ, नाफेड यांच्या माध्यमातून २५ रुपये दराने कांदे विक्री करण्यात येत आहे. ठाण्यातील ग्राहकांपर्यंत कांदा पोचविण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार भाजपचे आ. संजय केळकर व आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ झाला. नौपाड्यातील यश आनंद सोसायटीतील कुटुंबांना कांद्यांची विक्री करण्यात आली. त्यानंतर गावदेवी मैदानानजीकच्या न्यू प्रभातनगर परिसरात सामान्यांना स्वस्तात कांदे विक्री झाली. गोकुळनगरमधील माजी नगरसेवक कृष्णा पाटील व नंदा पाटील यांच्या कार्यालयाबाहेर आणि माजी नगरसेविका नम्रता कोळी व जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या सहकार्याने खारटन रोड परिसरात कांदे विक्रीला सुरुवात करण्यात आली.
या वेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी, भाजपाचे सरचिटणीस सचिन पाटील, उपाध्यक्ष विक्रम भोईर, डॉ. राजेश मढवी, मंडल अध्यक्ष दया यादव, सचिन केदारी, प्रशांत कळंबटे, मनोज शुक्ला, हिमांशू राजपूत, अजय सिंह, वृषाली वाघुले-भोसले, दिलीप कंकाळे आदींसह स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.